
कोपरगाव :- वाढदिवस म्हणजे केवळ आनंदोत्सव आणि जल्लोष न करता, त्या दिवसाचे औचित्य साधून समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपणे हीच खऱ्या अर्थाने वाढदिवस साजरा करण्याची प्रेरणादायी संकल्पना आहे. याच विचारातून कोपरगाव नगरपालिकेचे भारतीय जनता पार्टीचे गटनेते श्री. प्रसादजी आढाव यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार, दिनांक २ नोव्हेंबर २०२६ रोजी श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय, कोपरगाव येथे २५ गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याबरोबरच सामाजिक संवेदनशीलतेचा सुंदर संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमास कोपरगाव नगरपालिकेच्या नगरसेविका सौ. सोनल अजमेरे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रसादजी आढाव यांच्या मित्रपरिवाराने एकत्र येत वाढदिवसाचे औचित्य साधून हा सामाजिक उपक्रम राबविला. यावेळी परेश आढाव, इलियाज शेख, ओम दुसाने, रोहित कनगरे, दीपक गंगवाल, अर्जुन माकोने, आदित्य हादगे, गौरव आढाव, स्वराज सूर्यवंशी, भैया नागरे, सलीम अत्तार, पंकज आढाव व जोहिद कच्छी आदी मित्रपरिवारातील सदस्य उपस्थित होते.
संस्थेच्या वतीने कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे, सचिव दिलीप अजमेरे, सहसचिव सचिन अजमेरे, तसेच संस्थेचे सदस्य आनंद ठोळे, डॉ. अमोल अजमेरे, संदीप अजमेरे, राजेश ठोळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करण्याचा आदर्श – यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रसादजी आढाव यांचे मित्र व संस्थेचे ज्येष्ठ सदस्य डॉ. अमोल अजमेरे यांनी या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, प्रसादजी आढाव हे श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यामुळे ज्या विद्यालयात आपण शिक्षण घेतले, त्या विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांसाठी काहीतरी योगदान द्यावे, अशी त्यांची मनापासून इच्छा होती. वाढदिवसानिमित्त मोठ्या थाटामाटात उत्सव साजरा करण्यापेक्षा समाजातील गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊन त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला हातभार लावावा, ही भावना त्यांनी व्यक्त केली.
विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून दिल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलणार असून, शिक्षण घेताना त्यांना निश्चितच प्रोत्साहन मिळेल. अशा उपक्रमांमधून समाजाप्रती असलेली बांधिलकी जपली जाते. वाढदिवसासारख्या वैयक्तिक आनंदाच्या प्रसंगाचे रूपांतर सामाजिक उपक्रमात करणे ही अत्यंत प्रेरणादायी बाब आहे, असेही डॉ. अजमेरे यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सुरेंद्र शिरसाळे यांनी केले. त्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून उपक्रमाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दिगंबर देसाई यांनी केले, तर उपमुख्याध्यापिका सौ. सुजाता अजमेरे यांनी आभार प्रदर्शन केले.
याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक बलभीम उल्हारे, अतुल कोताडे, निलेश बडजाते, संजय बर्डे, योगेश गवळे, पंकज जगताप, संजीवनी डरागे, रूपाली साळुंखे, शिल्पा अजमेरे यांच्यासह विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.