
कोपरगाव:- ” शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे ” ज्याला समजले त्याच्या जीवनाचे सोने झाल्याशिवाय राहत नाही; नव्हे नव्हे ते करून घ्यावे लागते ज्याप्रमाणे लोखंडाला परिसाचा स्पर्श होताच लोखंडाचे सोने होते त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याने शिक्षणरूपी परिसाचा स्पर्श करून घेऊन आपल्या आनंदी जीवनाचे सोने करुन घ्यावे असे प्रतिपादन दहावी (SSC)सन 2006 /2007 बॅचचे माजी विद्यार्थी स्नेहमेळावा प्रसंगी अध्यक्ष स्थानावरुन बोलतांना माजी जेष्ठ शिक्षक मा. श्री. गिरमे एस. एन सर यांनी तालुक्यातील कुंभारी नगरीमध्ये गुरुवर्य तुकाराम बाबा विद्यालय येथे केले.

पुढे ते म्हणाले कि, ज्ञानदान देणारी ज्ञानगंगोत्री जिची ओळख महाराष्ट्रासह परदेशातही आहे. या शाळेने १९७१ पासून अनेक विद्यार्थी घडविले जे आज स्व-देशातचं नव्हे तर परदेशातही उच्च पदावर कार्यरत आहे. आज डिजिटल युगामध्ये अध्यापनाबरोबर शारीरीक प्रकृतीकडे सर्वांनी लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे. दिवसागणित नवनवीन क्रांती घडत असून, या शाळेने त्याचा स्वीकार करुन विद्यार्थ्यांना उच्च प्रतिचे शिक्षण देण्याचा आटोकाट प्रयत्न करून गुणवंत विद्यार्थी घडविण्यात अग्रेसर असल्याचे पहावयास मिळत असल्याने विद्यालयाची उत्तरोत्तर प्रगती होत असल्याचे आत्मीक समाधान होत असल्याचे गिरमे सर यांनी शेवटी म्हटले आहे.

सदर प्रसंगी माजी शिक्षक होन सर, जेडगुले सर, पावरा सर, झाल्टे सर, भंडारे सर, पाटील मॅडम, बावीस्कर सर, मेहरखांब सर, मनियार मामा, दोडके मामा यांनी आपली उपस्थिती दर्शवून उपस्थित आजी – माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याच प्रमाणे गिते मॅडम, शेख मॅडम , साळवे मॅडम, साबळे मॅडम, खैरणार मॅडम, वसावे सर, चिंधे सर, दवंगे सर, ताजणे सर, काळे सर, धुळे सर, दिवे सर, बनकर व पवार मामा यांसह आदि उपस्थित होते. यावेळी माजी विद्यार्थी नितिन वाकचौरे आणि ज्योती पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


कार्यक्रमाची सुरुवात आजी – माजी गुरुजनांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. तद्नंतर दिवंगत शिक्षक चंद्रे सर,मुठे सर,वसावे सर, पवार शिपाई आणि माजी विधार्थी दिपक रणशुर यांस श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी जेष्ठ शिक्षक श्रीयुत गिरमे सर यांनी भुषविले.

शाळेचे आपण काही देणे लागतो या उद्देशाने माजी विद्यार्थी -विद्यार्थीनींनी तीन सी सी टीव्ही कॅमेरे, वॉटर फिल्टरसाठी दोन इलेक्ट्रिक मोटार, शैक्षणिक साहित्य सुरक्षेसाठी दोन वर्गखोल्यांना ग्रिल दरवाजे तसेच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप केले. त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरमे सर यांनी आपल्या मिळणाऱ्या पेन्शन मधून शाळेसाठी एक १६०० रुपये किंमतीचा सिलिंग फॅन आणि माजी विद्यार्थी यांनी एक १६०० रुपये किंमतीचा सिलिंग फॅन भेट म्हणून दिला. या सर्वांचे शाळेच्या वतीने मुख्याध्यापक बागुल सर यांनी आभार व्यक्त केले. माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित आजी – माजी गुरुजनांचे स्वागत करून सत्कार केला. शेवटी सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद लुटत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

स्नेहमेळावा घडवून आणण्यास विकास खळे, रविराज भारती, सागर रोकडे, बाबासाहेब भारती,सागर जाधव, राहूल वहाडणे, शोभा ठाणगे – कोकाटे, रोहिणी नन्नवरे-इघे, ज्योती पवार -दहे आदिंनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक गौरी दोडके (थोरात ) व सुत्रसंचलन अमित थोरात यांनी केले. तर शाळेचा लेखाजोखा व शेवटी आभार प्रदर्शन शाळेच्या शिक्षिका योगीता रणशुर मॅडम यांनी मानले.