कोपरगाव :- संबंधीत प्रशासकीय कार्यालयास तोंडी अथवा लेखी निवेदन देऊन ही आमच्या मागणीची दखल न घेतल्याने मा. तहसिलदार सावंत साहेब यांना दि.20 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या निवेदनात मागणी नुसार काम न झाल्यास अर्जदार यांनी 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मी आत्महदन करणार असल्याचे नमुद केले आहे.

सविस्तर वृत्त असे की, शहरातील निवारा कॉर्नर ते नक्षत्र मंगल कार्यालय (एमडीआर 99 ) या जुन्या टाकळी रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते विजय सुधाकर जाधव यांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेत १ मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

सदर रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. वाढत्या वर्दळीमुळे रस्ता पूर्णपणे उखडून गेला असून, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती किंवा खड्डे बुजवण्याचे कामही झालेले नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.
या मागणीसाठी विजय जाधव यांनी २० एप्रिल रोजी कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन दिले होते. काम तातडीने सुरू न झाल्यास १ मे रोजी आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी या निवेदनात दिला होता.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत तहसीलदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांना तसेच कोपरगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. संबंधित यंत्रणांनी या प्रश्नात लक्ष घालून रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, अशा सूचना तहसिलदार महेरा सावंत यांनी संबंधितांना देऊनही काही कालावधी उलटला असून अद्याप रस्त्याचे काम चालू न झाल्याने मी माझ्या निर्णयावर ठाम असल्याचे अर्जदार विजय सुधाकर जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.