Homeकोपरगावब्रह्मजीवन गौरव पुरस्काराने श्री. विनायक कृष्णाजी रसाळ यांचा गौरव

ब्रह्मजीवन गौरव पुरस्काराने श्री. विनायक कृष्णाजी रसाळ यांचा गौरव

कोपरगाव : समाजकार्यात सातत्याने योगदान देणारे, सामाजिक बांधिलकीची तळमळ असलेले ज्येष्ठ समाजसेवक श्री. विनायक कृष्णाजी रसाळ यांना त्यांच्या दीर्घकाळच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेत ‘ब्रह्मजीवन गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. वयाच्या ९१व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या रसाळ यांच्या कार्याचा हा सन्मान समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे.

श्री. विनायक रसाळ यांचा जन्म प्रवरासंगम, ता. नेवासा येथे झाला. त्यांनी मुंबई येथील जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून जी. डी. आर्टची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी हिंद सेवा मंडळ, अकोले, तसेच श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय, कोपरगाव आणि त्यानंतर संगमनेर येथे कला शिक्षक म्हणून प्रदीर्घकाळ सेवा बजावली.

नोकरीच्या काळातही समाजाशी असलेली त्यांची नाळ कायम राहिली. पुढे भावाला सहकार्य करण्यासाठी त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन कोपरगाव येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. कोपरगावमध्ये आल्यानंतर त्यांनी समाजातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित व्यक्तींना एकत्रित करून सामाजिक संघटन उभारण्याच्या कार्याला सुरुवात केली.

त्यांच्या पुढाकारातून १९८२ मध्ये ब्राह्मण सभा, कोपरगाव या संस्थेची स्थापना झाली. ब्राह्मण सभेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक एकोपा, संस्कार आणि समाजातील गुणवंतांचा गौरव यासाठी विविध उपक्रम सुरू केले. तिळगूळ समारंभ, गुणगौरव सोहळे, सामुदायिक मुंजी यांसारखे उपक्रम त्यांच्या पुढाकाराने राबविण्यात आले. या उपक्रमांमुळे समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे आणि सामाजिक बांधिलकी मजबूत करण्याचे काम झाले.

सामाजिक कार्याबरोबरच कला, शिक्षण आणि संस्कार यांची सांगड घालत रसाळ यांनी अनेक वर्षे समाजासाठी योगदान दिले. त्यांच्या निस्वार्थी सेवाभावाची आणि समाजहितासाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना ‘ब्रह्मजीवन गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.

या पुरस्काराबद्दल श्री. विनायक कृष्णाजी रसाळ यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या कार्याचा भावी पिढीलाही प्रेरणादायी वारसा लाभेल, अशा भावना व्यक्त होत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!