
मृत सचिन गजर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,एक मुलगी,दोन भाऊ असा परिवार असून,एक मुलगा दिव्यांग आहे,तर मुलगी अकरावीत शिकते. लहानपणीच सचिन गजर यांच्या आईं- वडिलांचा मृत्यू झाला.मावशीने त्यांचा सांभाळ केला.सचिन गजर दररोज मजुरीकाम करत असत.त्यांचे दोन्ही भाऊही मोलमजुरी करतात.सचिन गजर यांच्या अकाली मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबाचा आधार हरपला आहे.अशा दु:खदप्रसंगी युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी धावून जात त्यांना न्याय मिळवून दिला.त्याचबरोबर संजीवनी उद्योग समूह व संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यात येईल,अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव :कोपरगाव नगर परिषद प्रशासनाच्या निष्काळजी व बेजबाबदारपणामुळे सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास शहरातील हनुमाननगर भागात गटारीत पडून सचिन गहिनीनाथ गजर (वय ३६ वर्षे) या युवकाचा मृत्यू झाला.नगर परिषद प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे सचिन गजरला हकनाक जीव गमवावा लागल्याने नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात गुन्हा दाखल करावा,मृत सचिनच्या कुटुंबीयास आर्थिक मदत द्यावी, त्याच्या पत्नीला न.प.सेवेत घ्यावे आदी मागण्यांसाठी भाजप,शिवसेना,रिपाइं व मित्र पक्षांच्या वतीने संतप्त नागरिकांसह कोपरगाव शहर पोलिस ठाण्यासमोर मंगळवारी पाच तास ठिय्या मांडत धरणे आंदोलन करण्यात आले.सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी पोलिस व न.प.प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून समाधानकारक तोडगा काढल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
कोपरगाव शहर व परिसरात सोमवारी (२ ऑक्टोबर) सायंकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या दरम्यान मुसळधार पाऊस झाला.शहरातील सिटी सर्व्हे नं.१०५ मधील हनुमाननगर भागातील सचिन गहिनीनाथ गजर हा मजुरी काम करणारा विवाहित तरुण साडेसातच्या सुमारास कामावरून आपल्या घरी जात होता. वीजपुरवठा बंद असल्याने सचिनला अंधारात काही दिसले नाही व तो गटारीत उलटा पडला व फुटलेल्या पाईपमध्ये अडकला.अर्ध्या-पाऊण तासानंतर सचिन गजर हा गटारीत पडल्याचे दिसताच या भागातील नागरिकांनी सचिनला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले.नगर परिषद प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे गटारीत पडून सचिनचा मृत्यू झाल्याने न.प.प्रशासनाच्या गलथान कारभाराबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
हनुमाननगर भागात गटारीचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडले आहे.संपूर्ण वॉर्डातील पाणी या गटारीत तुंबते.त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.या भागातील नागरिकांनी वारंवार मागणी करूनही नगर परिषद प्रशासनाने गटारीचे काम पूर्ण केले नाही.त्यामुळे काल रात्री ही दुर्घटना घडली व त्यात सचिन गुजर याला हकनाक आपला जीव गमवावा लागला.सचिन गजरची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट होती.तो मजुरीकाम करून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवत होता.तो घरातील कर्ता पुरुष होता.या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाल्याने त्याचे कुटुंब उघड्यावर आले आहे.सचिनच्या मृत्यूचे वृत्त समजताच मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास भाजप व मित्र पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला.यावेळी विवेकभैय्या कोल्हे व पदाधिकाऱ्यांनी पोलिस उपाधीक्षक संदीप मिटके,वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख, पोलिस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे व नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्यासमोर घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने न.प. प्रशासनाविरुद्ध तीव्र भावना व्यक्त केल्या.दोन वर्षापूर्वी हनुमाननगर भागातील सदर गटारीच्या कामाचे टेंडर निघाले होते.सहा महिन्यांपूर्वी वर्क ऑर्डर दिली होती. अद्यापही हे काम पूर्ण झालेले नाही. नगर परिषद प्रशासनाच्या दिरंगाई, दुर्लक्षित व बेजबाबदारपणामुळे सचिन गजरचा मृत्यू झाला असून,दोषी व्यक्तींविरुद्ध कडक कारवाई करावी, मृत सचिन गजरच्या कुटुंबीयांच्या भवितव्याच्या दृष्टीने योग्य ती आर्थिक मदत द्यावी, यापुढे कोपरगावात अशी दुर्दैवी घटना घडू नये म्हणून प्रशासनाने तत्पर राहून दक्षता घ्यावी व योग्य उपाययोजना करावी,अशी मागणी विवेकभैय्या कोल्हे यांनी केली.त्यावर न.प.प्रशासक शांताराम गोसावी यांनी मृत सचिन गजरच्या पत्नीला न.प.मध्ये कंत्राटी तत्त्वावर नोकरीत घेण्याचे तसेच त्यांच्या कुटुंबीयांना त्वरित अर्थसाह्य देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, भाजपचे शहराध्यक्ष डी.आर.काले,शिवसेना नेते कैलास जाधव,माजी जि. प.सदस्य केशवराव भवर,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश नागरे,माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे,माजी उपनगराध्यक्ष रवींद्र पाठक,विजय वाजे, योगेश बागुल,स्वप्नील निखाडे,विक्रमादित्य सातभाई, शिवसेना शहरप्रमुख सनी वाघ,माजी नगरसेवक बबलू वाणी,अशोकराव लकारे,शिवाजीराव खांडेकर,जनार्दन कदम,दिनेश कांबळे,संदीप देवकर,बापू पवार,जितेंद्र रणशूर,सोमनाथ म्हस्के,गोपीनाथ गायकवाड,भाजयुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक,दीपक जपे,वैभव गिरमे,रवींद्र रोहमारे,खलिकभाई कुरेशी, अल्ताफभाई कुरेशी,फकिर मोहम्मद शेख पैलवान,सागर जाधव,दादासाहेब नाईकवाडे,बुद्धिस्ट यंग फोर्सचे विजय त्रिभुवन,नितीन शिंदे,संजय दुशिंग, किरण सुपेकर,पिंकी चोपडा,अल्ताफभाई पठाण,फिरोज पठाण, प्रशांत कडू,चंद्रकांत वाघमारे,विजय चव्हाणके,सचिन सावंत,इलियास खाटीक, स्वप्निल मंजुळ,अनिल जाधव, सलीम पठाण,रूपेश सिनगर,शफिकभाई सय्यद,सिध्दांत सोनवणे आदींसह मृत सचिन गजर यांचे नातेवाईक,भाजप व मित्र पक्षांचे पदाधिकारी,माजी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.