
कोपरगांव :- छत्रपती संभाजीनगर, नाशिक व अहिल्यानगर या तीन जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या कोपरगांव तालुक्यातील श्रीक्षेत्र उक्कडगांव येथील पुरातन रेणुकादेवी मंदिरावर अंतर्गत वादामुळे प्रशासकाची नियुक्ती करण्यांत आली, पण त्यांच्याकडुन सदर मंदिराची देखभाल, पुजा अर्चा, दर्शन व्यवस्था, साफ सफाई, भाविकांच्या नैमित्तीक सोयी सुविधा पुरविल्या जात नाही त्यामुळे देवीभक्तामध्ये सदर कारभाराबाबत प्रचंड चीड निर्माण झाली असुन प्रशासकीय यंत्रणेने तात्काळ उक्कडगांव रेणुकादेवी भाविकांसाठी सोयी सुविधा पुरवाव्या अशी मागणी पंचायत समितीचे माजी सदस्य बबनराव निकम यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिकमासानिमीत्त महाराष्ट्र राज्यासह मध्यप्रदेश इंदौर तसेच विदेशातुन उक्कडगांव रेणुकादेवी दर्शनासाठी भाविकांची यंदा मोठया प्रमाणांत गर्दी होती मात्र; सदर मंदिर व्यवस्थापनात अंतर्गत वाद उपस्थित झाल्यांने प्रशासकीय यंत्रणेची नियुक्ती करण्यांत आली. त्यांनी देवी भक्तांच्या सोयी सुविधांकडे लक्ष द्यायला पाहिजे होते पण ते दिलेच नाही. परिणामी येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिरात अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे, मंदिराभोवती कचऱ्याचे ढिग जमा झाले आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, याशिवाय दर्शन व्यवस्थेत अडथळे उत्पन्न होत आहे, येथे भक्तांनी रेणुकादेवीसाठी दिलेल्या दानधर्माचा उपयोग पाहिजे त्या प्रमाणांत होतांना दिसत नाही, मंदिर जिर्णोध्दाराचे काम ९० टक्के पुर्ण झाले आहे उर्वरित काम तसेच अपुर्णावस्थेत आहे. मंदिरातील दानपेटीची सुरक्षा होत नाही, जे पैसे येतात त्याचा योग्य विनीयोग होत नाही त्यामुळे देवीभक्तांनी प्रशासकीय कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याबाबतची सर्व परिस्थिती आमदार विवेकभैय्या कोल्हे यांना अवगत करण्यांत आली आहे तेंव्हा त्यांनीही याप्रकरणी लक्ष घालुन उक्कडगांव रेणुकादेवी भक्तांना तसेच धार्मिक साहित्य विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्या असे शेवटी बबनराव निकम म्हणांले.