
कोपरगांव :- भारतीय टपाल विभागाच्या विविध जनकल्याणकारी योजना, गुंतवणुक योजना व सेवा याची माहिती सर्वसामान्यांसह नागरिक, ग्राहकांपर्यंत पोहचावी यासाठी डाक अधिक्षक श्री. उमेश जनवाडे यांच्या मार्गदर्शनांखाली कोपरगांव येथे भव्य जनजागृती रॅलीचे मंगळवारी यशस्वी आयोजन करण्यांत आले होते.
डाक निरीक्षक श्री. संतोष केंद्रे यांनी टपाल विभागाअंतर्गत असणा-या सर्व जनकल्याणकारी योजनांची माहिती देवून त्याच्या प्रचार आणि प्रसाराचे उददीष्ट सांगितले. कोरोना सारख्या आपत्तीत भारतीय पोष्ट खात्याने जीवाची पर्वा न करता अत्यावश्यक सेवा सुविधांचा लाभ जनसामान्यांपर्यंत पोहोचविला, डिजीटल हायटेक क्रांतीत आपली गुंतवणुक अधिक सुरक्षीत रहावी यासाठी नवजात बालकापासुन ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत लाभाच्या कोणत्या योजना आहेत त्याबाबत सविस्तर विवेचन करून माहितीपत्रकांचे वाटप करण्यांत आले. प्रारंभी पोष्टमास्तर रविंद्र परदेशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
सदरची जनजागृती रॅली कोपरगांव शहरातील मुख्य रस्ता, प्रमुख बाजारपेठ, तहसील कार्यालय मार्गासह प्रभागातुन काढण्यांत आली त्याचे जनतेत मुख्य आकर्षण होते. या रॅलीमध्ये टपाल खात्याच्या विविध बचत योजना, विमा योजना, आयपीपीबी, पार्सल व इतर नागरिकोपयोगी सेवांच्या माहितींचे फलक हाती घेत कोपरगांव पोष्ट कार्यालयातील सर्व कर्मचारी, ब्रँच कार्यालय तसेच पोहेगांव, शिंगणापुर, साकरवाडी, कोळपेवाडी, शिर्डी सब पोष्ट कार्यालय अंतर्गत सर्व कर्मचारी, ग्रामिण डाकसेवक यात मोठया संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीचे सर्वत्र स्वागत करण्यांत आले.