

कोपरगांव : – तालुक्यातील नगर मनमाड महामार्गावरील अंबिका धोंडीबानगरीत साईभक्त धोंडीरामबाबा चव्हाण यांचे साईसेवेतुन अध्यात्माची शिकवण देण्यांत मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्थ सुमित कोल्हे यांनी केले.

सालाबादप्रमाणे याही वर्षी साईधामचा सव्वीसावा वर्धापनदिन सोहळा सोमवारी मोठ्या भक्तीमय वातावरणांत साजरा करण्यांत आला त्याप्रसंगी ते बोलत होते. या वर्धापनदिन सोहळ्यास महाराष्ट्र, पंजाब, गोवा, हरियाणा, गुजराथ, कर्नाटक, नविदिल्ली यासह देश विदेशातील साईभक्त उपस्थित होते.
साईबाबा मंदिर,धोंडीबाबा समाधीमंदिर, ध्यानधारणा केंद्र, मनोकामना वृक्ष, जुनी कुटी, आदि परिसर विशेष फुलांच्या सजावटींने सजविण्यांत आला होता. प्रारंभी विजय नायडु, सुरेश चव्हाण, एकनाथ चव्हाण व साहेबराव मढवई यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

येथील साईभक्त धोंडीरामबाबा चव्हाण निर्मीत साईधाम साईबाबा मंदिराचा सव्वीसावा वर्धापनदिन सोमवारी साजरा झाला याप्रसंगी आंतरराष्ट्रीय ड्रमवादक शिवामणी व त्यांच्या कुटूंबियांनी साईभजन सेवा साईधाम चरणी अर्पण केली.
साईभक्त व पदमश्री पुरस्कारप्राप्तकर्ते तसेच आयपीएल क्रिकेट स्पर्धेत ड्रमवादक म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रियता मिळविलेले शिवामणी व त्यांच्या कुटूंबियांनी साईधाम येथे ड्रमवादनासह भजनाची सेवा दिली. सुप्रसिध्द संगितकार ए आर रहेमान व शिवामणी हे लहानपणांपासुनचे मित्र आहे. शिवामणी यांना ढोल, ऑक्टोबन, दरबुका, उदुकाई, घटम आणि कांजिरा यासह अनेक वाद्ये वाजविता येतात. त्यांना २०१९ मध्ये भारत सरकारच्या पदमश्री पुरस्काराने गौरविण्यांत आले. साईधाम चरणी दिलेल्या सेवेतुन आत्मसमाधानाची अनुभुती येथे प्रत्येक वर्षी होते असे उदगार प्रसिध्द ड्रमवादक शिवामणी यांनी काढले. गोवा येथील घुंगट आरती कलाकारांनीही बहारदार भजनसंध्या सादर केली. माध्यान्ह आरती अगोदर साईप्रतिमेची विशेषरित्या सजविण्यांत आलेल्या पालखीतुन सवाद्य मिरवणूक काढण्यांत आली. याप्रसंगी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान यांच्यासह पंचक्रोशीतील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, साईभक्त आदि मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यांत आले. शेवटी सुरेश चव्हाण यांनी आभार मानले.