
शहर व तालुक्यातील ‘व्हाइट कॉलर’ धंद्यांच्या भागीदारांचा पर्दाफाश करण्याचा गगन हाडा यांचा इशारा
कोपरगाव :- कोपरगाव शहरासह संपूर्ण तालुक्यात सुरू असलेले कथित अवैध धंदे तात्काळ बंद करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कोपरगाव शहरप्रमुख गगन हाडा यांनी दिला आहे. या अवैध धंद्यांचे कथित भागीदार कोण आहेत, त्यांना कोणाचे राजकीय पाठबळ आहे आणि नेमक्या कोणाच्या आशीर्वादाने हे धंदे सुरू आहेत, याचा पर्दाफाश करण्यासाठी लवकरच विशेष पत्रकार परिषद घेऊन सर्व माहिती जनतेसमोर मांडणार असल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात अवैध धंद्यांचे प्रमाण वाढल्याचा आरोप करत हाडा यांनी पोलीस प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलिसांना स्पष्ट इशारा देऊनही अद्याप ठोस आणि प्रभावी कारवाई झालेली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. सध्या तालुक्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर असून सर्वसामान्य नागरिक, कामगार आणि कष्टकरी कुटुंबांसमोर आर्थिक संकट उभे आहे. आगामी दिवाळी सणासाठी कामगार व मजुरांना मिळणारा बोनस त्यांच्या कुटुंबाच्या आनंदासाठी महत्त्वाचा असतो. मात्र, अवैध धंद्यांमुळे या पैशांची उधळपट्टी झाल्यास गरीब कुटुंबांच्या ताटातील गोडधोड हिरावले जाईल आणि महिला व चिमुकल्या मुलांच्या सणाच्या आनंदावर विरजण पडेल, अशी चिंता हाडा यांनी व्यक्त केली.
अवैध धंदे बंद न झाल्यास आंदोलन - पोलिसांनी तातडीने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा गगन हाडा यांनी दिला आहे. तसेच आगामी पत्रकार परिषदेत कथित अवैध धंद्यांमागील भागीदार आणि त्यांना मिळणाऱ्या राजकीय पाठबळाबाबत माहिती उघड करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

कोपरगावातील अवैध धंद्यांविरोधात शिवसेना आक्रमक; कारवाईसाठी पोलिसांना अल्टिमेटम शहर व तालुक्यातील अवैध धंदे तातडीने बंद करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात शहर व तालुका पोलिसांना निवेदन देण्यात आले असून जिल्ह्याचे पालकमंत्री आणि स्थानिक आमदारांनाही सविस्तर माहिती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, निवेदन देऊन चार-पाच दिवस उलटूनही अपेक्षित व ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.