Homeकोपरगावब्राह्मण सभा, कोपरगावचे संस्थापक सदस्य तथा ब्राह्मण सभेचे माजी अध्यक्ष कै. प्रभाकर...

ब्राह्मण सभा, कोपरगावचे संस्थापक सदस्य तथा ब्राह्मण सभेचे माजी अध्यक्ष कै. प्रभाकर नेने यांचे दुःखद निधन!

कोपरगाव : – ब्राह्मण सभा, कोपरगावचे संस्थापक सदस्य, ब्राह्मण सभेचे माजी अध्यक्ष आणि माझे शालेय जीवनातील सहकारी मित्र श्री. जितेंद्र नेने यांचे वडील कै. प्रभाकर नेने यांचे आज सकाळी पुणे येथील त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने वयाच्या ९२ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी असून मनाला मोठा धक्का देणारी आहे.

कै. प्रभाकर नेने यांचे ब्राह्मण सभा, कोपरगावच्या स्थापनेपासून संस्थेच्या जडणघडणीत आणि वाटचालीत मोलाचे योगदान राहिले आहे. समाजातील बांधवांना एकत्र आणणे, समाजहिताच्या उपक्रमांना प्रोत्साहन देणे आणि संस्थेच्या कार्याला भक्कम आधार देणे यामध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार असायचा. ब्राह्मण सभेचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी सर्वांना सोबत घेऊन, सर्वांच्या विचारांचा आदर राखत संस्थेचा कारभार सांभाळला. त्यांच्या कार्यपद्धतीत समन्वय, सामंजस्य आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती दिसून येत असे.

त्यांचा स्वभाव अतिशय शांत, संयमी, प्रेमळ आणि मनमिळाऊ होता. कोणाशीही सहजपणे संवाद साधणे, प्रत्येकाला आपलेसे करणे आणि आपल्या वागण्यातून आपुलकी निर्माण करणे हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष गुण होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी केलेले शेतीविषयक कार्य आणि त्यासाठी घेतलेले कष्टही निश्चितच स्मरणात राहण्यासारखे आहेत. कष्ट, प्रामाणिकपणा आणि साधेपणा यांचा सुंदर संगम त्यांच्या जीवनात पाहायला मिळत होता.

ब्राह्मण सभेच्या स्थापनेपासून त्यांनी दिलेले योगदान, संस्थेच्या विकासासाठी घेतलेली मेहनत आणि समाजबांधवांशी जपलेले जिव्हाळ्याचे संबंध कायम स्मरणात राहतील. त्यांचे कार्य आणि आठवणी ब्राह्मण सभा, कोपरगावच्या पुढील वाटचालीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरतील.

त्यांच्या निधनाने नेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच ब्राह्मण सभा, कोपरगावने एक ज्येष्ठ, अनुभवी, मार्गदर्शक आणि समर्पित व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांची उणीव कधीही भरून न निघणारी आहे.

या दुःखद प्रसंगी नेने कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. परमेश्वराने नेने कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ द्यावे आणि दिवंगत कै. प्रभाकर नेने यांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

*कै. प्रभाकर नेने यांना विनम्र अभिवादन आणि ब्राह्मण सभा, कोपरगाव च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!