
मुख्य संपादक – राजेंद्र तासकर
कोपरगाव :- आत्मा मालिक ध्यानपीठामुळे कोपरगावचे नाव जागतिक पातळीवर गेले. या ध्यान पिठासाठी स्वागत कमान उभारणीचे काम आपण मार्गी लावू शकलो याचे मोठे समाधान वाटते. कुंभमेळ्याच्या निमीत्ताने या परिसरात आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ. असे प्रतिपादन आमदार विवेक कोल्हे यांनी केले.
सावळिविहीर ते कोपरगाव या अंतरातील महामार्गावर उभारण्यात आलेल्या आत्मा मालिक ध्यानपिठ स्वागत कमानीचे लोकार्पण त्यांच्या हस्ते संपन्न झाले. या निमीत्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आत्मा मालिक ध्यान पिठाचे प्रमुख संत परमानंद महाराज व विश्वात्मक जंगली महाराज आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी संज निजानंद महाराज, संस्थेचे सचिव बाळासाहेब गोर्डे, कोषाध्यक्ष भगवंत होन, विश्वस्त हनुमंत भोंगळे, सहकार महर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे, संभाजी रक्ताटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कोल्हे म्हणाले, कोल्हे परिवाराच्या तिन पिढ्यांपासून आत्मा मालिक ध्यानपिठा सोबत स्नेहसंबंध आहे. सदगुरू माऊलींचे कृपा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत. त्यामुळे स्वागत कमानीचे काम पूर्ण झाल्याने सर्वात मोठे समाधान आणि आनंद मला झाला आहे. या ध्यानपिठाच्या माध्यमातून देश विदेशात मौन आणि ध्यानाचा प्रचार आणि प्रसार केला जातो. आत्मशांतीसाठी जगभरातील भाविक येथे येतात. कुंभमेळ्याच्या निमीत्ताने येथील सर्व तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाविकांची गर्दि होईल. अशा काळात हि स्वागत कमान भाविकांच्या दृष्टीने दिशादर्शक ठरेल.

संत परमानंद महाराज म्हणाले, आमदार विवेक कोल्हे यांनी पाठपूरावा करून या भव्य स्वागत कमानीचे काम मार्गी लावले. आज या कमानीचे लोकार्पण झाले. आश्रमातील संत, साधक आणि सेवकांच्या दृष्टीने हि आनंदाची बाब आहे. विश्वात्मक जंगली महाराज आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांनी स्वागत केले.