
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
समनापूर प्रतिनिधी : -आपल्या महाराष्ट्राला वारकरी सांप्रदायाचा वारसा लाभलेला आहे. त्यामुळे भारतीय संस्कृती ओळखली जाते.आषाढी एकादशीला अनेक वैष्णवांचा मेळा पंढरपूरला पांडुरंगाची पालखी खांद्यांवर घेऊन पायी दिंडी सोहळा विठुरायाच्या दर्शनाची आस धरून तहान भूक हरपून जातात अशीच संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समनापूर येथील विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या आवाजात विठ्ठलं नामाचा जयघोष करत गावातून पायी बाल दिंडीचे दि. १६ जुलै २०२४ आयोजन केले.
यावेळी वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले,पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर’,अशा विठ्ठलमय वातावरणात समनापूर मराठी शाळेतील विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा रंगला.
यावेळी विठ्ठल-रखुमाई,संत नामदेव,संत सावता महाराज,संत चोखामेळा, संत कान्होपात्रा,संत मुक्ताबाई,संत ज्ञानेश्वर माऊली,संत तुकाराम महाराज, वासुदेव व अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी या रिंगण सोहळयाचे आकर्षण ठरले.सालाबादप्रमाणे यंदाही समनापूर मराठी शाळेमध्ये आषाढी एकादशी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
शाळेतील सर्व मुला-मुलींनी यावेळी वारकरी पोशाख परिधान केले तर कोणी विठोबा तर कोणी वासुदेव बनले होते.सकाळी शाळेच्या मैदानावर पालखी सोहळा पार पड़ताच पंढरपुरच्या वारीप्रमाणेच गावातून दिंडीचे आयोजन करीत गावातील म्हालोबा मंदीर,मारुती मंदीर,सावता महाराज मंदीर व भगवान बुद्ध विहार परिसरांतील प्रांगणात भव्य रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.हातात भगवे झेंडे,वारकरी पताका,टाळ, मृदंग,चिपळ्या तर मुलींच्या डोक्यावर तूळस बघून जणू काही खरोखरच पंढरपुरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता.
यावेळी विविध भक्तीगितांवर नृत्ये व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.”काठी अन् घोंगडं घेवुद्या की रं,मला बी जत्रंला (वारीला ) येऊ द्या की या गीत नृत्यामध्ये सर्व जाती -धर्माच्या मुलांनी उत्स्फुर्त सहभाग घेत मुक्तछंदी धनगरी नृत्य सादर केले.एरवी शाळेच्या गणवेशात असलेले लहान मुलं मुली आज मात्र पांढरा झब्बा,डोक्यावर टोपी,कपाळी बुक्का,गळ्यात टाळ आणि नऊवारीत आलेल्या मुली,केसात गजरा, डोक्यावर तुळस आणि विठ्ठल नामाची शाळा भरली,शाळा शिकताना तहान भूक हरली’ या अभंगाप्रमाणे विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत दंग झालेले बाल वारकरी समनापूर मराठी शाळेमध्ये अवतरले.”यावेळी ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला.अन् अवघी शाळा दिंडी सोहळ्याच्या भक्तीरसात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले.
सर्व शिक्षकांनी ‘जय जय राम कृष्ण हरी,रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी,ज्ञानोबा माऊली तुकाराम’ या अभंगांचे गायन करत टाळ व वीणा मृदूंगाच्या तालावर ठेका धरत नृत्य तसेच विठ्ठल फुगडी खेळून प्रत्यक्षात श्रीक्षेत्र पंढरपुरातील भक्तिमय वातावरण समनापूर शाळेच्या क्रीडागंणावर व गाव मंदीर परिसरांत निर्माण केले. विद्यार्थी आणि शिक्षकानी पारंपारिक वारकरी वेशभूषा,तुळशी व भगवद्ध्वज घेऊन अभंगाच्या ठेक्यावर नृत्य व फुगडीचा आनंद घेऊन या नयनरम्य सोहळ्यात आपली भक्ती अभिव्यक्त केली.रिंगण आटोपल्यावर टाळ मृदुंगाच्या गजरात विठूरायाची भजने गात आणि पसायदान म्हणत ह्या सोहळ्याचा शेवट झाला.
सलग आठ वर्षांपासून मराठी शाळेच्या माध्यमातून रिंगण सोहळा आयोजित केला जातो.मध्यंतरी कोविड कोरोना काळातही या रिगन सोहळ्यास खंड पडू दिला नाही.या दोन वर्षी ई दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.तसेच दरवर्षी दिंडीचे आयोजन केले जाते शाळेच्या मुख्याध्यापिका राजुबाई कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाचा हा रिंगण सोहळा आनंददायी ठरला असून यासाठी शिक्षक- सविता देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे,वैभव जोशी,नामदेव वाडेकर,योगिता गोफने,मनीषा शिंदे,पंकज कवडे,किरण खैरनार सर या शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभल्याने हे शक्य झाल्याचे मुख्याध्यापिका राजूबाई कर्पे यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून लाखोंच्या संखेने भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने दक्षिण काशी तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत.हा वैष्णवांचा मेळा खूप मोठा असून या वारीतमध्ये सर्व साधु-संतांच्या पालख्या येत असतात.अशा विठ्लाचा सोहळा अनेकांना अनुभवता येत नाही.त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना, पालकांना,शिक्षकांना,कर्मचाऱ्यांना पंढरपूर अनुभवण्यासाठी शाळेतच दिंडी सोहळा आयोजित केला जातो.