
कोपरगाव : – ” विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी लोकसाहित्य, ग्रामीण संस्कृती आणि परंपरेतील ज्ञान यांचे महत्त्व अधोरेखित केले. आई जात्यावर म्हणत असलेल्या ओव्या, बहिणाबाई चौधरी यांच्या कविता आणि लोकपरंपरेतील साहित्य यांमधून जीवनाचे तत्त्वज्ञान व्यक्त होत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील ज्येष्ठांकडून अशा ओव्या, कथा आणि लोकपरंपरा जतन कराव्यात,” असे प्रतिपादन ग्रामीण कवी इंद्रजीत भालेराव केले. ते येथील रयत शिक्षण संस्थेच्या ‘एस. एस. जी. एम. कॉलेजचा वार्षिक पारितोषिक व कै. सौ. सुशीलाबाई (माई) शंकरराव काळे आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा पारितोषिक वितरण’ समारंभ नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे यांनी भूषविले.
आपल्या जीवनप्रवासाचा उल्लेख करताना भालेराव यांनी सांगितले की, शालेय शिक्षणाच्या काळात स्वतःला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सातवीची परीक्षा कसाबसा पास होणे, मॅट्रिकमध्ये नापास होणे आणि त्यानंतर काही काळ गुरे राखण्याचे काम करणे अशा अनुभवांतून त्यांनी जीवनाची खरी शाळा शिकली. मात्र या अनुभवांनीच पुढे लेखनासाठी प्रेरणा दिली. गुरे राखण्याच्या अनुभवावर लिहिलेल्या “गाई घरा आल्या” या पुस्तकाला उत्कृष्ट साहित्य म्हणून पुरस्कार मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
ॲड. भगीरथ शिंदे यांनी अध्यक्षीय भाषणात, महाराष्ट्रातील विठ्ठल वाघ आणि ना.धो. महानोर यांच्या काव्यपरंपरेतील इंद्रजीत भालेराव हे महत्त्वाचे कवी असल्याचे नमूद करत शेती, शेतकरी आणि ग्रामीण जीवन या विषयांवर त्यांनी सातत्याने लेखणी चालविल्याचे सांगितले. तसेच भालेराव यांच्या कवितांवर बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेचा प्रभाव जाणवतो, असे सांगत त्यांच्या साहित्यिक योगदानाचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक, पाहुण्यांचा परिचय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी केले. प्राचार्यांनी आपल्या प्रस्ताविकांमध्ये पाहुण्यांचा शब्दसुमनांनी स्वागत करून, कर्मवीरांची स्वप्नातील रयत प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न एस. एस. जी. एम.महाविद्यालय करत आहे. असे आवर्जून सांगितले. महाविद्यालयाचे अहवाल वाचन प्रा. संजय शिंदे यांनी केले.
गुणवंत प्राध्यापकांमध्ये प्रा. डॉ. अर्जुन भागवत, प्रा. डॉ. विशाल पवार, डॉ. प्रतिभा रांधवणे, डॉ. विलास गाडे, प्रा.जयश्री पेटारे, प्रा. राजेश दळवी, प्रा.अंकिता प्रसाद, कु. थोरात वैष्णवी इ.चा विविध कारणे सन्मान करण्यात आला.
यानंतर कै. सुशिलाबाई शंकरराव काळे (माई ) आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या पारितोषिकांची घोषणा प्रा. हिंगे यांनी केली.प्रथम क्रमांक : कु. नाळे रेणुका जितेंद्र, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती, द्वितीय क्रमांक : औताडे श्रुती सुनिल, एस. एस. जी. एम. कॉलेज कोपरगाव, तृतीय क्रमांक : निंबाळकर रामेश्वर ज्ञानेश्वर, के. जे. सोमैय्या कॉलेज कोपरगाव, सांघिक पारितोषिक : मेमाणे श्रीहरी महादेव, साधना विद्यालय व आर. आर. शिंदे ज्युनिअर कॉलेज हडपसर, उत्तेजनार्थ पारितोषिके : लाटे सुदर्शन समाधान, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, गोळे अमोल रामचंद्र, निर्मलाताई थोपटे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, भोर जिं. पुणे, कु. शेख महेक तौफिक- रुरल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, पुणतांबा विशेष पारितोषिक: कर्मवीर शंकररावजी काळे साहेब : मातीचे ऋण फेडणारा योगी या विषयावर बोलणारा सर्वोत्कृष्ट स्पर्धक कु. चिखले अंजली निलेश के. बी. रोहमारे कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय यांना सन्मानपूर्वक बहाल करण्यात आला. यानंतर कला, क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक विभागामध्ये विविधप्रसंगी यश प्राप्त केलेल्या आणि आपापल्या वर्गात प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी मा. श्री. महेंद्रकुमार काले, डॉ. श्री. ज्ञानेश्वर वाकचौरे (सदस्य, महाविद्यालय विकास समिती), महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष मा. श्री. वसंतराव देशमुख, महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी व डेप्युटी कृषी अधिकारी नाशिक येथील. कु. तेजस्विनी मोरे यांच्यासह महाविद्यालयाचे विज्ञान उपप्राचार्य डॉ. घनश्याम भगत, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत, कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. बंडेराव तऱ्हाळ, कार्यालय अधीक्षक श्री. सुनील गोसावी तसेच प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाविद्यालयातील कार्यालयीन अधीक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक व मोठ्या संख्येने असलेल्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या दिमाखदार वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होते. सदर कार्यक्रमाचे आभार कु. ज्ञानेश्वरी चंद्रात्रे हिने मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सीमा चव्हाण, व प्रा. रवींद्र हिंगे यांनी केले.