
कोपरगाव : विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये, नेतृत्वगुण, स्वयंशिस्त, सेवाभाव आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव रुजविणाऱ्या विद्यार्थी प्रतिनिधी पदग्रहण व शपथविधी सोहळ्याचा समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. समता परिवाराचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी रुजविलेल्या मूल्याधिष्ठित शिक्षण परंपरेचा वारसा जपत शाळेत सलग चौदाव्या वर्षी पारदर्शक पद्धतीने विद्यार्थी निवडणुका घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीचा प्रत्यक्ष अनुभव देणारा हा उपक्रम पुन्हा एकदा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश नामदेवराव परजणे, समता चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा शाळेचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, सुहासिनीताई कोयटे (काकीजी), शाळेचे कार्यकारी अधिकारी व सुधन गोल्ड लोनचे संचालक संदीप कोयटे, व्यवस्थापकीय विश्वस्त स्वाती संदीप कोयटे, प्राचार्य समीर अत्तार, उपप्राचार्या मोहिनी जगताप, पालक, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांची शिस्त, आत्मविश्वास आणि राष्ट्रप्रेमाचे दर्शन घडविणाऱ्या भव्य संचलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मागील वर्षाचा विद्यार्थी प्रतिनिधी समोर राजपूत याने नेतृत्वाचा ध्वज नवनियुक्त विद्यार्थी प्रतिनिधी ईशान कोयटे याच्याकडे सुपूर्द करत जबाबदारीचा प्रेरणादायी वारसा पुढे सोपविला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात या क्षणाचे स्वागत केले.
प्रमुख पाहुणे राजेश परजणे यांनी विद्यार्थ्यांना नेतृत्व, शिस्त, सेवाभाव आणि निर्णयक्षमतेचे महत्त्व सांगत भावी आयुष्यात जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन केले. त्यांच्या हस्ते सर्व विद्यार्थी प्रतिनिधींना नेतृत्वचिन्ह प्रदान करण्यात आले. प्राचार्य समीर अत्तार यांनी सर्व प्रतिनिधींना पदाची शपथ देत प्रामाणिकपणा, निःपक्षपातीपणा आणि कर्तव्यनिष्ठेने जबाबदाऱ्या पार पाडण्याचा संकल्प करून घेतला.
यावर्षी इशान कोयटे याची हेड बॉय, लक्षिता इनामके हिची हेड गर्ल, शौर्य पटनी याची डेप्युटी हेड बॉय, रुही फुलसुंदर हिची डेप्युटी हेड गर्ल, मिथिल काळे याची सहाय्यक हेड बॉय आणि मनवा औताडे हिची सहाय्यक हेड गर्ल म्हणून निवड झाली. प्राथमिक विभागातून शौर्य शर्मा, दिशिका लाडे, दर्श खुबाणी आणि सिया राजपुत यांची विविध नेतृत्वपदांवर निवड करण्यात आली. तसेच इतर विद्यार्थी प्रतिनिधींनाही विविध जबाबदाऱ्या देऊन शपथ देण्यात आली.
प्रसंगी समर राजपुत, एंजल भोई, दर्श खुबाणी, सिया राजपुत, शौर्य शर्मा, दिशिका लाडे, मनवा औताडे, मिथिल काळे, इशान कोयटे आणि लक्षिता इनामके यांनी नेतृत्व, लोकशाही, जबाबदारी आणि सेवाभाव या विषयांवर प्रभावी मनोगते व्यक्त केली. पालक प्रतिनिधी डॉ.अभिजीत आचार्य यांनी शाळेच्या लोकशाही मूल्यांवर आधारित उपक्रमांचे कौतुक करून नव्या विद्यार्थी प्रतिनिधींना शुभेच्छा दिल्या.
व्यवस्थापकीय विश्वस्त स्वाती संदीप कोयटे यांनी नेतृत्व म्हणजे अधिकार नव्हे, तर जबाबदारी, विश्वास आणि समाजसेवेची भावना असल्याचे प्रतिपादन करत प्रामाणिक प्रयत्न, मूल्यनिष्ठा आणि कर्तव्यभावना हीच यशाची खरी गुरुकिल्ली असल्याचे सांगितले.
केशमा खुराणा आणि इप्सिता राय यांनी कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन केले, तर रैना जैन हिने आभार मानले. क्रीडा विभागाच्या उत्कृष्ट नियोजनासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे हा प्रेरणादायी सोहळा यशस्वीरीत्या पार पडला. शेवटी नव्याने निवडून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींनी कर्तव्य, शिस्त, सेवा आणि नेतृत्वाच्या मूल्यांचे जतन करत शाळेची उज्ज्वल परंपरा अधिक समृद्ध करण्याचा निर्धार व्यक्त केला.