
कोपरगाव : – गेल्या महिन्यात दिनांक २४ ऑगस्ट रोजी सिन्नर शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर मिरगाव फाटा परिसरात दुचाकीवरून कोपरगावकडे जाणाऱ्या एकाच अडवून चार जणांनी मारहाण केली होती. सदर घटनेत मारहाण झालेल्या इसमा जवळील पंधरा हजार रुपये रोख रक्कम, दुचाकीची चावी घेऊन हल्लेखोर पसार झाले होते.
सदर घटनेचा नाशिक जिल्हयातील वावी पोलिस स्टेशनचे पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वावी पोलिसांनी या प्रकरणात तिघा जणांना अटक केली असून त्यांनी सदर दुचाकीस्वारास मारहाण केल्याची कबुली दिली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, सुधाकर वक्ते वय वर्षे ३५ राहणार जेऊर कुंभारी हे वावी येथे गेल्या वीस वर्षांपासून पॅथॉलॉजिकल लॅब चालवतात. मारहाणीची घटना घडली त्या दिवशी ते नेहमीप्रमाणे आपले काम आटोपून कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथे घरी जात असताना सायंकाळी सात वाजेच्या सुमारास दोन दुचाकी वरून आलेल्या चौघाजणांनी वक्ते यांना मिरगाव फाटा परिसरात दुचाकी आडवी लावून थांबण्यास भाग पाडले. व त्यांना लाथा बुक्क्यांनी व हातातील दांड्याने मारहाण करत खिशातील रोख रक्कम १५ हजार रुपये व दुचाकीची चावी हिसकावून घेतली. तद्नंतर मारहाण करणारे त्यांच्या दुचाकीवरून कोपरगावच्या दिशेने पसार झाले होते. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 324/2025 बी.एन.एस. कलम 309(6), 3(5) प्रमाणे रस्ता लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटनेचा तपास वावी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कोठावळे, तपासी अंमलदार अमोल गोडे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने तपास करून शुक्रवारी रात्री महेश बाबुराव सोळके (24) मुळ राहणार जेऊर कुभारी, ता. कोपरगाव, सध्या राहणार धात्रक फाटा, नाशिक ; धीरज नंदकिशोर गुंडगळ (24) राहणार हरीदर्शन अपार्टमेंट, वृंदावन कॉलनी, जत्रा हॉटेल, नाशिक ; भागवत भारत बांगर (25) मुळ राहणार लोखंडे वस्ती वडवणी जि. बीङ सध्या राहणार धात्रक फाटा के. के वाघ कॉलेज जवळ नाशिक अशी अटक केलेल्या तिघांची नावे असून त्यांचा चौथा साथीदार अमर राकेश वळवी राहणार करंजवेळ, ता.नवापूर सध्या राहणार – जत्रा हॉटेल, नाशिक हा फरार असून त्याचा शोध सूरू आहे.
वावी पोलिसांनी मारहाणीच्या गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकी देखील ताब्यात घेतल्या असून, पोलिसांनी अटक केलेल्या तिघांनाही सिन्नर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदर घटनेच्या गुन्ह्यातील आरोपी आणि फिर्यादी लॅब टेक्निशियन या एकाच व्यवसायातील आहेत.संशयित महेश सोळके व फिर्यादी वक्ते हे एकाच गावातील राहणारे असून, त्यांच्यात एकमेकांशी जुना वाद असल्याने त्यातून मारहाणीचा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मात्र, मारहाण करत असताना संशयितांनी फिर्यादीला घटनेच्या दोन दिवस अगोदर गावात झालेल्या दोन गटातील वादाचा संदर्भ देत शिवीगाळ केली होती. पोलिसांकडून तपासात सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत.