
कोपरगांव :- सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर श्रावण मासानिमीत्त प. पू. मोरेदादा प्रणित दिंडोरी दरबार स्वामी समर्थ केंद्राच्या मार्गदर्शनाखाली नवनाथ पारायण संपन्न झाले. स्वामी समर्थ सेवेकरी श्री. संतोष जाधव यांच्या हस्ते सदर कार्यक्रमाची सांगता झाली.

प्रारंभी उपाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर परजणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. श्री. संतोष जाधव याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी संघर्षांतुन कोपरगांव पंचक्रोशीसह परिसराची आर्थीक समृध्दी वाढविण्यांसाठी संजीवनी नावाचे साम्राज्य उभे केले. या उद्योग समुहाचे मार्गदर्शक बिपीनदादा कोल्हे व कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी संस्था उत्कर्षात मोलाचे योगदान देवुन त्यात वाढ केली. कलीयुगात प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे येतात, त्याची तीव्रता कमी करण्यासाठी असंख्य अध्यात्मीक उपाययोजना सांगितल्या आहे त्याचे आचरण प्रत्येकांने करावे. हल्लीच्या युगात यूवापिढी भ्रमणध्वनीच्या जास्त आहरी गेली आहे तेंव्हा युवकांनी भ्रमणध्वनीचा कामासाठीच उपयोग करावा त्याचा अतिरेक टाळावा. महिला भगिनींनी लहान मुलांना अध्यात्म संस्काराची शिकवण द्यावी, नवनाथ, गुरूचरित्र आदि ग्रंथ प्रासादिक असुन त्याचे पारायण प्रत्येकांने घरोघरी करावे, जेव्हढी जास्त पारायणे होतील तेव्हढी त्या जागेची, घराची, परिसराची अध्यात्मीक उर्जा वाढत जाते. बाहयबाधेचा दोष घालविण्यांसाठी नवनाथ सेवा अत्यंत पवित्र आहे, स्वामी समर्थ नित्य उपासना ही प्रत्येकाच्या घरी झालीच पाहिजे असेही ते म्हणाले.

याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. ज्ञानदेव औताडे, विलासराव माळी, त्रंबकराव सरोदे, कामगार नेते मनोहर शिंदे, जनसंपर्क अधिकारी रंगनाथ लोंढे, कारवाडी स्वामी समर्थ सेवा केंद्राचे देवीदास जाधव, भगवान सैंदर यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, कर्मचारी, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सुत्रसंचलन गजानन सोळंके, चंद्रकांत जाधव, वसंत थोरात यांनी केले. शेवटी संचालक श्री. ज्ञानदेव औताडे यांनी आभार मानले.