
कोपरगाव :- तालुक्यातील कुंभारी येथील प्रगतशील शेतकरी, सहकार महर्षी स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांचे कट्टर कार्यकर्ते, कुंभारी गावचे माजी सरपंच, ५५ वर्षे टीडीपी चे संचालक, पाच वर्षे देश सेवेत स्वतंत्र सेनानी, शाळेसाठी भुमीदान देणारे, खेडलेझुंगे येथील ह भ प काशीनाथ महाराज यांचे निस्सीम भक्त, २५ वर्षे पांडुरंगाच्या पायी दिंडी वारी केलेले तसेच प्रत्येक एकादशीला पंढरपूरला जाऊन पांडुरंगाच्या दर्शनाचा लाभ घेणारे, शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञानेश्वरी चे वाचन अविरत सुरु असलेले हभप वैकुंठवासी भिकाजी काशिनाथ बढे यांचा पांडुरंगावर असलेला दृढ विश्वास आणि भक्तीच्या जोरावर त्यांनी तब्बल आठ दिवस अगोदर स्वतःच्या मृत्युचा दिनांक स्वमुखातून जाहिर करून अगदी त्याच दिवशी वयाच्या ९२ व्या वर्षी म्हणजे २ जून २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता आपला मानव देह सोडुन वैकुंठ गमन केले. म्हणुनच असे म्हणावेसे वाटते की, भगवंताची निष्ठेने व श्रद्धेने केलेली सेवा व्यर्थ जात नाही; कलियुगात याचा प्रत्यय कुंभारीकर वासियांना आला आहे. अशा या महान भगवंत भक्तास कोटी कोटी वंदन तसेच त्यांना पांडुरंग चरणी जागा मिळो हिच सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली.

वै. हभप भिकाजी काशिनाथ बढे यांनी स्वतंत्र्य सेनानी म्हणून पाच वर्षे देश सेवेस अर्पण केल्याबद्दल कोपरगाव येथील माजी सैनिक संघाच्या वतीने त्यांच्या पार्थिवास सैनिकांनी खांदा देतं सामुहिक पुष्पहार अर्पण करून त्यांच्या सेवेस सलामी देतं श्रध्दांजली अर्पण केली.
त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुलं, एक मुलगी, सुना, नातवंड, जावई असा मोठा परीवार आहे.
सहकार महर्षी स्व. शंकररावजी कोल्हे साहेब सहकारी साखर कारखाना, कर्मवीर स्व. शंकररावजी काळे साहेब सहकारी साखर कारखान्याच्या वतीने तसेच अनेक मान्यवरांनी आपापल्या भाषणातून श्रद्धांजली अर्पण केली.
॥ ओम शांती॥ ओम शांती॥ ओम शांती॥