Homeकोपरगाव“मराठी लोककलांद्वारे उत्पन्न व उन्नती सहज शक्य”- भारुडसम्राट भानुदास बैरागी

“मराठी लोककलांद्वारे उत्पन्न व उन्नती सहज शक्य”- भारुडसम्राट भानुदास बैरागी

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव-“मराठी भाषा व कलांना प्राचीन अशी दीर्घ परंपरा आहे. संतांपासून तर आधुनिक काळापर्यंत या लोककला जीवन जगण्याच्या, जीवन संस्काराच्या माध्यम राहिल्या आहेत.आजच्या काळात तर भारुड सारख्या लोककला या उत्पन्नाच्या व उन्नतीच्या मार्ग बनल्या आहेत.त्यामुळे आपण साक्षरता प्रसारार्थ अनेक भारुडे सादर करून आर्थिक उन्नतीही साधली आहे.”असे प्रतिपादन प्रसिद्ध भारुड सम्राट भानुदास बैरागी यांनी केले.

येथील रयत शिक्षण संस्थेच्या एस.एस.जी.एम.कॉलेज मधील मराठी विभागाद्वारे नुकताच ज्ञानपीठकार ‘कवी कुसुमाग्रज जन्मदिन’ तथा ‘मराठी भाषा गौरव दिन’ कार्यक्रम संपन्न झाला.त्याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून श्री. बैरागी बोलत होते.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मराठी विभाग प्रमुख डॉ.शीला गाढे ह्या होत्या.

विद्यार्थ्यांना संबोधित करताना श्री.बैरागी यांनी ‘भारुड’ या शब्दाचे असलेले विविध अर्थ,संतांनी केलेली भारुडांची रचना,ज्ञान देण्यासाठी त्यांचा संत एकनाथांसारख्यांनी करून घेतलेला वापर याविषयी सांगून ‘आवा चालली पंढरपुरा’,’ मला दादला नको ग बाई…’अशा भारुडांचे चित्रपटगीतांच्या चालीवर सादरीकरण केले आणि मनोरंजनाबरोबरच उद्बोधन कसे करता येते,याचे एक प्रकारे प्रात्यक्षिकच दिले.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ.शीला गाढे यांनी “मराठी ही रोजगाराची भाषा आहे.पण आम्ही न्यूनगंड बाळगला. शासनानेही आश्वासन दिले परंतु अंमलबजावणी केली नाही.म्हणून मराठीची आज दुरावस्था झालेली दिसत आहे.परंतु मराठी अस्मिता जागृत होत नाही तोपर्यंत मराठी उन्नत अवस्थेला येणार नाही.यासाठी सतत मराठी बोलली,वापरली व जपली गेली पाहिजे.मातीशी जशी नाळ जोडलेली असते तशीच मातृभाषेशी ती सहज जोडलेली हवी.इंग्रजी भाषेच्या रेट्यात मराठीची गळचेपी होता कामा नये.म्हणून भाषेचा अभ्यास करा,त्यातूनच शब्द भांडार व अर्थ भांडार जमा होईल.माणूस कलेच्या जोरावर रोजगार मिळू शकतो”,असे सांगितले.हे पटवून देताना त्यांनी या महाविद्यालयातूनच घडलेले व कीर्तनकार म्हणून ख्याती मिळविलेले सचिन पवार,व वृत्तनिवेदक संदीप जाधव अशा काही विद्यार्थ्यांची उदाहरणे ही दिली.

कर्मवीर व कुसुमाग्रज प्रतिमा पूजनानंतर,प्रास्ताविकातून मराठी विभाग प्रमुख डॉ.उज्ज्वला भोर यांनी मराठी भाषा गौरव दिन आणि कुसुमाग्रज जन्मदिन यातील अनुबंध स्पष्ट केला.आणि मराठी भाषा गौरव दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा नाही तर मराठी अस्मिता जपण्याची व जोपासण्याची वृत्ती जागृत करण्याचा दिवस आहे असे सांगितले.डॉ बाबासाहेब शेंडगे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.डॉ. देवकाते यांनी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रा.रावसाहेब दहे यांनी सर्वांप्रती आभार व्यक्त केले.

सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.आर.आर.सानप यांनी शुभेच्छा दिल्या.कार्यालयीन अधीक्षक श्री.सुनील गोसावी,शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि मोठ्या संख्येने असलेले विद्यार्थी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!