
कोपरगाव : – ज्येष्ठ विचारवंत, सुप्रसिध्द लेखक विल्यम शेक्सपियर यांनी असे म्हटले आहे की, हजार शब्दापेक्षा एक हसरा चेहरा जास्त शक्तीशाली असतो तद्वत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांचा चेहराही नेहमीच स्मित हास्यदायी आहे., त्यांचे हे हास्य आम्हां सर्व तरूणांना नेहमीच कार्यचेतना देते. राज्यापुढे कितीही संकटे असली, कितीही संघर्षाची परिस्थिती आली तरी ते स्वतः त्याचा लवलेशही आपल्या चेह-यावर दाखवत नाही., निर्माण होणा-या परिस्थितीला हाताळणं, संकटाला संघर्षाला घिरोधात्तपणे सामोरे जाणं ही कला त्यांना आत्मसात आहे, यातुन त्यांच्या खंबीरतेची साक्ष तुम्हां-आम्हां समोर येते. हजर जबाबी व्यक्तिमत्व म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ पासुन ते आजतागायत ११ वर्षात भारत देशाला जागतिक महासत्तेकडे घेवुन जाण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते करण्याचा प्रयत्न केला आहे., नव्हे तर कोरोनासारख्या जागतिक महामारीतही भारत देशाला सर्वश्रेष्ठ सिध्द करून बदलत्या आव्हानांना सामोरे गेले आहेत. देशात नरेंद्र आणि गल्लीत देवेंद्र ही बिरुदावली तेंव्हापासून रूढ झाली असुन महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीत भर घालणारे कार्यकुशल नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिले जाते. आई-वडीलांचे संस्कार मुलांना प्रत्येक आघाडीत यश मिळविण्यांसाठी उपयोगी ठरत असतात. वडील गंगाधरराव फडणवीस जनसंघाचे ज्येष्ठ होते. त्यांच्यावर पहिल्यापासुन भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेची छाप पडली. जनसंघात शिस्तीला विशेष महत्व. हा शिस्तीचा नियम त्यांनी आपल्या कुटूंबातही लावला आणि त्यातुन देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जनसंघ विचाराचा वारसा जोपासला गेला. कठीण परिस्थितीत स्वतः बरोबर घराला, परिसराला, तालुक्याला, जिल्हयाला, राज्याला कसे सावरायचे याचे बाळकडू त्यांच्याकडुनच मिळाले असे म्हटले तर वावेग ठरू नये. व्यक्तीपेक्षा संघटन, संघाची विचारधारा, संस्कार महत्वाचे याची शिकवण त्यांना मिळाली. कितीही आणीबाणीची परिस्थिती ओढवली तरी पक्षहित जपायचं याचा घडाही अनेकांना त्यांच्याकडुन मिळाला आहे., वयाच्या सतराव्या वर्षी त्यांच्या वडीलांचे निधन झाले. पितृछायेची ऊब त्यांना फारकाळ मिळाली नाही. मात्र कृतीशिल विचारांचा वारसा मिळाला तर मनुष्य निश्चित पुढे जाऊ शकतो हे त्यांनी संपुर्ण महाराष्ट्र राज्याला दाखवुन दिले आहे.
१९८९ मध्ये त्यांनी सर्वप्रथम समाजकारणांत पाऊल ठेवले ते नागपुर भाजपा युवा मोर्चाचे वॉर्ड अध्यक्ष म्हणून. प्रभागातील गोर-गरीब, दीन दलित, उपेक्षीत, दिव्यांग, माता-महिला-भगिनी, अबाल-वृध्द, ज्येष्ठ श्रेष्ठ, वंचित आदि घटकांच्या समस्या जाणुन घेत त्यावर उपाययोजना केल्या म्हणूनच त्यांना वयाच्या बावीसाव्या वर्षी नागपुर महानगरपालिकेचे नगरसेवक आणि त्यातुन महापौर पदावर काम करण्यांची संधी मिळाली. या संधीचे त्यांनी सोने करून दाखविले. एक युवक देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान देवु शकतो याचे मुर्तीमंत उदाहरण त्यांनी स्वतःच इतरांना दाखवुन दिले आहे. राजकरणांत युवा शक्तीला विशेष महत्व आहे. जगामध्ये भारतीय युवाशक्तीचा सध्या जयजयकार आहे. बदलत्या मुक्त अर्थव्यवस्थेत तंत्रज्ञानाने प्रत्येकाला जवळ-जवळ आणले आहे. ग्लोबलायजेशन ही संधी मानुन त्यानुरूप सुसंगत ध्येय धोरणांची आखणी करण्यांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाकबगार ठरले आहेत. राज्याचा गाडा ओढण्यांत त्यांचे सक्षम नेतृत्व प्रतिभाशाली आहे.
१९९४ मध्ये ते भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष झाले, पुढे २००१ मध्ये राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी मिळाली. २०१० मध्ये सरचिटणीस, २०१३ मध्ये प्रदेशाध्यक्ष या सगळ्या संधी त्यांच्या पायापाशी आल्या आणि त्यातुन त्यांनी स्वतःला सिध्द करण्याचा जाणिवपुर्वक प्रयत्न केला. नेतृत्व सक्षम असेल तर कर्तृत्वही आपोआपच मोठे होत असते. नागपुर विद्यापीठातुन कायद्याचे शिक्षण आत्मसात केल्यांने समाजकारणांत, राजकारणांत, शैक्षणिक, सांस्कृतिक आदि सर्वच क्षेत्रात त्यांची भरारी आहे. महाराष्ट्रीयन नागरिकांची नस त्यांना नेमकेपणाने माहीत झाली आहे. महाराष्ट्र राज्याच्या पटलावर वयाच्या ४४ व्या वर्षी मुख्यमंत्री होणारे ते दुसरे सर्वात तरूण व्यक्तीमत्व आहे., आणि ही जागा सहजा सहजी कुणांलाही प्राप्त होत नसते तर त्यासाठी पात्रताही असावी लागते. अर्थातच ती पात्रता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठायी आहे म्हणूनच ते या राज्याचे तिस-यांदा मुख्यमंत्री झाले. आपल्या देशांने क्रिकेट खेळाचे जागतिक जेतेपद जिंकले ते भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि अष्टपैलु कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या कार्यकर्तृत्वावर त्यांनी संपुर्ण टीमला एकसंघ ठेवत जिंकण्यासाठी खेळायचे ही भावना निर्माण केली आणि जागतिक जेतेपद पटकावले तद्वत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याच्या विकासात भर घालणांरी टिम तयार केली. त्यांच्या अंतर्गत कार्यरत असणा-या मंत्रीमंडळातील अन्य सर्व सहयोगी मंत्र्यांना त्यांनी एकसंघ बांधून ठेवत उद्याचा महाराष्ट्र घडविण्यासाठी कोण कोणत्या मुलभूत पायाभूत सोयी सुविधा निर्माण करायच्या याची शिकवण देत पुढे नेले., विकासाचा मास्टरप्लॅन तयार करत त्या सर्व कामांची आखणी केली.
महाराष्ट्र राज्याला आजवर अनेक थोर कर्तृत्वसंपन्न नेतृत्वगुणांचे मुख्यमंत्री लाभलेले आहेत त्यात स्व. यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचे कार्य मोठे आहे. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कृषी औद्योगिक विकासाचा पाया घातला आणि सहकार चळवळीतुन तमाम महाराष्ट्रवासियांच्या प्रगतीत भर घातली. पुढे साध्या माणसांचा साधा प्रतिनिधी म्हणून माजी मुख्यमंत्री वसंतदादा बंडुजी पाटील यांचे नांव निघते. जेमतेम शिक्षण असलेल्या या प्रतीभावान व्यक्तीमत्वांने महाराष्ट्र राज्याचे नांव देशात उज्वल करून दाखविले. पाणी अडवा पाणी जिरवा या अतिशय छोटया कार्यशैलीतुन त्यांनी आपली चुणूक दाखविली आणि शेतक-यांच्या जीवनांत आनंद निर्माण केला. पुढे बाभळगांवचे सरपंच ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असा राजकीय प्रवास असलेले प्रतिभावान विलासराव दगडोजीराव देशमुख यांनी आपल्या कार्यभरारीतुन महाराष्ट्र राज्याची गौरवशाली परंपरा वाढवत दिल्लीच्या तख्तावर त्याचे नांव उज्वल केले., अगदी असेच काहीसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतीत आहे, त्यांनी अत्यंत कमी वयात आपल्या अंगी असलेल्या नेतृत्वगुणांची चुणूक जगाला दाखवुन दिली. राज्याचा दुष्काळ कायमचा कमी करण्यांसाठी व भुगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यांसाठी त्यांनी जलयुक्त शिवार योजना आणली आणि ती यशस्वी करून दाखविली परिणामी असंख्य ठिकाणची जिरायती जमीन कमी खर्चात ओलिताखाली आणण्यांत ते यशस्वी ठरले आहे., त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा राष्ट्रीय स्तरावर आणखीनच उजळून निघाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह खात्यावर कटाक्ष ठेवत त्याला आगळी वेगळी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. विधीमंडळ स्तरावर त्यांनी अनेक महत्वाच्या पदाची जबाबदारी सांभाळली. अंदाज समिती, नगरविकास, गृहनिर्माण, स्थायी समिती, नियम समिती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण समिती, राखीव निधीविषय संयुक्त निवड समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, स्वयंनिधीवर आधारीत शाळाबद्दल संयुक्त निवड समिती अशा एक ना अनेक समित्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काम करत आपल्या कार्यशैलीचा ठसा उमटविला आहे. परदेशात चांगलं काय, ते महाराष्ट्र राज्यात आणण्यासाठी नेहमी पुढाकार घेत आहेत. कायद्याचे शिक्षण आत्मसात केल्यानंतर त्यांनी परदेशातील बर्लिन येथील फ्रि युनिव्हरसिटीमध्ये डी.एस.ई. डिप्लोमा उत्तीर्ण करत प्रकल्प व्यवस्थापन तंत्र याबाबतचे शिक्षण पूर्ण केले. अमेरिकन सरकारच्या ईस्ट वेस्ट सेंटरतर्फे न्यु जनरेशन सेमिनार आयोजित करण्यांत आले होते त्यात त्यांना एनर्जी सिक्युरिटी इश्यु या विषयावर शोध निबंध सादर करण्याची संधी मिळाली ही त्यांनी आत्मसात केलेल्या शिक्षणाची आत्मप्रौढी आहे. अमेरिका, वॉशिंग्टन, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड, सिंगापुर, केनीया नैरोबी, चीन, बीजींग, डेन्मार्क, कोपेनहेगन, मलेशिया, युरोप, रशिया मास्को, स्वित्झर्लंड, दावोस, होनोलुलु अशा अनेक विदेशांचा दौरा करत तेथुन महाराष्ट्र राज्याची औद्योगिक नगरी अधिक संपन्न करण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प आणण्याचे धाडस दाखवत येथील सुशिक्षीत बेरोजगारांच्या हाताला काम दिले आहे. या नेतृर्वाचे महाराष्ट्र व्हीजन खरोखरच मोठे आहे. रस्ते या विकासाच्या मुख्य धमन्या आहे हे ओळखून त्यांनी महाराष्ट्र राज्यात केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या साथीने अनेक नव नविन रस्ते तयार केले. नागपुर मुंबई समृध्दी महामार्ग हा युती शासनाचा ड्रीमप्रोजेक्ट अत्यंत कमी वेळेत बांधुन पुर्ण करत त्याचे लोकार्पण केले. आरोग्य वीज पाणी या मूलभूत प्रश्नावर त्यांनी महाराष्ट्रवासियासाठी मोठे काम केले.
विधीमंडळात अनेक नव नविन लोकप्रतिनिधी नेतृत्व येत आहे. त्यांच्यासाठी सोप्या भाषेतील अर्थसंकल्प या पुस्तकाचे त्यांनी लेखन केले त्यामुळे किचकट अर्थसंकल्प अनेक आमदारांना सोपा वाटू लागला आहे. आत्मनिर्भर महाराष्ट्र यासह अन्य दोन पुस्तके त्यांनी लिहीली आहेत. हजरजबाबी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख उभ्या महाराष्ट्र राज्याने अनुभवली आहे. कॉमनवेल्थ पार्लमेंटेरियन असोसिएशनतर्फे त्यांना अलिकडेच सर्वोत्कृष्ट संसदपटु पुरस्कार मिळालेला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील निळवंडे धरण पूर्ण करून त्याच्या कालव्यांची कामे प्रगतीपथावर करण्यात ते सदैव भर देत आहेत., शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. शहरातील वाढत्या लोकसंख्येसह प्रवाशांना मेट्रो रेल्वे निर्माण कार्यात त्यांनी मनापासून काम सुरू केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात एक अभिनेताही दडलेला आहे. कला मनुष्याच्या नेतृत्वगुणाला पुढे आणत असते. राजकारणांत येण्याअगोदर त्यांनी मॉडेलिंग चेहरा म्हणूनही आपली ओळख निर्माण केली. हिरा हा कितीही अंधारात ठेवला तरी तो चकाकतो., तद्वत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वस्पर्षी विषयाचे ज्ञान आहे., आणि ती महाराष्ट्र विकासाची मुख्य धारा आहे, या नेतृत्वगुण संपन्न व्यक्तीमत्वाच्या मार्गदर्शनांखाली आपल्याला विविध पदावर काम करण्याची संधी मिळाली अशा या नेतृत्वाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
विवेक बिपीनदादा कोल्हे,
संचालक, इफको, नवी दिल्ली.