Homeकोपरगावजवळके येथील भोसले कुटुंबाचे उदार दाईत्व; मरणोत्तर नेत्रदानातून दोघांच्या जीवनांत प्रकाश -...

जवळके येथील भोसले कुटुंबाचे उदार दाईत्व; मरणोत्तर नेत्रदानातून दोघांच्या जीवनांत प्रकाश – डॉ. अशोक गावित्रे.

कोपरगाव :- मृत्यूनंतरही आपल्या डोळ्यांच्या माध्यमातून दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश निर्माण व्हावा, या मानवतावादी भावनेतून कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील गं.भा. सीताबाई एकनाथ भोसले यांनी मरणोत्तर नेत्रदान केले. त्यांच्या या निर्णयामुळे दोन गरजू दृष्टिहीन व्यक्तींना दृष्टी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

जवळके येथील गं.भा. सीताबाई एकनाथ भोसले यांचे आकस्मिक निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी दुःखाच्या प्रसंगीही सामाजिक बांधिलकी जपत नेत्रदानाचा निर्णय घेतला. संबंधित नेत्रदान प्रक्रिया श्री साईनाथ नेत्रपेढीचे आय बँक मॅनेजर तसेच सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक गावित्रे तसेच आबासाहेब सगळगिळे, सचिन घारे, निनाद ब्रदर इत्यादी पथकाच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली.

नेत्रदान हे मृत्यूनंतर करता येणारे अत्यंत मौल्यवान दान आहे. मृत व्यक्तीच्या डोळ्यांतील योग्य कॉर्निया गरजू रुग्णांसाठी वापरला जाऊ शकतो. त्यामुळे एका व्यक्तीच्या मृत्यूनंतरही त्याच्या डोळ्यांमधून दुसऱ्याच्या जीवनात प्रकाश येऊ शकतो.

या प्रसंगी त्यांचा मुलगा शिवाजी व भाऊसाहेब भोसले मुलगी मंदाबाई डांगे, वनिता लबडे व संपूर्ण भोसले परिवार उपस्थित होता तसेच जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिजधाम येथील नवनाथ गुडघे, सुरेश चंदनशिव, अनिल वाघे, दत्तात्रय बारसे, प्रसाद खंडाळे, अरुण मिटके, बाबुराव थोरात इत्यादी सांप्रदायिक भक्तगण देखील उपस्थित होते.

या प्रसंगी अवयवदान समुपदेशक डॉ. अशोक गावित्रे यांनी नागरिकांना नेत्रदानाबाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले. “नेत्रदानाबाबत समाजात अजूनही अनेक गैरसमज आहेत. योग्य माहिती आणि वेळेवर घेतलेला निर्णय यामुळे मृत्यूनंतरही एखाद्या व्यक्तीला दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश देण्याची संधी मिळते. जवळे येथील कुटुंबाचा हा निर्णय निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी आहे, ”असे त्यांनी सांगितले.

पुढे श्री. गावित्रे म्हणाले कि, नेत्रदानासाठी मृत्यूनंतर शक्य तितक्या लवकर संबंधित नेत्रपेढीशी किंवा वैद्यकीय पथकाशी संपर्क साधणे महत्त्वाचे असते. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने नेत्रदानाची इच्छा आपल्या जवळच्या व्यक्तींना आधीच सांगून ठेवावी. “मृत्यू हा शेवट नाही; तर आपल्या डोळ्यांतून कोणत्या तरी दृष्टीहीनांच्या आयुष्यात प्रकाशाची सुरुवात होऊ शकते.” आपण मृत्यूनंतर अप्रत्यक्षरित्या ही दुनिया पाहत असतो हे तितकेच खरे आहे.

जवळके येथील भोसले या कुटुंबाने घेतलेला निर्णय समाजातील इतर नागरिकांसाठीही प्रेरणादायी ठरत असून, “नेत्रदान करा, दृष्टिहिनांचे अंधत्व दूर करण्यासाठी हातभार लावा” असा संदेश या घटनेतून देण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!