
कोपरगाव : – भविष्यातील आव्हानांकडे दर्लक्ष करायचे नसते, भूतकाळातील गोष्टी विसरायच्या आणि उद्याच्या समस्यांवर लक्ष केंद्रीत करून वर्तमानातील कामगिरी सुधारायची असते या शिकवणुकीतुन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष श्री. बिपीनदादा कोल्हे यांनी समाजकारणांत आपले स्वतःचे आगळे वेगळे स्थान निर्माण करत गांवच्या, परिसराच्या, तालुक्याच्या, जिल्हयाच्या, राज्याच्या प्रगतीत कसे योगदान द्यायचे हा अमुलाग्र विचार ठेवत त्यांनी समाजहितासह शेतक-यांच्या आर्थीक उन्नतीत मोलाची भर घालण्याचा प्रयत्न केला आहे. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी संजीवनी उद्योग समूहाचे साम्राज्य उभे केले ते टिकवून ठेवत त्याच्यात वाढ करण्याचे काम बिपिनदादा कोल्हे यांनी प्रामाणिकपणे केले आहे. संस्था उन्नतीचे साधन आहे त्यातून रोजगार स्वयंरोजगाराला प्राधान्य देवुन नाविन्यपुर्ण घटना सुरू ठेवायच्या हा विचार त्यानी समाजकारणात पाऊल ठेवतानाच केला.

मनुष्याची ओळख त्याच्या कलागुणांने होत असते. स्वतःच्या आवडी -निवडी, ज्ञान संपादन करण्याची लालसा आणि मिळालेल्या ज्ञानातुन जनसामान्यांच्या प्रश्नांची किती प्रमाणात कड लावली हा हेतु अधिक शक्तीशाली असतो. आज ज्ञान तंत्रज्ञान वेगाने बदलत चालले आहे. संगणकीकरण वेगाने वाढत आहे, त्यातुन निर्माण झालेल्या कृत्रीम बुध्दीमत्तेचा येथील शेतक-यांना किती फायदा होईल यावरही श्री. बिपीनदादा कोल्हे यांनी मौलिक काम केलेले आहे.
२१ जुन हा त्यांचा वाढदिवस, या दिनाला आणखी एक महत्व आहे ते आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी भारतीय योग परंपरा जागतिक स्तरावर पोहोचवत २१ जुन हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करण्यांस जगभराची मान्यता मिळविली त्यामुळे या दिनाचे खास वैशिष्ट्य आहे. संस्थेच्या उन्नतीत आर्थीक आरोग्य महत्वाचे असते तद्वत मनुष्याचे आरोग्य त्याच्या शरीरावर अवलंबुन असते त्यामुळे योग साधनेतुन शरीर साधना टिकविण्यासाठी त्यांचे सतत मार्गदर्शन सुरू असते.
माजीमंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांनी कष्टकरी शेतकरी वर्गाचे प्रतिनिधीत्व करत त्यांच्या उत्कर्षांत आपला उत्कर्ष मानत येथील सहकारी संस्थांची रचना करत त्यातुन परिसराचा कायापालट घडविला आहे. वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत बिपीनदादा कोल्हे यांनी स्वतःला घडवत समाजाचं आपण देणं लागतो या हेतुने प्रत्येक विकासात्मक कार्यावर भर दिला आहे.
श्री. बिपीनदादा कोल्हे हे स्वतः बी. एस्सी कृषी पदवीधर आहे. डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ (विदर्भ-अकोला) येथून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यादरम्यान ते १९८२.८३ मध्ये विद्यापीठ प्रतिनिधी म्हणूनही उत्तमपणे काम केले. शिक्षण घेत असतानाच त्यांचे फुटबॉल, बॅडमिंटन, हॉकी, व्हॉलिबॉल, हँडबॉल या खेळावर विशेष प्रेम होते. विद्यापीठ अंतर्गत होणा-या विविध स्पर्धेत ते आर्वजुन भाग घ्यायचे. राज्यातील चारही कृषी विद्यापिठांच्या फुटबॉल संघाचे राज्यपातळीवर प्रतिनिधीत्व करत मॅरेथॉन रनर म्हणूनही त्यांनी नांवलौकीकास्पद कामगिरी केली. १९९० ते १९९२ या काळात त्यांनी सेवादलाचे राज्यस्तरीय सचिव म्हणून युवकांसाठी मोठे काम केले. युवक हा घटक राष्ट्राच्या राज्याच्या प्रगतीत अत्यंत महत्वाचा असतो. त्याला योग्य वयात योग्य वेळेस त्याच्या विचारांना मार्गदर्शन देवुन घडविणे ही जबाबदारीही त्यांनी यथार्थपणे पार पाडली आहे. १९९२ ते १९९७ या दरम्यान त्यांनी कोपरगांव तालुका पंचायत समितीचे सभापती म्हणून सामाजिक कार्याचा श्रीगणेशा केला. या पदाचे माध्यमांतून त्यांनी गावोगावच्या शाळांचा प्राथमिक शिक्षणाचा पाया पक्का केला. गांवोगावच्या पिण्याच्या पाणी योजनांसाठी मास्टरप्लॅन तयार केला आणि त्याच्या परिपूर्तीसाठी मोठे काम केले. १९९७ ते १९९८ याकाळात ते अहमदनगर जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष होते, २००३ मध्ये अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष या नात्यांने त्यांनी शेती, शेतकरी, सभासद व अन्य अवलंबुन असणा-या घटकांच्या आर्थीक उन्नतीत मोलाचा सहभाग दिलेला आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा २७ जुन १९९४ मध्ये त्यांनी स्विकारली त्यावेळी कारखान्याचा ९३ कोटी १९ लाख रूपये टर्नओव्हर होता तो आज मितीला सुमारे ७५० कोटी रूपयांपर्यंत वाढविण्यांत त्यांनी निर्णयात्मक भूमिका बजावली आहे. इफको किसान ट्रस्ट नविदिल्ली या संस्थेवरही त्यांनी २००४ ते २००९ पर्यंत काम केले त्यातुन त्यांनी शेकडो गोर-गरीब, दिव्यांग, निराधार, शेतकरी सभासदांना विविध आजारांच्या उपचारासाठी कोट्यावधी रूपयांची वैद्यकिय मदत मिळवुन दिली. शेतकऱ्यांच्या शेतीला इफको खताची व कीटकनाशक औषधांची मात्र भरपूर प्रमाणात मिळवून दिली. अहिल्यानगर जिल्हा हॉकी असोसिएशनचे उपाध्यक्ष, तलावारबाजी असोसिएशन, महाराष्ट्र राज्य शुटींगबॉल असोसिएशनचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी कुक्कुट पालन महासंघाचे उपाध्यक्ष, डेक्कन शुगर टेक्नॉलाजिस्ट असोएिशनचे उपाध्यक्ष, राज्य सहकारी साखर संघाचे संचालक, श्री साईबाबा संस्थान शिर्डीचे विश्वस्थ, भारतीय कृषी अनुसंधान संस्था (नविदिल्ली) सदस्य, फळबाग विकास समिती (भारत सरकार), कृषी मंत्रालय नविदिल्ली सदस्य, सहकाररत्न शंकररावजी कोल्हे शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावली असुन कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रिद या घोषवाक्यातुन गोर-गरीब, दीन-दलित, बहुजन समाजाच्या दारात रयत शिक्षण संस्था (सातारा) चे माध्यमांतुन शिक्षणाची गंगा पोहोचविली त्या संस्थेचे जनरल बॉडी सदस्य म्हणूनही ते सध्या काम पहात आहे. आपल्या देशाचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी एके ठिकाणी असे म्हटले आहे की स्वप्न ती नसतात, आपण झोपेत पाहतो. स्वप्न ती असतात जी आपल्याला झोपू देत नाही. बिपिनदादा कोल्हे यांनीही स्वतः कष्ट करत अनेकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सतत कामाचा ध्यास मनात बाळगला आहे.
आज पर्यावरणाचे असंतुलन वाढत आहे. जागतिकीकरणाच्या वा-यात ग्लोबलायझेशनचे चटके सर्वांना बसत आहे, असलेली वनसंपदा नष्ट होत आहे, सिमेंटची जंगले वाढत आहे त्यावर साधा आणि सोपा उपाय म्हणून वृक्ष लावा वृक्ष जगवा ही चळवळ ४० वर्षापासुन सुरू करत त्यातुन त्यांनी सुमारे १ लाख झाडे लावुन त्याचे संगोपनही केले आहे, त्यांच्या एव्हढे पर्यावरण संवर्धनाचे काम अन्य कुणीही केलेले नाही. वृक्ष लागवडीत ते फळझाडांबरोबरच पिंपळ, वड, लिंब, करंज, गुलमोहर यासारख्या दाट सावली देणा-या झाडांना प्राधान्य देतात. खालावलेले पर्जन्यमान सुधारण्यासाठी, भूगर्भातील कमी होणा-या पाण्याच्या पातळीत वाढ होण्यासाठी, तुटीच्या उर्ध्व गोदावरी खो-यात नविन पाण्याची निर्मीती व्हावी यासाठी पश्चिमेचे पाणी पुर्वेकडे वळविणे याबरोबरच हिंगणी, मंजुर, सडे (संयुक्त) कोल्हापुर पध्दतीचे बंधा-यातुन ३ हजार ४१६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणून ४४ दगडी साठवण बंधारे, २७ कच्चे मातीचे बंधारे, सुमारे २५० शेततळी, पाणी अडवा पाणी जिरवा उपक्रमातुन गोडबोले गेट संकल्पना अशी सुमारे नऊ कोटी रुपये खर्चाची संजीवनी जलसंवर्धन योजना राबवून शेतक-यांच्या समृध्दीसाठी पाणी उपलब्ध करून दिले व पाण्याचे महत्व इतरांना पटवून दिले.
वनराईचे तत्कालीन अध्यक्ष, माजीमंत्री स्व. मोहन धारिया आणि माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या मदतीने त्यांनी तालुक्यात वृक्षारोपणाची चळवळ जोपासली त्यातुन प्रत्येक ग्रामपंचायतीना – गावांना वनसंवर्धनाचे कामासाठी प्रवृत्त करत बक्षिसे देवुन गांवचे हरितपण टिकविले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या नांव वैशिष्टयावर राज्य शासनांने ग्राम स्वच्छता अभियान आयोजित केले त्यात त्यांनी येसगांवसह अनेक गावांना राज्य – राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचविले. गावच्या विकासात जीव तोडुन ते काम करत आहे. शहर स्वच्छतेबरोबरच ग्रामिण स्वच्छता अभियानात त्यांचा सातत्यांने पुढाकार असतो.
त्यांच्या प्रत्येक वाढदिवशी ते शहर, विविध प्रभाग, उपनगरे, निवास सोसायटया, शेतीचे बांध, मंदिरे, आश्रम, ग्रामपंचायत, सहकारी सोसायटी, शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा, सार्वजनिक ठिकाणे, शासकीय -निमशासकीय कार्यालये, साखर कारखाना परिसर, रस्ते, वाड्या-वस्त्या, आदिवासी पाडे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, दवाखाने, ग्रामिण रुग्णालये, औद्योगिक वसाहती, कारखाने, स्मशानभूमी इत्यादी ठिकाणी स्वतः तसेच संजीवनी कारखान्यामार्फत वृक्ष रोपे देवुन त्याच्या लागवडीवर आणि जपवणुकीवर सातत्यांने भर देतात. प्रदुषण कमी करण्यासाठी वृक्ष लागवड उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे.
त्याचप्रमाणे गोर-गरीब, आदिवासी, अल्पसंख्याक, हुशार, होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन सन २००० पासुन गेली २५ वर्षे मोफत वहयांचे दरवर्षी वाटप करत असुन आजवर सुमारे १० लाख वह्यांचे वितरण गांव-खेडे शहरी विद्यालये शाळामधुन केले आहे. आजारी रुग्णांना फळे, नित्यपयोगी गरजेच्या वस्तु, औषधे, अन्न-पाणी, मोफत मोतिबिंदु शस्त्रक्रिया, सर्वरोग निदान, रक्तदान, हिमोग्लोबीन तपासणी शिबीरे घेवून रुग्णांची काळजी घेणे तसेच गो शाळांना मोफत चारा- पाणी, दुष्काळी भागात हजारो मोफत पिण्यांचे पाण्यांचे टँकर देवुन पाणी संकलनासाठी मोफत प्लॅस्टीक टाक्यांचेही वाटप ते नित्यनियमांने करतात त्यांचा हा गुण अनेकांना प्रेरणादायी उपक्रम आहे. साखर कारखानदारी हा या तालुक्याचा प्रमुख आर्थीक कणा असल्यांने ऊसासह सर्वच पिकांचे प्रति हेक्टरी उत्पादन वाढले पाहिजे हा संदेश ते कायम देतात. कमी पाण्यात दर्जेदार बियाण्यात पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी ते शेतक-यांच्या बांधावर जाऊन प्रबोधनही करतात. शेतक-यांना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे प्रशिक्षीत करून वेळप्रसंगी सातत्यांने मार्गदर्शन करतात., नव्हे तर आधुनिक हवामान-शेती सल्ल्यासाठी उपग्रह सेवांचा लाभ शेतक-यांना मिळवून देत आहे. ३० सप्टेंबर १९९३ रोजी किल्लारी येथे तर २६ जानेवारी २००१ रोजी गुजराथ (भुज) येथे भुकंपाची मोठी आपत्ती आली त्यात अपरिमित हानी झाली पण बिपीनदादा कोल्हे यांचा स्वभाव परोपकारी असल्यांने त्यांनी या भुकंपग्रस्त आपत्तीधारकांना थेट कोपरगावातुन जीवनावश्यक वस्तूंसह कपडे, ब्लॅंकेट, भाजीपाला, पाण्यांचे टँकर, साखर, अन्नधान्य असे ट्रकच्या ट्रक भरून सुमारे ५० लाख रुपये किंमतीची मदत पाठविली व त्याचे कार्यकर्त्यामार्फत प्रत्यक्ष वितरणही केले. ७ ते ११ ऑगस्ट २००६ रोजी कोपरगांवला महापूराची आपत्ती आली त्यात कोपरगांव शहरासह तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या २६ ते २८ गावांना तडाखा बसला, ५१६३ बाधीत कुटूंबातील २२ हजार ८२१ पुरग्रस्तांना संजीवनी उद्योग समूहाचे माध्यमातून दररोज मसालेभात, पुरी-भाजी, शिरा, दुध, पाणी, कपडे आदि मदत केली. शहरातील १४ हजार ८६५ पुरग्रस्तांना शासनामार्फत सुमारे १ कोटी ५ लाख ५२ हजार रूपयांचे सानुग्रह अनुदान तातडीने मिळवून दिले. महापुरात अडकलेल्या व्यक्तींना सुरक्षीत बाहेर काढले, कुठलीही मनुष्यहानी होवू दिली नाही.
सहकार हा कोपरगांव तालुक्याचा आत्मा आहे. या उलाढालीवर येथील प्रत्येकाची आर्थीक क्रयशक्ती वाढली आहे. सहकारी संस्थेच्या माध्यमांतुन ते विकासाच्या अनेक योजना राबवितात. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, जिल्हा बँक , साखर संघ, वसंतदादा शुगर इन्स्टीटयुट, नॅशनल फेडरेशन, डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन आदि संस्थेच्या माध्यमांतुन ते शेतक-यांच्या ज्ञानात भर घालत आहे. एकेकाळी महाराष्ट्र राज्यावर वीजेचे संकट ओढवले होते, भारनियमन प्रचंड वाढले होते त्यावर माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनांतुन त्यांनी ऊसाच्या चिपाडापासून सहवीज निर्मीती केंद्रे उभारली. बायोगॅस पासुनही बुट तत्वावर वीज निर्मीती केली. आज इंधनाला पर्याय म्हणून बायो सीएनजी प्रकल्प देशात सर्वप्रथम सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांत उभारून इंधनावरील खर्च होणा-या परकीय चलनावर काही प्रमाणांत मात केली आहे. संजीवनी बायोकंपोष्ट सेंद्रीय खताची निर्मीती करून ते कमी खर्चात शेतक-यांच्या शेतात पुरविले आहे. पोटॅश ग्रॅन्युएल खत निर्मीती प्रकल्पही सुरू केला हे त्यांच्या प्रगतशिल ज्ञानाचे उत्तम उदाहरण आहे.
आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढत आहे. या स्पर्धेत आपला शेतकरी टिकला पाहिजे त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींचे ज्ञान झाले पाहिजे. विकसीत विकसनशील देशातील ध्येयधोरणे समजली पाहिजे यासाठी ते सतत ज्ञान आत्मसात करून मार्गदर्शन करतात. आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर शेतक-यांना उभे करण्यासाठी काय उपाययोजना करावयाच्या याचाही त्यांचा अभ्यास आहे. कार्यकर्त्यांना आपलेसे करणे त्यांच्या विचारांना दिशा देणे प्रगत तंत्रज्ञानातुन पुढे जाणे हा त्यांचा नेहमीचा ध्यास आहे. साखर उद्योगाच्या विकासासाठी त्यांनी अनेक वेळा परदेश दौरे केले त्यातून विकसित देशातील उद्योगांचा अभ्यास केला आणि त्याची परिपूर्ती कोपरगाव तालुक्यात केली हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
श्री. बिपीनदादा कोल्हे यांचा स्वभाव शांत, संयमी असुन शेती, सहकार, सिंचन, बँकिंग , दुग्ध, साखर कारखानदारी, रासायनिक प्रकल्प उभारणी, शेतक-यांकडे नव्याने निर्माण होणारे प्रश्न हाताळण्यांतही ते कमालीचे हुशार आहेत., त्यांच्या आजवरच्या साखर उद्योगाच्या अभ्यासाबद्दल देश पातळीवर गौरव झाला आहे त्यात कृभको नवी दिल्ली या संस्थेने त्यांचा सहकारभूषण पुरस्कार देऊन त्याच प्रमाणे सोसायटी फॉर शुगर केन रिसर्च अँड डेव्हलपमेंट कोईमतुर (तामिळनाडू) या संस्थेने जीवनगौरव पुरस्कार तर शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन नवीदिल्ली या संस्थेने जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. थोर विचारवंत बिल गेट्स यांनी असे म्हटले आहे की, आयुष्य सरळ नसते त्याची सवय करून घ्यावी लागते खऱ्या आयुष्यात आराम नसतो तेथे फक्त कामच असते या उक्तीप्रमाणे बिपिनदादा कोल्हे सामाजिक कामात नेहमीच कार्यमग्न असतात, सामान्य दिसणारे लोकच जगात सर्वात चांगले लोक आहे, म्हणूनच देव अशा लोकांना जास्त निर्माण करत असतो त्यात बिपिनदादांचा समावेश आहे अशा या परोपकारी नेतृत्वाला, भविष्य घडविणा-या समाजकारणी व्यक्तीमत्वास वाढदिवसाच्या शुभेच्छा. जीवेतः शरदं: शतम:
ज्ञानेश्वर भगवंतराव परजणे पा.
व्हाईस चेअरमन,
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी
साखर कारखाना लि, सहजानंदनगर (कोपरगांव)