
कोपरगाव : – महाविद्यालयाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये करिअर कॉन्सलिंग अॅण्ड प्लेसमेंट सेल अंतर्गत विविध २४ हून अधिक नामांकित कंपन्यांमध्ये २५० हून अधिक विद्यार्थ्यांची निवड झाल्याची माहिती रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अॅण्ड संजीवनी कॉमर्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी दिली.

प्राचार्य डॉ. माधव सरोदे म्हणाले की, शिक्षण हे केवळ नोकरीपुरते मर्यादित नसून सुसंस्कृत समाजनिर्मितीचे प्रभावी साधन आहे. सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी आर्थिक स्वावलंबन गरजेचे असून, विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे कार्य महाविद्यालय करत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे करिअर कॉन्सलिंग अॅण्ड प्लेसमेंट सेल होय. या सेल अंतर्गत O2h, मॅक्लिओड्स फार्मा (अहमदाबाद), Syn Smart (मुंबई), SBI Life (शिर्डी शाखा), Rural Shores Business Pvt. Ltd., Ashwamedh Agritech & Farm Solutions System (कोपरगाव), Macleods Centre of Excellence (सरिग्राम), Axis Bank Pvt. Ltd., TCS, Dev Synthesis (हैदराबाद), ICICI Bank, Infosys, Mahendra Prideya आदी नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
या ड्राइव्हमध्ये २४ कंपन्यांनी महाविद्यालयास भेट देत बुद्धिमत्ता चाचणी व प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांची निवड केली. ग्रामीण भागातील महाविद्यालय असतानाही या कंपन्यांनी महाविद्यालयास प्राधान्य दिले. बँकिंग, इन्शुरन्स, फायनान्स, आयटी, सॉफ्टवेअर टेस्टिंग अॅण्ड डेव्हलपमेंट, सेल्स, मॅन्युफॅक्चरिंग अशा विविध क्षेत्रांत बहुसंख्य विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. दिलीप भोये म्हणाले, “महाविद्यालयाने वर्षभरात ८ हून अधिक कंपन्यांच्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन करून बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बी.सी एस, एम.कॉम., एम.ए.,एम.एस्सी. आदी वर्गातील विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून दिला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभाग सतत कार्यरत असून, त्यांच्या प्रयत्नांमुळेच मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड होत आहे.”
या विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य, मा. सौ चैतालीताई काळे, मा. आमदार विवेक कोल्हे, अॅड. संदीप वर्पे, मा. श्री सुनील गंगुले, माननीय श्री बाळासाहेब आव्हाड, श्री.प्राचार्य डॉ. माधव सरोदे, तीनही विद्याशाखांचे उपप्राचार्य, कार्यालय अधीक्षक श्री. सुनील गोसावी तसेच सर्व विभाग प्रमुख यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.