
कोपरगाव : गेल्या ४० वर्षांपासून सहकार क्षेत्रात विश्वासार्ह कार्य करणारी समता नागरी सहकारी पतसंस्था ग्राहकांचा विश्वास संपादन करत यशस्वीपणे कार्यरत आहे. मात्र, सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या काही अपूर्ण आणि चुकीच्या माहितींमुळे संस्थेबाबत गैरसमज पसरवले जात असल्याचे समता पतसंस्थेकडून सांगण्यात आले.
संस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी पुढे सांगितले की, समता पतसंस्थेची शाखा पाथर्डी येथे नाही. समता पतसंस्था व समता मल्टीस्टेट या दोन वेगवेगळ्या संस्था आहेत. मात्र व्हिडिओमध्ये समता पतसंस्थेचा नामोल्लेख करण्यात आलेला आहे. व्हिडिओमध्ये पाथर्डी येथील समता मल्टीस्टेटची शाखा दाखवण्यात आली व समता पतसंस्थेचा नामोल्लेख करण्यात आलेला आहे ही बाब चुकीची आहे. याबाबत आम्ही निषेध व्यक्त करत आहोत. तसेच चुकीच्या व विपर्यास्त अफवा पसरवणाऱ्यांवर आम्ही कायदेशीर कारवाई देखील करणार आहोत.
तसेच पाथर्डी येथील उषाताई बढे ही मल्टीस्टेट पतसंस्था अडचणीत आली होती. ती बंद पडलेली संस्था दत्तक घेऊन हजारो ठेवीदारांच्या अडकलेल्या ठेवी व्याजासह परत केल्या आहेत. सोनेतारण कर्जाची देखील एकही कलम शिल्लक नाही. सर्व ठेवीदारांच्या ठेवी परत केल्यानंतर ३१ मार्च २०२६ अखेर ही शाखा बंद करण्यात आली मात्र या शाखेतील फर्निचर अद्यापही त्या ठिकाणी होते. शाखेतील फर्निचर शिफ्ट करताना चुकीचे व्हिडिओ चित्रण करून चुकीच्या बातम्या दाखवण्यात आल्या आहे.
पाथर्डी येथील व्हिडिओ चित्रीकरणात समता पतसंस्थेचा काहीही संबंध नाही. मात्र, सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अपूर्ण व चुकीच्या माहितीमुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले.
ग्राहकांनी अधिकृत माहितीसाठी थेट संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन करताना समता नागरी सहकारी पतसंस्था पारदर्शक कारभार, विश्वासार्ह सेवा आणि ग्राहकाभिमुख कार्यपद्धतीमुळे आजही ग्राहकांचा दृढ विश्वास टिकवून असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.