Homeकोपरगावस्नेहलताताई कोल्हे, विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश; गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे हटविण्याचा...

स्नेहलताताई कोल्हे, विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश; गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय मागे

शिंदे-फडणवीस सरकारचे कोल्हे यांनी मानले आभार

मुख्य संपादक – राजेंद्र तासकर

   शासकीय गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे हटविण्याच्या कारवाईला सरकारने स्थगिती द्यावी, यासाठी भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे न हटविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने घेतला असून,सरकारच्या या निर्णयामुळे गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याबाबत महसूल विभागाने नोटिसा बजावलेल्या कोपरगाव तालुक्यातील नऊशे कुटुंबासह राज्यातील सुमारे सव्वादोन लाख कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. 

गायरान जमिनीवरील गरीब लोकांनी बांधलेली घरे अतिक्रमण म्हणून काढली जाणार नाहीत,असा निर्णय राज्य सरकारने घेतला असून,गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबत सरकार अनुकूल असल्याचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मंगळवारी (२९ नोव्हेंबर) स्पष्ट केले आहे.राज्यातील सुमारे २ लाख २२ हजार ३८२ व्यक्तींनी सरकारी गायरान जमिनीवरअतिक्रमण केलेले असून,ही अतिक्रमणे हटविण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच दिलेला आहे.या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने तात्काळ कारवाई करून येत्या डिसेंबर अखेरपर्यंत ही अतिक्रमणे काढावीत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने ६ ऑक्टोबर २०२२ रोजी दिलेला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढण्यासाठी प्रशासनाने अतिक्रमण धारकांना नोटिसा बजावल्या आहेत. कोपरगाव तालुक्यातील १७ गावांतील सुमारे ९०३ नागरिकांना गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढून घेण्याच्या नोटिसा महसूल विभागाने बजावल्या आहेत.त्यामुळे हे अतिक्रमित नागरिक धास्तावले आहेत.वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे १६ नोव्हेंबर रोजी येसगाव (ता. कोपरगाव) येथील कोल्हे वस्तीवर आयोजित भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी आले असता,संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे,माजी आमदार तथा भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे,सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी गायरान जमिनीवरील अतिक्रमणधारकांची समस्या त्यांच्यासमोर मांडली होती.
गायरान जमिनीवर अनेक बेघर, निराधार,भूमिहीन,शेतमजूर,दलित, आदिवासी,भटके विमुक्त,गोरगरीब लोकांनी घरे बांधली आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून गायरान जमिनीवर राहणाऱ्या या आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना राहण्यासाठी स्वत:च्या मालकीची जागा नाही.या जमिनी व्यतिरिक्त जगण्यासाठी त्यांच्याकडे कोणतेही ठोस साधन नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही झाल्यास मागील अनेक वर्षापासून गायरानावर वास्तव्यास असणाऱ्या अनेक भूमिहीन व गोरगरीब कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होऊन ही कुटुंबे रस्त्यावर येतील.त्यामुळे त्यांची अतिक्रमणे न हटवता ती नियमित करून त्यांना दिलासा द्यावा,अशी आग्रही मागणी स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांनी यावेळी केली होती.त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रश्न मांडून तो मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते.मुनगंटीवार यांनी कोल्हे यांना दिलेला शब्द पाळला असून, न्‍यायालयाच्‍या आदेशानुसार गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढण्या संदर्भात महसूल विभागाने संबंधितांना नोटिसा बजावल्‍या आहेत;परंतु गायरान जमिनीवरील गोरगरीबांची घरे हटवणे योग्य नाही,असे मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आग्रहपूर्वक सांगितले.मुनगंटीवार यांच्या आग्रहानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडून मंजूर करून घेतला.
महसूल विभागाने गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्या संदर्भात नोटीस बजावली आहे;परंतु गेल्या २५ ते ३० वर्षांपासून त्या ठिकाणी राहणाऱ्यांना तेथून हटवणे कठीण असल्याने आता त्याच ठिकाणी गावठाणचे पट्टे तयार करून त्यांची जागा अधिकृत करण्याचा राज्य सरकार गांभीर्याने विचार करत आहे. गाव किंवा शहराजवळील गायरान जमिनीवर अनेक वर्षापूर्वी हातावरील पोट असलेल्‍या निराधार व्‍यक्‍तींनी घरे बांधली आहेत.त्‍यातील अनेकांना राहण्यासाठी स्‍वतःची जागादेखील नाही.त्‍यामुळे त्‍यांचे गायरान जमिनीवरील अतिक्रमण न काढण्‍याबाबत राज्य सरकार अनुकूल आहे.या लोकांसाठी राज्‍य सरकार सर्वोच्‍च न्‍यायालयात फेरविचार याचिकाही दाखल करणार आहे. गायरान जमिनीवरील एकाही व्‍यक्‍तीचे अतिक्रमण काढले जाणार नाही.या अतिक्रमणधारकांना दिलेल्या नोटिसा मागे घेण्याची कार्यवाही लवकरच सुरू केली जाईल,असे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
गायरान जमिनीवरील गोरगरिबांची घरे पाडण्याचा तसेच हे अतिक्रमण काढण्याबाबत बजावलेल्या नोटिसा मागे घेण्याचा निर्णय राज्‍य सरकारने घेतल्याबद्दल बिपीनदादा कोल्हे, स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत. दरम्यान,बिपीनदादा कोल्हे,स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांच्या पाठपुराव्यामुळे सरकारने गायरान जमिनीवरील अतिक्रमणधारकांना दिलासा दिल्याबद्दल त्यांनी कोल्हे परिवाराचे आभार मानले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!