
इयत्ता अकरावी -बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित शिबिराचा सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी घेतला लाभ; विद्यार्थ्यांचा वेळ आणि प्रवासखर्च वाचला
कोपरगाव : श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स (एस. एस. जी. एम.) महाविद्यालय, कोपरगाव येथे भारतीय डाक विभाग आणि महाविद्यालय प्रशासन यांच्या संयुक्त सहकार्याने इयत्ता अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक ८ ऑक्टोबर २०२६ ते २४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आधार नोंदणी व अद्ययावतीकरण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिराचा सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. महाविद्यालयाच्या परिसरातच आधारविषयक सेवा उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि प्रवासावरील खर्च वाचण्यास मदत झाली.

कोपरगाव पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला एस. एस. जी. एम. कॉलेजचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे साहेब, श्रीरामपूर डाक विभागाचे अधीक्षक श्री. जनवाडे साहेब (SPOS), श्री. केंद्रे साहेब (SDIP) आणि कोपरगावचे पोस्टमास्तर श्री. रवींद्र परदेशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. भारतीय डाक विभागाचे आधार ऑपरेटर श्री. प्रसाद वसमतकर यांनी शिबिरातील कामकाज तत्परतेने पार पाडत विद्यार्थ्यांना आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाची सेवा उपलब्ध करून दिली.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशासह विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि दैनंदिन कामकाजासाठी आधार कार्डावरील माहिती अद्ययावत असणे महत्त्वाचे आहे. ही बाब लक्षात घेऊन इयत्ता अकरावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच आधारविषयक सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. रवींद्र हिंगे, पर्यवेक्षक श्री. माधव रेवगडे, कला, वाणिज्य व विज्ञान विभागांचे विभागप्रमुख, यु-डायस प्लस समिती चेअरमन श्री. संदिप सोनवणे व सर्व सदस्य, वर्गशिक्षक तसेच प्राध्यापकवृंद यांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले. महाविद्यालय प्रशासनाने आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे शिबिराचे कामकाज सुरळीतपणे पार पडले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच आधारविषयक सेवा मिळाल्याने त्यांचा वेळ, श्रम आणि प्रवासखर्च वाचला. या विद्यार्थीहिताच्या उपक्रमाबद्दल विद्यार्थी व पालकांनी भारतीय डाक विभाग तसेच महाविद्यालय प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले.
विद्यार्थ्यांच्या सोयीला प्राधान्य देत शैक्षणिक संस्था आणि शासकीय विभागांनी परस्पर सहकार्याने असे उपक्रम राबविल्यास विद्यार्थ्यांना आवश्यक सेवा सहज उपलब्ध होऊ शकतात, हे या शिबिरातून अधोरेखित झाले.