
कोपरगाव :- कोपरगाव नगर परिषदेच्या नगर रचना (Town Planning) विभागाचे प्रमुख आणि सहाय्यक अधिकारी यांच्या कार्यकाळातील कथित भ्रष्टाचार, बेकायदेशीर कारभार आणि पक्षपाती धोरणाचा जाहीर निषेध करण्यासाठी “माझं गाव माझं अभिमान, कोपरगांवकर” संघटना आता थेट मैदानात उतरली आहे. प्रशासनाला दिलेला ३० दिवसांचा कडक अल्टीमेटम संपत आला असून, वरिष्ठ कार्यालयाचे आदेश येऊनही मुख्याधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. या ढिम्म प्रशासनाला जागे करण्यासाठी आणि त्यांच्या भ्रष्ट कारभाराचे कान उघडण्यासाठी संघटनेच्या वतीने नगर परिषदेसमोर “तीव्र ढोल बजाव आंदोलन” छेडण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा संघटनेचे पदाधिकारी विनय भगत, मयूर आव्हाड आणि विजय जाधव यांनी केली आहे.

मुख्याधिकारीनी नक्की कोणाच्या दबावाखाली? प्रांतांचा आदेशही धुडकावला!
संघटनेचे विनय भगत यांनी पुराव्यांसह सादर केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत मा. उपविभागीय दंडाधिकारी (प्रांत अधिकारी) कोपरगाव यांनी २७ ऑक्टोबर २०२६ रोजीच मुख्याधिकाऱ्यांना या प्रकरणावर तात्काळ ‘नियमोचित कायदेशीर कारवाई’ करण्याचे कडक लेखी आदेश दिले होते. परंतु, वरिष्ठ कार्यालयाचे थेट आदेश येऊनही नगर परिषद प्रशासनाने अद्याप दोषी नगर रचना अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई केलेली नाही किंवा त्यांना पदावरून दूर केलेले नाही. यामुळे “मुख्याधिकारी नक्की कोणाच्या राजकीय दबावाखाली या भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत?” असा संतप्त सवाल संघटनेने उपस्थित केला आहे.

“दिव्याखाली अंधार”; स्वतःच्याच कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये टॉयलेट गायब!
ज्या नगर परिषदेवर शहराच्या स्वच्छतेची आणि नियोजनाची जबाबदारी आहे, त्यांच्याच मुख्य इमारतींमध्ये कायद्याचा खून झाला असल्याचा खळबळजनक आरोप संघटनेने केला आहे. नगर परिषदेची मुख्य प्रशासकीय इमारत आणि त्यांनीच बांधलेले नवीन कमर्शियल कॉम्प्लेक्स (व्यावसायिक संकुल) यामध्ये ग्राहक, व्यापारी व नागरिकांसाठी साधे टॉयलेट-बावायरमेंट आणि आरक्षित पार्किंगची कोणतीही व्यवस्था नाही. विकास नियंत्रण नियमावलीचे (DCR Rules) हे उघड उल्लंघन असताना, नगर रचना विभागाने स्वतःच्याच इमारतींना ‘कम्प्लिशन सर्टिफिकेट’ (भोगवटा प्रमाणपत्र) कशाच्या आधारावर दिले? तसेच, शहरातील विनापरवाना बँक्वेट हॉलला अभय देऊन केवळ गरीब आणि छोट्या दुकानदारांच्या अतिक्रमणांवर हेतुपरस्पर बडगा उगारल्याचा गंभीर आरोप संघटनेने पुराव्यांसह केला आहे.

आता थेट कोपरगावकरांची रणभैरी घुमणार!
प्रशासनाला ३ नोव्हेंबर रोजीच ‘अंतिम स्मरणपत्र’ (Final Reminder) आणि ‘माहितीचा अधिकार (RTI)’ अर्ज सादर करून संघटनेने कायदेशीर कोंडी केली आहे. आता दिलेली मुदत संपताच, कोपरगावच्या त्रस्त नागरिकांना सोबत घेऊन नगर परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ढोल-ताशांच्या तीव्र निनादात, दणदणीत घोषणाबाजी करत हे “ढोल बजाव आंदोलन” छेडले जाईल. या आंदोलनादरम्यान शहरात कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास, त्याची संपूर्ण जबाबदारी मुख्याधिकारी आणि नगर परिषद प्रशासनाची राहील, असा कडक इशारा विनय भगत, मयूर आव्हाड आणि विजय जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.