
कोपरगाव: “गेट्सची परीक्षा केवळ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांपुरती मर्यादित नसून सायन्स शाखेतील पदव्युत्तर पदवी घेतलेले विद्यार्थीही या परीक्षेस पात्र असतात. गेट परीक्षेतील चांगल्या स्कोअरच्या आधारे देशातील सर्वोच्च शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षणासोबतच विविध सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होतात, त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या नोट्स तयार करणे, मॉक टेस्ट सोडवणे आणि तांत्रिक विषयांवर भर देणे आवश्यक आहे” असे प्रतिपादन आय. आय. टी. मुंबई येथील रसायन अभियांत्रिकीतील संशोधक संथाकुमार व्ही. यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागिरी महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव अंतर्गत रयत स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी आयोजित ‘IIT – JAM व GATE Exam Awareness’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते, तर अध्यक्षीय स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. माधव सरोदे यांनी भूषविले.
आय.आय.टी. मुंबई येथील रसायन अभियांत्रिकीतील संशोधक साईकत साहा यांनी, “मूलभूत विज्ञान विषयात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘IIT JAM’ (Joint Admission Test for M.Sc.) परीक्षेचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले,”आय. आय. टी. सारख्या नामांकित संस्थांमध्ये एम. एस्सी., संयुक्त एम. एस्सी.- पीएच. डी किंवा इंटिग्रेटेड पीएच. डी. साठी प्रवेश मिळवण्यासाठी JAM ही एक सुवर्णसंधी आहे. योग्य नियोजन, संकल्पना स्पष्ट असणे आणि नियमित सराव यांच्या जोरावर ही परीक्षा सहज उत्तीर्ण करता येते.”तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप, गुण पद्धत आणि वेळेचे नियोजन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. माधव सरोदे अध्यक्षीय मनोगतात यांनी, “IIT-JAM, GATE यांसारख्या स्पर्धात्मक व उच्च शिक्षण प्रवेश परीक्षांचे महत्त्व अधोरेखित केले. या परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देशातील नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण व संशोधनाच्या संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांनी पारंपरिक करिअरच्या पलीकडे संशोधन, उद्योग, उद्योजकता व नव्या ज्ञानक्षेत्रांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे, असे आवाहन केले. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, सातत्यपूर्ण प्रयत्न व मेहनतीच्या जोरावर मोठी स्वप्ने साकार करावीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत व परिचय रयत स्पर्धा अकॅडमीचे संचालक प्रा. चंद्रभान चौधरी यांनी करून दिला. व्यासपीठावर कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. बंडेराव तऱ्हाळ, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. घनश्याम भगत, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे डॉ. निलेश मालपुरे, डॉ. विलास गाडे, प्रा. अश्विनी पाटोळे उपस्थित होते, तर सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील प्राध्यापकांसह पदवी व पदव्युत्तर बी. एस्सी व बी. सी. एस वर्गातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा.प्रतीक्षा संवत्सरकर यांनी केले. तर आभार प्रा. ऋषिकेश सोनवणे यांनी व्यक्त केले.