
सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी.
कोपरगाव : – गेल्या चार दिवसापासून हवामान खात्याने वादळी वाऱ्यासह गारा पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला होता तो तंतोतंत खरा ठरला आहे कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागाला जवळके, रांजणगाव देशमुख, शहापूर, बहादराबाद, बहादरपूर, पाथरे आदी ठिकाणी दुपारी साडेचार ते पाच वाजेपर्यंत गारा वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस पडला त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला आहे, गहू, कांदे, मका, हरभरा, टरबूज, आंबे, द्राक्ष, ऊस, उन्हाळी भुईमूग, उन्हाळी काकडी, खरबूज आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. डोळ्यादेखत शेती पिक मातीमोल झाल्याने शेतकऱ्यांचे डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. या सर्व नुकसानग्रस्त पिकाची तातडीने पाहणी करून सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या परिसरातील शेतकरी बांधवांनी केली आहे.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रामनाथ चिने यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे व संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, तसेच मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याशी संपर्क साधून झालेल्या नुकसानीची माहिती दिली आहे.

या गारपीटीत रामनाथ चिने सर यांचे चार एकर गहू, तीन एकर कांदा, दोन एकर मका, ऊस तसेच आंबा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर त्यांचे शेजारील शेतकरी परशराम राहणे यांचे चार एकर टरबूज पीक पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहे. शेती पिकवण्यासाठी विविध बँकांकडून तसेच सहकारी सोसायटींकडून पीक कर्ज घेतले त्याची फेड कशी करावी हा शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तर काही शेतकऱ्यांनी खाजगी सावकाराकडे दाग दागिने गहाण ठेवून पैसे उपलब्ध करत रब्बी पिकासह बागायतीची पेरणी केली होती, त्यांनाही प्रचंड फटका बसला आहे. शासनाने याबाबतीत वेळीच दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी असे रामनाथ चिने यांनी यावेळी बोलताना सांगितले. दुपारी साडेचार ते पावणे पाच वाजेच्या दरम्यान शेतामध्ये गारांचा प्रचंड खच पडला होता त्यातच वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांकडे पशुधनासाठी उघड्यावर ठेवलेल्या चारा पिकाचे नुकसान झाले.

पशुधनाच्या अंगावर गारा पडल्यामुळे त्यात काही जनावरांना इजा पोहचली आहे. पावसामुळे विद्युत प्रवाह खंडित झाला आहे, तर काही ठिकाणी विद्युत खांब उनमळून पडले आहे. गारपिटीसह वादळी पाऊस थेट पोहेगाव पर्यंत पडल्यामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी सकाळपासून पीक काढणीला सुरुवात केली होती मात्र पावसामुळे हे धान्य मातीमोल झाले आहे. तर काही शेतकऱ्यांचा गहू काढणीला येण्यास दोन-तीन दिवसाचा अवधी होता मात्र तो शेतातच आडवा झाला आहे, आंबा यासह अन्य फळ झाडांना कुठलेही फळ राहिलेले नाही. त्यामुळे रानमेव्याला यंदा सर्वजण पारखे होणार आहेत. भारतीय हवामान खात्याने याबाबत शेतकऱ्यांना अगोदरच कल्पना दिली होती, त्यांचा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. डोळ्यादेखत नुकसान झाल्यामुळे शेतकरी धाय मोकलून रडत होते. आकाशात विजांचा कडकडाट सुरूच होता. आर्थिक वर्षअखेरीस ३१ मार्च असल्याने अनेक शेतकऱ्यांनी दाम दुप्पट व्याजाने पैसे उपलब्ध करून शेती कर्ज भरले मात्र त्यांच्यापुढे पीक उध्वस्त झाल्यामुळे पैशाची सोय कशी लावावी हा प्रश्न निर्माण झाला आहे. हे अस्मानी सुलतानी संकट आहे. पश्चिम भागात निळवंडे धरणाचे पाणी फिरल्यामुळे चालू वर्षी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता मात्र त्यांचे पीक पूर्णपणे उध्वस्त झाले आहे.