
कोपरगाव : – मेढेगिरी समितीचे अहवालाचे पुनःअवलोकनसाठी स्थापन केलेल्या मांदाडे समितीचा अहवाल सादर झालेला आहे. यावर महाराष्ट्र जलसंपदा विभागाने हरकती मागविल्या आहेत.पंरतु सामान्य शेतकरी व सुशिक्षित जनतेला युती सरकारने हरकत नोंदणी साठी ई-मेल पत्ता जाहीर करणे गरजेचे आहे. तरी mwrra@mwrra.in व secretary@mwrra.in हा आहे , याची नोंद घेऊन हरकत घेण्यात शेतकऱ्यांचे हित दडलेले आहे. सद्या तयार केलेला समिती अहवाल हा पुर्णतः अस्विकारणीय आहे, त्यातील शिफारशी अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यांना उध्वस्त करणारा असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव नितिन मनोहर शिंदे यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

आपल्या पत्रकात पुढे श्री. शिंदे म्हणाले की,या अहवालातील मेंढेगिरी समितीच्या शिफारशीनुसार उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील भंडारदरा, मुळा, गंगापूर, दारणा आदी धरणांमधून सप्टेंबरच्या सुरवातीपासूनच पाणी सोडणेबाबत शिफारस केली आहे. यात परतीच्या पावसाचाही समावेश असतो. जर वरील बाजूची धरणे सप्टेंबर मध्ये मोकळी केली तर पुढील महिन्यात पाऊस न पडल्यास वरच्या भागातील सर्व धरण परिसरात भयानक परिस्थिती निर्माण होईल व परतीच्या पावसाने फक्त जायकवाडी धरण भरले तर त्यातील पाणी खाली सोडून द्यावे लागेल. हा मुद्दा करून शिफारस केली आहे. परंतु, समीतीने पहिले जायकवाडी धरण भरण्याची शिफारस केली आहे. त्यात अधिक अजून एक शिफारस केलेली आहे, पाणी केव्हा व किती सोडणे यासाठी महाराष्ट्र रिमोट सेंसिंग सेंटर, नागपूर यांचेकडून सॉफ्टवेअर तयार करून घेण्यात आले आहे. सदर संस्थेस जल सिंचन विभागाचा कुठलाही अनुभव नाही. त्या कंपनीला कुठल्या गुणवत्ता बघून अथवा पडताळणी करून दिला हे अनेक शंका उत्पन्न करणारे असल्याचेही म्हटले आहे.

सदर कंपनीकडील उपलब्ध नकाशे, पिक क्षेत्र वस्तुस्थितीला धरुन नाही. कुठेही त्यांचे ह्या प्रकारचे सॉफ्टवेअर कुठेही कार्यरत नाही. असे असताना वरील धरणातील पाणी सोडणे अधिकार वा प्रकारच्या सॉफ्टवेअरला अथवा संस्थेला देणे हे संयुक्तिक नाही.
समितीच्या अनेक शिफारशी पैकी एक जायकवाडी धरण पूर्ण भरल्यानंतरच अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील खरिप पिकाला नद्यांचे पाणी देण्यात यावेत. भंडारदरा, गंगापूर धरणांच्या अगोदर बांधलेली बंधने जायकवाडी धरणाच्या नियोजनामध्ये या बावी गृहित धरल्या गेल्या होत्या. जर खरिपात याप्रकारे पाणी मिळाले नाही तर अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील शेती पुर्णपणे उध्वस्त होईल हा सर्व परिसर अवर्षणग्रस्त म्हणजेच कमी पर्जन्यमानामुळे वारंवार दुष्काळ पडणारा परीसर असल्याचीही खंत त्यांनी व्यक्त केली.
गोदावरी खोऱ्यातील पाणीवाटप हे गोदावरी पाणी तुट वाटणी या पद्धतीने होणार परंतू, फक्त उर्ध्व वैतारणा प्रकल्पातून मिळणाऱ्या ५०० द. ल. घ. मि. पाण्याने ही तूट भरून निघणार असीच समितीची मानसिकता दिसते. चूकीच्या संकल्पनेवर नियोजन करण्याऐवजी पाणी उपलब्धता वाढविणे हा उपाय आहे. परंतु,दुर्दैवाने मांदाड समितीने याकडे दुर्लक्ष केले आहे. तसेच जायकवाडी धरणाचे बाष्पीभवनाद्वारे होणाऱ्या नुकसानी बाबत आकडेवारीत तफावत आहे. याकडेही श्री शिंदे यांनी कटाक्षाने लक्ष केंद्रीत केले आहे.
गोदावरी खोऱ्यातील भंडारदरा, मुळा, दारणा, गंगापूर, निळवंडे व इतर सर्व धरणांचा पाणीसाठा गोदावरी जलाशय नियमन गटाकडे देण्याचे प्रस्तावित आहे. सदर गट छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहे. तेथील निम्नस्तरावरील अधिकारी चाचणी न झालेल्या सॉफ्टवेअरचा आधार घेऊन जर दुष्काळी परिस्थितीत गोदावरी खोऱ्यातील २० पेक्षा जास्त धरणांचे पाणी नियोजन करणार असतील तर हे पुर्णपणे चुकीचे आहे. तसेच जायकवाडी धरणाचा मृत पाणीसाठा हा अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील २० प्रमुख धरणांच्या एकत्रित पाणी साठ्याच्या दीडपट आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीमध्ये जायकवाडी परिसरातील पशुधन व चारा यासाठी या मृत साठ्यातील पाण्याचा वापर करणे शक्य आहे. तरी वरच्या धरणांतील पाण्याला हात लावू नये असेही शेवटी शेतकरी नात्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव नितिन मनोहर शिंदे यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकाव्दारे ठणकाऊन सांगितले आहे.