
कोपरगाव :- तालुक्यातील श्रीक्षेत्र चासनळी ते आळंदी पायी दिंडी सोहळ्याचे सोमवार ३ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता चासनळी येथून पायी दिंडी सोहळा आळंदीकडे प्रस्थान करणार आहे, दिंडीचे हे ३१ वे वर्ष आहे अशी माहिती ह. भ. प. बाबुराव महाराज चांदगुडे यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले की, गेल्या ३० वर्षापासून आध्यात्मिक क्षेत्रात कार्य सुरू असून त्या माध्यमातून विविध दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून पायी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. भौतिक सुखात मनुष्य गुरफटून गेला आहे. अध्यात्माकडे त्याचा ओढा कमी झाला आहे. मनशांती हरून बसला आहे. नैराश्य कमी करण्यासाठी या पायी दिंड्या आजवर त्र्यंबकेश्वर, पैठण, पंढरपूर, देहू आळंदी, भद्रा मारुती, इत्यादी ठिकाणी दरवर्षी आयोजित केल्या जातात.
तरुण, युवक, महिला, भगिनी, वयोवृद्ध वारकरी भाविकांना यात सामावून घेऊन त्यांच्यात अध्यात्मिक वातावरण निर्माण करून युवा पिढीला संस्काराची शिकवण दिली जाते. चासनळी ते आळंदी पायी दिंडी हांडेवाडी, पुतळावाडी, वल्हेवाडी, समनापुर, चंदनापुरी घाट, बोटा खानेवाडी, शिंदेवाडी एकलहरे, माळेगाव, वाकी खुर्द अशी दरकोस दर मुक्काम करत इंद्रायणी पार्क, मोशी देहू आळंदी रोड, येथे १४ नोव्हेंबर रोजी मुक्कामी उतरणार आहे. १६ नोव्हेंबर रोजी पारणे करून दिंडीचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे असे शेवटी बाबुराव महाराज चांदगुडे म्हणाले.