
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव :-आपल्या विविध मागण्या मंजूर करून घेण्यासाठी महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने दिव्यांगांचे वादळ 9 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकणार असल्याची माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली.

माजी.मंत्री व प्रहार संघटनेचे संस्थापक तथा दिव्यांग मंत्रालय प्रमुख ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली 9 ऑगस्ट रोजी दिव्यांगांचा अति विराट जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दिव्यांगांना सहा हजार रुपये मासिक मानधन मिळावे,धर्मवीर आनंद दिघे साहेब घरकुल योजनेची अंमलबजावणी लवकरात लवकर होऊन सरसकट घरकुल मिळावे, दिव्यांगांची प्रत्येक क्षेत्रात नोकर भरती करण्यात यावी,दिव्यांगांना राजकीय आरक्षण मिळावे,दिव्यांग व्यक्तींना व्यवसायासाठी जागा आणि बिनव्याजी कर्ज मिळावे,अपंग वित्त महामंडळ व बीज भांडवल कर्जमाफी मिळावी या मागण्यांसह विविध मागण्यांसाठी सदरील आंदोलन छेडण्यात आले असल्याची माहिती मा.श्री.बच्चूभाऊ कडू यांनी दिली.
छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकातून दुपारी बारा वाजता मोर्चाला सुरुवात होणार असून हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकणार आहे.या दिव्यांग आक्रोश मोर्चामध्ये महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मुंबई आदि भागातील अंध मूकबधिर कर्णबधिर बहु विकलांग असे सर्वच प्रकारचे दिव्यांग महिला पुरुष सहभागी होणार आहेत.
दिव्यांगांच्या अस्तित्वाची व न्याय हक्काची ही आरपारची लढाई असून या अति विराट मोर्चात राज्यातील सर्व दिव्यांगांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष उत्तर अहिल्यानगर तथा संस्थापक अध्यक्ष दिव्यांग शक्ती सेवा संस्था यांनी केले आहे.