
संपादक – राजेंद्र तासकर
उर्ध्व गोदावरी खोरे हे अतितूटीचे आहे त्यात पाण्याची समृध्दी व्हावी यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहुन जाणारे अतिरिक्त पाणी पुर्वेकडे वळवुन अहमदनगर नाशिकसह मराठवाडयाचा पाणीप्रश्न कायम स्वरूपी सोडवावा अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनाच्या प्रती त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, जलसंपदा राज्यमंत्री बच्चु कडु, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनाही दिल्या आहेत.
त्यांनी आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की,तुटीच्या उर्ध्वं गोदावरी खो-यात पाण्याची समृध्दी व्हावी हे माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे स्वप्न होते. त्याच्या पुर्तीसाठी त्यांनी वयाच्या ९३ व्या वर्षापर्यंत लढा दिला., शेती,शेतकरी आणि पाणी या प्रश्नावर कायम संघर्ष करत या प्रश्नाची तीव्रता त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना अनेकवेळा शिर्डी भेटीत लक्षात आणून दिली होती.
उर्ध्व गोदावरी खोरे हे पाणी उपलब्धतेबाबत अतितुटीचे खोरे असून या तुटीच्या खो-यात पाण्याची समृध्दी व्हावी व अहमदनगर नाशिक सह मराठवाडयातील पाण्याचा ज्वलंत प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा म्हणून माजीमंत्री कै. शंकररावजी कोल्हे यांनी पश्चिमेचे अतिरिक्त समुद्राला वाहुन जाणारे पाणी पुर्वेकडे वळवावे म्हणून सातत्याने पाठपुरावा करून त्यास सन २००० मध्ये विधीमंडळात याबाबत मंजुरी घेतली होती, तसेच आपणही विधानसभा कामकाजाच्या कार्यकाळात या संदर्भात पाठपुरावा केलेला आहे.
याप्रश्नी तातडीने कार्यवाही व्हावी म्हणून केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवतराव कराड यांनी दिनांक ६ सप्टेंबर २०२१ राजी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबादचे कार्यकारी संचालक यांचे दालनात आढावा बैठक घेवून त्याबाबत मार्गदर्शक सूचनाही केलेल्या आहेत.राज्य शासनाने आता याप्रश्नी ठोस भूमिका घेत आहे.
गोदावरी खोरे हे अति तूटीचे असून त्याबाबत दुस-या जलसिंचन आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष,जलतज्ञ डॉ.माधवराव चितळे यांनी पश्चिमेकडील नद्यांचे अतिरिक्त पाणी पुर्वेकडे गोदावरी खो-यात वळवून हा ज्वलंत प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकतो अशी शिफारस महाराष्ट्र शासनास केलेली आहे.
त्या अनुषंगाने सहयादी माथ्यावर प्रस्तावीत ३० वळण बंधा-यापैकी जे अपूर्ण आहेत ते तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे.त्याद्वारे अंदाजे ७.५० टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकते व काही अंशी पाण्याची तूट कमी होवू शकते.
तसेच वैतरणा सॅंडल गेट, पार-गोदावरी,दमणगंगा-वैतरणा गोदावरी,दमणगंगा एकदरे-व दमणगंगा पिंजाळ या प्रस्तावित प्रकल्पाची कार्यवाही झाल्यास २५ टी एम सी पाणी उपलब्ध होऊ शकते.त्याद्वारे उर्ध्व गोदावरी खो-यातील नाशिक अहमदनगर जिल्ह्यातील फळबागा, दीर्घकालीन शेती योजना, औद्योगिक प्रकल्प,तसेच पिण्याचे पाणी यांचे सुयोग्य नियोजन होऊ शकते.,तसेच मराठवाडा विभागातील शेती सिंचनाचे व औद्योगिक वाढ यासाठीचे नियोजनही व्यवस्थित होऊन शाश्वत पाणी पुरवठा होऊ शकतो.त्यासाठी अहमदनगर नाशिक सह मराठवाड्यासह भासणा-या पाणी तुटवडयाच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करणेकामी पश्चिमेचे समुद्राला वाहून जाणारे अतिरिक्त पाणी पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळविण्याबाबत तातडीने कार्यवाही होण्यासाठी संबंधितांना आदेश व्हावेत असेही सौ. स्नेहलता कोल्हे शेवटी म्हणाल्या.