Homeकोपरगावपरमेश्वराचा साठा कधीच संपत नाही, सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारा भगवंतच - आचार्य...

परमेश्वराचा साठा कधीच संपत नाही, सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारा भगवंतच – आचार्य शिरीष महाराज.

कोपरगांव :- मनुष्यप्राण्याचे कधीही समाधान होत नाही, त्याचे पोट भरलं तरीही त्याची हाव सुटत नाही. प्रत्येकाच्या इच्छा पुर्ण करण्याची क्षमता परमेश्वराकडेच आहे, तेंव्हा आयुष्यात कितीही कष्ट पडले तरी भगवंताचे नामस्मरण करा, नवनाथ भक्ती अत्यंत सोपी आहे त्यातुन प्रत्येक संकटाचे हरण होते असे प्रतिपादन हरिद्वार येथील आचार्य शिरीष महाराज यांनी केले.

येथील मुंबादेवी तरूण मंडळाच्यावतीने ३२ वर्षापासुन रामनवमीनिमीत्त साईगांव पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते त्यानिमीत्त संत ज्ञानेश्वर नगर तहसिल कार्यालय मैदान कोपरगांव येथे नवनाथ भक्ती कथासारचे दुसरे पुष्प गुंफतांना ते बोलत होते.

आचार्य शिरीष महाराज पुढे म्हणाले की, जेंव्हा ब्रम्हदेवाने या सृष्टीचे निर्माण केले तेंव्हा भगवान विष्णुने त्यांचे अंश स्वरूपात ब्रम्हांडात अवतार धारण केले, त्यांना नवनारायण असेही म्हणतात त्यातुन सृष्टीला अलौकीक रूप प्राप्त झाले आहे. नाथांचे मुळ गुरू हे अदिनाथ म्हणजेच शिव आहे आणि त्यांचा दत्त सांप्रदायाशी मोठा संबंध आहे. नाथांचे मुळ उगमस्थान त्रंबकेश्वर ब्रम्हगिरीचा डोंगर होय.

मच्छिंद्रनाथ (कविनारायण, गुरू दत्तात्रेय), गोरक्षनाथ (हरिनारायण, गुरू मच्छिंद्रनाथ), गहिनीनाथ (करभाजन नारायण, गुरू गोरक्षनाथ), जालिंदरनाथ (अंतरिक्ष नारायण -गुरू दत्तात्रेय), कानिफनाथ (प्रबुध्द नारायण, गुरू जालिंदरनाथ), भर्तरीनाथ (द्रमुलनारायण-गुरू दत्तात्रेय), रेवणनाथ (चमसनारायण, गुरू दत्तात्रेय), नागनाथ (कविनारायण, गुरू दत्तात्रेय), चरपटीनाथ (पिप्पलायन नारायण- गुरू दत्तात्रेय) या नउ नाथांनीच प्रत्येकाला उत्कर्षाचा मार्ग दाखविला आहे.

मांसाहार, मद्यपान करू नका, हया गोष्टी मुला-बाळांवर विपरीत परिणाम करतात. त्यातुन घराची शांतता भंग होते. भगवंत, साधु-संत, मायबाप आयुष्यात आले की, जीवन चांगले होते. जेथे सत्यता आहे तेथेच सत्संग आहे. भगवंताकडे कुणी कितीही मागितले तरी तो सर्वांच्याच इच्छा पुर्ण करत असतो., तो कधीच म्हणत नाही माझेकडचे संपले आहे. भगवंत ज्याला त्याला त्याच्या कर्मानुसार फळ देत असतो.

शील, स्नेह, आशा, धैर्य, विवेक, विग्रह आदि सर्व ठिकाणी नाथ आहे. जेथे क्रोध, लोभ, इर्षा, द्वेष, मोह, माया, मत्सर, आळस आहे तेथे नाथांचे वास्तव्य कधीच नसते. आज प्रत्येक घरात कलह आहे. घराघरात मंथरा शिरलेल्या आहेत., तर मुलांच्या हातात गीता, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा ऐवजी भ्रमणध्वनी दिसत आहेत त्यामुळे संस्कार लोप पावत चालले आहे.

साधु-संत भगवंताच्या रूपात येवुन आपल्याला सन्मार्ग दाखवितात. मनुष्य वेळेनुसार देवही बदलवत आहे. निती-नियती बदलली की, देवही बदलतो, नको त्या गोष्टीकडे मनुष्य मोठ्या प्रमाणात वाहवत जाताना दिसत आहे. नाथ समजुन घेतल्याशिवाय समजत नाही. ज्या भाविकांना भक्ती जमत नाही त्यांनी भगवंतावर विश्वास ठेवुन आत्मीक समाधान मिळवावे. भगवंत चराचरात भरलेला आहे, त्याने ब्रम्हांडातील उर्जा काढली तर सर्व जीवनच अवघड होवुन जाईल.

प्रत्येकांने आयुष्यात गुरू केलाच पाहिजे. गुरू नेहमीच भल्याचा मार्ग सांगतात. हल्लीच्या युगात ग्रंथ हेच गुरू आहेत. प्रत्येकाच्या दारात भल्या सकाळी वासुदेव येतो पण मनुष्य खोटं बोलुन त्याला दुसरं घर दाखवतो, तेंव्हा दारात आलेल्यांचे आशिर्वाद घ्यायला शिका असेही ते म्हणाले. या कार्यक्रमास महिला भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे.


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!