
कोपरगाव :- रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स महाविद्यालयातील रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमी पूर्ववत सुरू करावी अशी विद्यार्थांची मागणी स्नेहलतताई कोल्हे यांच्याकडे होती. तसेच दुष्काळाची परिस्थिती असल्याने विद्यार्थ्यांचे जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांचे शुल्क माफ करावे, अशी सूचना मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी महाविद्यालय प्रशासनाला केली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी महाविद्यालय व्यवस्थापनाने या मागणीवर सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहनही मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी केले आहे.
रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे कामकाज पुन्हा सुरू करण्यात यावे आणि जून ते ऑक्टोबर २०२६ या पाच महिन्यांचे शुल्क माफ करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी नुकतीच पत्राद्वारे केली होती. या मागणीची मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी तातडीने दखल घेत महाविद्यालयाच्या प्राचार्यांना व्यवस्थापनाशी चर्चा करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत. या अकॅडमीमध्ये प्रवेश घेऊन विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. मात्र, सध्या स्पर्धा परीक्षा केंद्र बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळे निर्माण होत असून त्यांच्या परीक्षेच्या तयारीवरही परिणाम होत आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर अभ्यासाचे वातावरण आणि योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे.
या अकॅडमीमध्ये प्रवेश घेणारे बहुतांश विद्यार्थी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यातच सध्या महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकरी कुटुंबांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांवर शुल्काचा अतिरिक्त आर्थिक भार टाकून त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, अशी भूमिका मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी मांडली आहे.
विद्यार्थ्यांना काही अपरिहार्य कारणांमुळे जून ते ऑक्टोबर या कालावधीतील शुल्क भरता आलेले नाही. मात्र, नोव्हेंबर २०२६ पासून नियमित शुल्क भरण्यास विद्यार्थी तयार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून पाच महिन्यांचे शुल्क माफ करावे आणि रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे कामकाज पूर्ववत सुरू करावे, असे आवाहन मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी केले आहे.