
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : – सर्रास चहासाठी वापरले जाणारे कागदी कप,बनवताना त्यात बी.पी.ए नावाचे केमिकल वापरले जाते तसेच कपामध्ये हायड्रोफोबिन फिल्मचा थर आतून दिला जातो. ज्यावेळी गरम चहा सदर कपामध्ये टाकला जातो त्यावेळी गरम चहासोबत तो घटक चहामध्ये विरघळून पोटात जातो, त्यापासून कॅन्सरचा धोका उद्भवतो असे तज्ञांच्या संशोधनात सिध्द झालेआहे.एका चहाच्या कपासोबत पंचवीस हजार मायक्रोम प्लास्टिक पोटात जाते हे सामान्य जनतेच्या जीवितास हानिकारक आहे, तरी चहाच्या कागदी कपावर बंदी घालावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक गावित्रे यांनी कोपरगाव नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या आपल्या निवेदनात पुढे श्री.गावित्रे म्हणाले कि, सदर नगरपालिका व ग्रामपंचायत हद्दीतील सर्व चहा,कॉफी टपरीधारकांची आपापल्या स्तरावर एक बैठक आयोजित करावी व त्या बैठकीत चहा, कॉफीसाठी वापरले जाणारे कागदी कप न वापरण्याचा निर्णय घ्यावा असेही सामाजिक कार्यकर्ते डॉ.अशोक गावित्रे यांनी सुचविले आहे.
सदर बैठकित घेतलेल्या नियमांचे उल्लंघन करणारास दंड म्हणून पहिल्या वेळेस रुपये ५००, दुसऱ्यांदा १०००, तिसऱ्यांदा १५०० त्यानंतर मात्र, नियमाचे वारंवार उल्लंघन केल्यास त्यांचा व्यवसाय परवाना रद्द करावा असेही त्यांनी सूचित केले आहे.
सदर बैठकीत घेतलेल्या निर्णयासंदर्भात ठिकठिकाणी फलक लावावेत व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी व कागदी कपावर त्वरित बंदी घालावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे,
पर्यावरण विभागाने यावर अगोदरच बंदी घातली असुन अनेक जिल्हात यावर बंदी घालण्यात येत असून कोपरगाव तालुक्यात यावर तात्काळ अमलबजावणी व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व ए.जी फिल्मचे डायरेक्टर डॉ.अशोक गावित्रे यांनी आपल्या निवेदनात शेवटी केली आहे.