Homeकोपरगावअहिल्यानगर बेसबॉल लीग २०२६ पर्व तिसरे स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन

अहिल्यानगर बेसबॉल लीग २०२६ पर्व तिसरे स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन

महाराष्ट्रातील आठ संघांतील १२० खेळाडूंचा सहभाग; कोपरगावात तीन दिवस रंगणार बेसबॉलचा थरार

कोपरगाव :- महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन, अहिल्यानगर बेसबॉल असोसिएशन आणि के. जे. सोमैया महाविद्यालय, कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘अहिल्यानगर बेसबॉल लीग (ABL) २०२६ – पर्व तिसरे’ या राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेचे नुकत्याच के. बी. पी. विद्यालय मैदान, साईबाबा कॉर्नर, कोपरगाव येथे मोठ्या उत्साहात व दिमाखदार वातावरणात उद्घाटन झाले. या स्पर्धेत महाराष्ट्रातील आठ संघांमधील एकूण १२० खेळाडू सहभागी झाले असून, तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमुळे कोपरगावच्या क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज आश्रमाचे मठाधिपती गुरुवर्य प.पू. स्वामी रमेशगिरीजी महाराज, आमदार मा. श्री. विवेकभैय्या कोल्हे, कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मा. श्री. परागजी संधान यांचे शुभहस्ते उदघाटन झाले.कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व विश्वस्त मा. श्री. संदीपदादा रोहमारे आणि के. जे. सोमैया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे, सरोदे मोटर्सचे अशोकमामा सरोदे हे या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या प्रसंगी मान्यवरांनी स्पर्धेतील सामने अनुभवले तसेच उपस्थित खेळाडूंशी संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या. वेग, चपळता, अचूकता, एकाग्रता, संघभावना आणि योग्य रणनीती यांचा सुरेख संगम असलेला बेसबॉल हा खेळ खेळाडूंच्या शारीरिक क्षमतेसोबतच निर्णयक्षमता आणि सांघिक कौशल्याचाही विकास करणारा असल्याचे आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी यावेळी नमूद केले.

पारंपरिक खेळांच्या पलीकडे जाऊन अशा वेगळ्या क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. अशा राज्यस्तरीय स्पर्धांमुळे ग्रामीण आणि शहरी भागांतील नवोदित खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळते. बेसबॉल खेळाचा अधिकाधिक प्रसार होऊन जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास आमदार श्री. विवेकभैय्या कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केला.

कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मा. श्री. परागजी संधान यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत बेसबॉलसारख्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी अहिल्यानगर बेसबॉल लीगच्या माध्यमातून होत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. संधींची निर्मिती, गुणवत्तेचा विकास आणि बेसबॉलचा विस्तार या ध्येयाने आयोजित केलेल्या या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनचे सचिव श्री. मकरंद को-हाळकर यांनी केले. त्यांनी स्पर्धेच्या आयोजनामागील उद्देश तसेच बेसबॉल खेळाच्या प्रसारासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.आभार अहिल्यानगर बेसबॉल असोसिएशनचे अध्यक्ष श्री. अरुण चंद्रे यांनी मानले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा संचालक प्रा. सुनिल कुटे यांनी केले.

अहिल्यानगर बेसबॉल लीगच्या तिसऱ्या पर्वात महाराष्ट्रातील एकूण आठ संघांनी सहभाग नोंदवला असून, १२० खेळाडू आपले क्रीडाकौशल्य सादर करीत आहेत. रविवार, २२ नोव्हेंबर ते मंगळवार, २४ नोव्हेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत रंगणाऱ्या या स्पर्धेचा प्रमुख उद्देश बेसबॉल खेळाचा प्रसार करणे, नवोदित खेळाडूंना राज्यस्तरीय व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि गुणवंत खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे.

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अमृत पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर, प्रशांत स्पोर्ट्स – आदेश पाटोळे, बाला लॅव्हेंडर्स, औटी प्रिंटर्स, फूड हब बिर्याणी रेस्टॉरंट, कीर्ती इंजिनिअर्स, गाडेकर इंजिनिअर्स आणि स्वामी विवेकानंद पतसंस्था, पुणतांबा यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच गायकवाड असोसिएट्स, एमबीए केटर्स आणि श्री. विनोदजी राक्षे यांचेही विशेष सहकार्य लाभले. आयोजकांनी सर्व प्रायोजक आणि सहकार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रीय खेळाडू कै. किरण मनेरी यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.

या उद्घाटन सोहळ्यास आयोजक, मान्यवर, संघमालक, प्रशिक्षक, खेळाडू, क्रीडा शिक्षक तसेच बेसबॉलप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहिल्यानगर बेसबॉल लीगच्या तिसऱ्या पर्वाच्या माध्यमातून कोपरगावच्या क्रीडा क्षेत्रात राज्यस्तरीय स्पर्धेचे यशस्वी आयोजन झाले असून, या स्पर्धेमुळे बेसबॉल खेळाला अधिक व्यापक लोकप्रियता मिळण्यास निश्चितच मदत होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!