
‘आनंदी जीवनाची गुरुकिल्ली’ विषयावर अशोकजी देशमुख यांचे मार्गदर्शन; विजेत्यांचा सन्मान
कोपरगाव : आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त समता पतसंस्था, ज्येष्ठ नागरिक सेवा मंच आणि श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळ (निवारा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ज्येष्ठ नागरिकांसाठी जलद चालणे स्पर्धा, सभासद स्नेहमेळावा आणि आनंदी जीवनावर व्याख्यान समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले. समता पतसंस्था ते कलश मंगल कार्यालय या मार्गावर झालेल्या जलद चालणे स्पर्धेचे उद्घाटन कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत, प्रांताधिकारी धनंजय बांगर आणि कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे एपीआय दीपक रोठे, कोपरगाव ज्येष्ठ नागरिक सेवा मंच अध्यक्षा सौ.सुधाभाभी ठोळे, कार्याध्यक्ष विजय बंब यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत ९३ वर्षीय चंद्रकला रोहोम या आजींनी देखील सहभाग नोंदविला.

तहसीलदार महेश सावंत यांनी ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याची काळजी घेत नियमित व्यायाम आणि चालण्याला जीवन शैलीचा भाग बनवावा, असे सांगितले. अशा उपक्रमांमुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये उत्साह निर्माण होऊन त्यांचा सामाजिक सहभाग वाढतो, असे त्यांनी नमूद केले.

प्रांताधिकारी धनंजय बांगर यांनी ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव आणि मार्गदर्शन समाजासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले. ज्येष्ठांनी सकारात्मक विचारांसह सामाजिक जीवनात सक्रिय राहून आनंदी जीवनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. एपीआय दीपक रोठे यांनी ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्यासोबतच सुरक्षिततेचीही काळजी घ्यावी, असे सांगितले. कुटुंबातील सर्व पिढ्यांनी ज्येष्ठांना वेळ, सन्मान आणि आपुलकी देऊन त्यांच्या अनुभवाचा आदर करावा, असे त्यांनी नमूद केले.
यानंतर कलश मंगल कार्यालय येथे ज्येष्ठ नागरिक सेवा मंचचे डॉ. विलास आचारी यांच्या प्रास्ताविकाने कार्यक्रमास सुरुवात झाली. सुप्रसिद्ध व्याख्याते अशोकजी देशमुख यांनी ‘ज्येष्ठ नागरिकांनी आनंदी जीवन कसे जगावे व सर्व वयोगटातील नातेवाईकांनी हसत-खेळत तणावमुक्त जीवनाचा आनंद कसा घ्यावा ? या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी १ तास सभागृहाला खिळवून ठेवले होते. सभागृहात एक तास हशा पिकला होता. त्यानंतर उपस्थित जेष्ठ नागरिकांना मार्गदर्शन असून विविध गीतांवर ठेका धरायला देखील लावला.
जलद चालणे स्पर्धेच्या ६० ते ७० वर्षे पुरुष गटात रामदास वाकचौरे प्रथम, ओमप्रकाश भावसार द्वितीय, नंदू राजगुरू तृतीय, महिला गटात उषाताई कवडे प्रथम, कमल गायकवाड द्वितीय, हिराबाई झावरे तृतीय ठरल्या. ७० ते ८० वर्षे पुरुष गटात दिनकर झावरे प्रथम, वसंतराव देशमुख द्वितीय, सदाशिव चौधरी तृतीय, तर महिला गटात चंद्रकला सावंत-सरकर प्रथम, हर्षदा पटवर्धन द्वितीय, रजनी नलगे तृतीय ठरल्या. ८० वर्षांवरील गटात घैसास सर प्रथम, दत्तात्रय निकम द्वितीय, शिवाजी सोनवणे तृतीय ठरले. सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत ९९ ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला होता.
या वेळी समता पतसंस्थेचे व्हा. चेअरमन अरविंदभाई पटेल, कोपरगाव ज्येष्ठ नागरिक सेवा मंच उपाध्यक्ष दत्तात्रय कंगले, सचिव उत्तमभाई शहा तसेच श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती पुष्पाताई सुतार, उद्योजक कैलास ठोळे, व्यापारी महासंघ कार्याध्यक्ष सुधीर डागा, रजनी गुजराती, शैलेजा रोहोम, जनरल मॅनेजर सचिन भट्टड आदींसह स्पर्धक, हितचिंतक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय गोरे यांनी केले.
चौ
ज्येष्ठ नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. समता पतसंस्थेच्या या उपक्रमातून आरोग्यदायी, आनंदी आणि तणावमुक्त जीवनाचा संदेश देण्यात आला- काका कोयटे