Homeकोपरगावएन. एस. एस. मधून व्यक्तिमत्त्व विकास व चारित्र्यसंवर्धन ; राष्ट्रीय सेवा योजना...

एन. एस. एस. मधून व्यक्तिमत्त्व विकास व चारित्र्यसंवर्धन ; राष्ट्रीय सेवा योजना उद्घाटनप्रसंगी प्रा. गणेश निमसे यांचे प्रतिपादन

कोपरगाव:- “खरी संस्कृती आणि खरा वारसा समजून घ्यायचा असेल, तर प्रत्येकाने निसर्गाच्या सान्निध्यात जाणे आवश्यक आहे. स्वतःला निसर्गाशी जोडून घेत नदी, झरे, पर्यावरण आणि जैवविविधतेची जाणीव करून घेणे गरजेचे आहे. समाजसेवेतून व्यक्तिमत्त्व विकास व चारित्र्यसंवर्धन होत असते. त्यामुळे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) ही केवळ उपक्रमापुरती मर्यादित न ठेवता आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनवणे आवश्यक आहे”, असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक तथा न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहिल्यानगर येथील तत्वज्ञान विभागातील सहा. प्रा. गणेश निमसे यांनी केले.

ते रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागिरी महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी भूषविले.

प्रा. निमसे म्हणाले की, २४ सप्टेंबर १९६९ रोजी म. गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना करण्यात आली. प्रारंभी देशातील ३७ विद्यापीठांमध्ये ही योजना सुरू करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा एन.एस.एस.चा मुख्य उद्देश आहे. एखादी गोष्ट समाजासाठी उपयुक्त ठरत नसेल, तर कालांतराने ती नामशेष होते. त्यामुळे बदलत्या काळानुसार तरुणांनी सामाजिक प्रश्न समजून घेऊन त्यावर सकारात्मक कृती करणे आवश्यक आहे.

यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी, ‘Not Me But You’ — ‘स्वतःपेक्षा समाज प्रथम’ हे सांगून एन. एस. एस. चा विद्यार्थ्यांच्या जीवनातील उपयोग स्पष्ट केला. समाजाचा विचार करून केलेली सेवा हीच खरी मानवता आहे. एन. एस. एस.च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या नेतृत्वगुणांना चालना मिळते. श्रमप्रतिष्ठा ही अत्यंत महत्त्वाची असून पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमास महाविद्यालयाचे वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागाचे उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. घनश्याम भगत, डॉ. रंजना वर्दे, डॉ. प्रतिभा रांधवणे, डॉ. नामदेव आडमुठे, डॉ. बाळू वाघमोडे, प्रा. रवींद्र कोरे, प्रा. किरण पवार, प्रा. अनिता गोरे, प्रा. तेजस होन, प्रा. प्रसाद हाडोळे यांच्यासह महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक,पाहुण्यांचे स्वागत व परिचय एन.एस.एस कार्यक्रम अधिकारी तथा कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. बंडेराव तऱ्हाळ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शीतल कदम यांनी केले आणि आभार एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. महेश दिघे यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!