
कोपरगाव :- समाजकारणात सक्रिय सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा शिक्षकांकडून होणारा सन्मान ही अत्यंत कौतुकास्पद बाब असून रयत शिक्षण संस्थेने जपलेले सांस्कृतिक व मूल्याधिष्ठित वातावरण याचेच हे प्रतीक आहे. काळानुरूप शिक्षकांची भूमिका बदलत असून ज्ञान सतत अद्ययावत ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. आपल्या शेतात काय पिकते यापेक्षा जगात काय घडते याची जाणीव शिक्षकांनी विद्यार्थ्यांना करून द्यावी. शिक्षणाच्या माध्यमातून महिला आज ‘चेंज मेकर’ म्हणून पुढे येत आहेत. विद्यार्थ्यांचे यश हे केवळ गुणपत्रिकेतील आकड्यांवर नव्हे, तर त्यांनी समाज आणि जीवनात घडविलेल्या सकारात्मक परिवर्तनावर अवलंबून असते, असे प्रतिपादन आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी केले. ते रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागिरी महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथे आयोजित त्यांच्या नवनिर्वाचित आमदारपदाबद्दलच्या सत्कार समारंभ तसेच ‘कल्पतरू’ वार्षिक विशेषांकाच्या अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड. संदीप वर्पे यांनी भूषविले.
अध्यक्षीय मनोगतात ॲड. संदीप वर्पे यांनी शिक्षण महर्षी शंकरराव काळेसाहेब आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हेसाहेब यांनी रयत शिक्षण संस्थेच्या उभारणी व विस्तारासाठी दिलेले योगदान अतुलनीय असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या महान विभूतींनी केले असल्याचे त्यांनी नमूद केले. आज रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाखांमध्ये स्मार्ट बोर्डसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगभरातील ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा सकारात्मक, विधायक आणि ज्ञानवर्धक वापर करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. तसेच आमदार विवेकभैय्या कोल्हे यांच्यासह सर्व मान्यवरांना भावी कार्यासाठी शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व लोकहिताच्या कार्यास यश लाभो, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
सदर सन्मान सोहळ्यास रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मा. श्री. सुरेश बोळीज, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. श्री. बाळासाहेब आव्हाड, मा. श्री. महेंद्रशेठ काले, डॉ. ज्ञानेश्वर वाकचौरे, ज्येष्ठ पत्रकार डॉ. अरुण गव्हाणे, कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. बंडेराव तऱ्हाळ, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. घनश्याम भगत, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. निलेश मालपुरे, कार्यालय अधीक्षक श्री. सुनील गोसावी यांच्यासह महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, पाहुण्यांचा परिचय व स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी सत्कारमूर्ती आमदार विवेकभैय्या कोल्हे यांचे स्वागत करताना त्यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाचा गौरव केला. शेती, शिक्षण, सहकार आणि ग्रामीण विकास क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान समाजासाठी प्रेरणादायी असून लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी उभारलेले कार्य हे त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सीमा चव्हाण व डॉ. भागवत देवकाते यांनी केले, तर आभार प्रदर्शन वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत यांनी केले.