
कोपरगांव :- मनुष्याची ओळख त्याच्या कर्माने होते, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचा समाज विकासात सिंहाचा वाटा आहे. देश विदेशातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यांने त्यांनी साखर कारखानदारीत अमुलाग्र बदल घडविले असे प्रतिपादन ह.भ.प. शाम महाराज ठोंबरे यांनी केले.

तालुक्यातील श्रीक्षेत्र शिंगणापुर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर सालाबादप्रमाणे याही वर्षी ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता शनिवारी झाली त्याप्रसंगी काल्याचे किर्तन करतांना ते बोलत होते. राम आचरणीय तर कृष्ण वंदनीय असल्याचेही त्यांनी सांगितले.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे संजीवनी सांस्कृतिक मंडळाच्यावतींने प्रभारी कार्यकारी संचालक तुळशीराम कानवडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे व उपमुख्य लेखापाल प्रविण टेमगर यांनी मंडळाच्या उपक्रमाची माहिती दिली. उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे व कामगार नेते मनोहर शिंदे यांच्या हस्ते ह.भ.प. शाम महाराज ठोंबरे यांचा सत्कार करण्यांत आला.
श्री. शाम महाराज ठोंबरे पुढे म्हणाले की, भौतिक सुखात मनुष्याला अध्यात्माचा विसर पडत आहे. कथा किर्तन प्रवचन, पारायणे, भजन यातुन लहान मुला – मुलींना अध्यात्म संस्काराची शिकवण दिली जाते. भ्रमणध्वनीच्या अति वापरामुळे घराघरात कलह निर्माण होत आहे. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे व आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी शेतकरी सभासदांच्या विकासाला प्राधान्य देत कृत्रिम बुध्दीमत्तेच्या सहाय्यांने उस उत्पादनांत वाढ करण्याचे उददीष्ट हाती घेतले आहे. मनुष्याच्या जीवनांतील अडी- अडचणींवर मात करण्याचा उपाय ज्ञानेश्वरीतुन सापडतो तेंव्हा प्रत्येकांने ज्ञानेश्वरीचे वाचन केलेच पाहिजे. संजीवनी सांस्कृतिक मंडळाने गेल्या ३१ वर्षापासुन अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा कायम जोपासत त्यातुन पंचक्रोशीच्या जनकल्याणाचा हेतु साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे.
याप्रसंगी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे, कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते, रमेश घोडेराव, ह.भ.प. श्रीकांत महाराज माळी, ह.भ.प. संगिता महाराज चव्हाण, ह.भ.प. हर्षदाताई, धीरज महाराज कु-हे, बाबासाहेब बगाटे, रानवड कारखान्याचे अवसायक विशेष लेखाधिकारी श्री. वाकचौरे यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, संजीवनी सांस्कृतिक मंडळाचे सर्व सहकारी, खाते प्रमुख, उपखातेप्रमुख, कामगार, महिला भगिनी, बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी राजेंद्र पाबळे यांनी आभार मानले. उपस्थित भाविकांनी आमटी भाकरी महाप्रसादाचा लाभ घेतला. शंभर पारायणार्थीनी सेवा दिली. सूत्रसंचालन वसंत थोरात यांनी केले.