
कोपरगाव :- गणेशोत्सव हा आपल्या समाजाच्या श्रद्धा, संस्कृती आणि परंपरेशी जोडलेला महत्त्वाचा उत्सव आहे. या श्रद्धेचा आदर राखत गणेशमूर्तींचे विसर्जन करताना नदी, तलाव व जलस्रोतांचे प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेणे ही आपल्या सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे. त्यासाठी नगर परिषदेने गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यासाठी प्रभावी व शास्त्रीय व्यवस्था करावी असे मागणी महाराष्ट्र राज्य अंधश्रध्दा निर्मुलनाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक गावित्रे यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

आपल्या पत्रकात पुढे डॉ. गावित्रे म्हणाले कि, गणेशमूर्तींचे विसर्जन थेट नदी अथवा नैसर्गिक जलस्रोतांमध्ये केल्यामुळे मूर्तींचे अवशेष, रंग, सजावटीचे साहित्य व निर्माल्य पाण्यात मिसळण्याची शक्यता असते. त्यामुळे जलस्रोतांचे प्रदूषण आणि त्याचा जलचर व पर्यावरणावर होणारा परिणाम टाळण्यासाठी कोपरगाव नगरपालिकेने विसर्जनाची शास्त्रीय, सुरक्षित आणि नागरिकांना सहज उपलब्ध होईल अशी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कोपरगाव तालुका यांच्यावतीने कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे खालील मागण्या करण्यात आल्या आहे.
▪️नदीमध्ये थेट गणेशमूर्ती विसर्जन टाळण्यासाठी शहरातील प्रमुख ठिकाणी मोठ्या क्षमतेचे कृत्रिम विसर्जन तलाव/हौद उपलब्ध करून द्यावेत.
▪️ प्रत्येक कृत्रिम विसर्जन केंद्रावर पाणी, प्रकाश, सुरक्षा व्यवस्था, स्वयंसेवक आणि आपत्कालीन मदत उपलब्ध करून द्यावी.
▪️नागरिकांना नदीऐवजी कृत्रिम विसर्जन केंद्राकडे वळवण्यासाठी नगरपालिका स्तरावर विशेष जनजागृती मोहीम राबवावी.
▪️‘मूर्ती दान – पर्यावरण संरक्षण’ किंवा नगरपालिका स्तरावर अधिकृत संकलन केंद्र सुरू करून इच्छुक नागरिकांच्या मूर्ती शास्त्रीय पद्धतीने विसर्जित/व्यवस्थापित करण्याची सुविधा द्यावी.
▪️ विसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्य व मूर्ती यासाठी स्वतंत्र संकलन व्यवस्था करावी. निर्माल्य नदीमध्ये टाकले जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
▪️गणेश विसर्जनासाठी नदी, तलाव किंवा इतर नैसर्गिक जलस्रोतांवर गर्दी होऊ नये यासाठी पुरेशी कृत्रिम विसर्जन केंद्रे आणि दिशादर्शक फलक उभारावेत.
▪️विसर्जनानंतर कृत्रिम तलावातील पाणी, गाळ व मूर्तींचे अवशेष यांची पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासनाने घ्यावी.
▪️घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी नागरिकांना घरच्या घरी किंवा सोसायटी/गणेश मंडळांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक विसर्जनाच्या पद्धतींबाबत मार्गदर्शन करावे.
▪️सार्वजनिक गणेश मंडळांना विसर्जनाच्या आधीच पर्यावरणपूरक विसर्जन केंद्रांची माहिती, वेळा आणि मार्ग उपलब्ध करून द्यावा.
▪️गणेश विसर्जनाच्या दिवशी विशेष नियंत्रण कक्ष सुरू करून नागरिकांच्या तक्रारी व अडचणींसाठी हेल्पलाइन उपलब्ध करून द्यावी.
आमची भूमिका,आमचा उद्देश गणेशोत्सवाच्या श्रद्धेला विरोध करणे नसून, श्रद्धा आणि पर्यावरण संरक्षण यांचा समन्वय साधणे हाच आहे.”
गणेशमूर्तीचे विसर्जन हा उत्सवाचा एक भाग आहे; परंतु आपले जलस्रोत हे पुढील पिढ्यांची संपत्ती आहेत. त्यामुळे गणेशभक्तांना सन्मानपूर्वक, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून देणे ही नगरपालिका प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे. तरी
वरील मागण्यांवर तातडीने सकारात्मक कार्यवाही करून कोपरगाव शहरात पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाचा आदर्श निर्माण करावा, अशी मागणी डॉ. अशोक गावित्रे सामाजिक कार्यकर्ते तथा अध्यक्ष कोपरगाव तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांनी निवेदनाद्वारे कोपरगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.