Homeकोपरगावअहमदनगर जिल्हा पत्रकार संघाचे माजी उपाध्यक्ष सुरेश रासकर यांचे निधन

अहमदनगर जिल्हा पत्रकार संघाचे माजी उपाध्यक्ष सुरेश रासकर यांचे निधन

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगांव : – अहमदनगर जिल्हा पत्रकार संघाचे माजी उपाध्यक्ष व कोपरगांव येथील ज्येष्ठ पत्रकार, श्रीलक्ष्मी अॅडव्हरटायझिंगचे मालक सुरेश दगडोबा रासकर (७७) वेळापूरकर यांचे दिर्घ आजारांने पुणे येथे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, अशोक, सुधाकर, जयंत तीन भाउ, नलिनी फुलसुंदर, विजया गायकवाड, जयश्री बोरावके, सुनिता भुजबळ चार बहिणी, जावई समित कानपीळे, सुन, नातवंडे असा मोठा परिवार आहे. संगणक तज्ञ शंकेश यांचे ते वडील होते. त्यांच्या पार्थीवावर कोपरगांव अमरधाम येथे आज मंगळवार (१० जुन) सायंकाळी अंत्यसंस्कार होत आहे, दैनिक सार्वमत वृत्तपत्राच्या जडणघडणींत त्यांचा सिंहाचा वाटा होता. अध्यात्मीक नान्नीज देवस्थान नरेंद्र महाराज यांचे राज्य प्रसिध्दीप्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले होते.

कै. सुरेश दगडोबा रासकर यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत ग्रामिण भागातुन पत्रकारितेला सुरूवात केली. तत्पुर्वी त्यांनी श्रीरामपुर येथील किशोर चित्रपटगृहात काम केले. पिअरलेस कंपनी प्रतिनिधी म्हणून त्यांनी महाराष्ट्र राज्यासह भारतभर भ्रमण करत व्यवसाय केला. दैनिक सार्वमत कोपरगांव तालुक्यात ज्येष्ठ अबाल वृध्द, राजकारणींसह वाचकांच्या मनांत रूजविण्यांत त्यांचा सिंहाचा वाटा होता. श्रीलक्ष्मी अॅडव्हरटायझिंगच्या माध्यमांतुन त्यांनी भारतभरातील विविध भाषिक वर्तमानपत्रे मासिके आदि माध्यमांत जाहिरातीं प्रसिध्दीचा व्यवसाय केला. इंडियन एक्सप्रेस, टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रांने त्यांच्या एजन्सीला अहिल्यानगर जिल्हा अधिकृत जाहिरात डेपो म्हणून मान्यता दिली होती. दैनिक सार्वमत, तरूणभारत, रामभुमी, गांवकरी, देशदुत, महाराष्ट्र टाईम्स, लोकमत आदि वर्तमानपत्राचे बातमीदार म्हणून त्यांनी प्रदिर्घकाळ काम केले. त्यात त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले.

कोपरगांवचे ज्येष्ठ पत्रकार स्व. शं. पा. कपिले, सी. बी. गंगवाल, तुकाराम बाळाजी मंडलिक, स.म. कुलकर्णी, अशोक खांबेकर यांच्याबरोबर त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात कोपरगांवचे वार्ताहर म्हणून कामास सुरूवात केली होती.

माजीमंत्री स्व. शंकरराव काळे, स्व. शंकरराव कोल्हे, स्व. बाळासाहेब विखे, स्व. भिमराव बडदे यांच्यासह कित्येक राजकारणी मंडळींना जिल्हयात नावांरूपास आणण्यांतही त्यांचा हातखंडा होता. विविध वर्तमानपत्राच्या प्रसंगानुरूप पुरवण्या प्रकाशित करण्यांत त्यांनी नांवलौकीक मिळविला होता. नागपुरचे ज्येष्ठ पत्रकार स्व. व्यंकटेश भोपे यांच्या माध्यमांतुन त्यांनी बातमीदारीतील वार्तापत्र लेखन कला आत्मसात केली होती. स्व. विधीज्ञ भाऊ बोर्डे, स्व. भीमराव बडदे, विधीज्ञ पी.सी. धाडीवाल यांच्या सहकार्याने त्यांनी कोपरगांव बसस्थानक येथे गोर-गरीब, मजुर, हमाल मापाडी, शेतकरी आदिंना ना नफा ना तोटा या तत्वावर जिल्हयातील पहिले झुणका भाकर केंद्र सुरू करून व्यवसायिक उपक्रम राबवला होता. माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख, सुशील कुमार शिंदे, स्व. गोविंदराव आदिक, स्व. रामराव आदिक, साईबाबा संस्थानच्या माजी अध्यक्ष डॉ. लेखा पाठक यांच्यासह, सिने सृष्टीतील आघाडीचे नायक, नायिका यांच्याबरोबर सलोख्याचे संबंध होते. त्यांच्या जाण्यांने पत्रकारिता क्षेत्रातील नवोदित पत्रकारांचे मार्गदर्शक, जाणकार हरपले अशा शब्दात संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी शोक व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!