Homeकोपरगावशिर्डीत ‘बीबीएनजी स्काय ’ चॅप्टरचा शानदार शुभारंभ

शिर्डीत ‘बीबीएनजी स्काय ’ चॅप्टरचा शानदार शुभारंभ

शिर्डी–कोपरगाव–येवला परिसरातील उद्योजकांसाठी व्यवसायवृद्धीचे नवे व्यासपीठ

कोपरगाव :- ब्राह्मण उद्योजकांचे जागतिक स्तरावरील मोठे नेटवर्क असलेल्या बीबीएन ग्लोबल अंतर्गत ‘बीबीएनजी स्काय ’ आयोजन (शिर्डी– कोपरगाव – येवला) चॅप्टरचा भव्य शुभारंभ रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी शिर्डी येथील अगत्य ॲग्रो टुरिझम येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

बीबीएनजी ग्लोबल ही संस्था सध्या ३० पेक्षा अधिक देशांमध्ये कार्यरत असून ९० हजारांहून अधिक व्यावसायिक व उद्योजक या नेटवर्कशी जोडले गेले आहेत. या माध्यमातून शिर्डी, कोपरगाव व येवला परिसरातील उद्योजकांना परस्पर व्यावसायिक सहकार्य, मार्गदर्शन व व्यवसायवृद्धीसाठी नवे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

कार्यक्रमाचे मुख्य वक्ते केंद्रीय एम एस एम एई,बोर्डाचे सदस्य, उद्योग मित्र व बीबीएनजी चे सल्लागार श्री. प्रदीप पेशकार यांनी ‘सरकारच्या धोरणानुसार व्यवसाय करून आपला व्यवसाय दहापट कसा वाढवायचा?’ तसेच उदयोगा करीता ‘आर्थिक तरतुद’ या विषयांवर मार्गदर्शन केले. बदलत्या व्यावसायिक वातावरणात शासकीय धोरणांचा प्रभावी वापर, आर्थिक नियोजन आणि व्यवसायवृद्धीचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.

या सोहळ्यास बीबीएनजी चे संस्थापक अध्यक्ष श्री. श्रीपाद कुलकर्णी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच सरचिटणीस संचालक श्री. अरविंद कोऱ्हाळकर, सहयोगी संचालक (विकास) डॉ. अभिजित चांदे आणि सहयोगी संचालक (वित्त) श्री. महेश देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ब्राह्मण सभा, कोपरगावचे अध्यक्ष श्री. मकरंद को-हाळकर तसेच ब्राह्मण एकता मंच, शिर्डीचे श्री. धनंजय पाटील उपस्थित होते.

कोपरगाव चॅप्टरच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा

कार्यक्रमात कोपरगाव चॅप्टरच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली. चॅप्टर प्रमुख म्हणून गौरव कोऱ्हाळकर, सेक्रेटरी म्हणून अभिषेक कुर्लेकर आणि ट्रेझरर, कोषाध्यक्ष म्हणून नितीन जोशी जोशीज् ट्रेडर्स यांची निवड करण्यात आली. या कार्यकारिणीला चॅप्टरचे पालक (गार्डियन) बाळकृष्ण कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

नव्याने सुरू झालेल्या स्काय चॅप्टरचे वैशिष्ट्य म्हणजे डिजिटल, हर्बल आणि स्पिरिच्युअल यांसह विविध क्षेत्रांतील व्यवसायांचा यात समावेश आहे. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रिजनल हेड रासिका कुलकर्णी आणि डेव्हलपमेंट कोऑर्डिनेटर डॉ. संदीप चिंचोलीकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

‘नोकरी शोधणारा नव्हे, रोजगार निर्माण करणारा समाज घडवूया’

बीबीएनजी चे संस्थापक अध्यक्ष श्री. श्रीपाद कुलकर्णी यांच्या विचारांनी उपस्थितांना विशेष प्रेरणा मिळाली. केवळ स्वतः व्यवसाय करण्यापुरते मर्यादित न राहता समाजातील प्रत्येक व्यक्तीने व्यवसाय करावा, व्यवसाय वाढवावा, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे आणि इतरांसाठी रोजगार निर्माण करावा, हा व्यापक दृष्टिकोन त्यांनी मांडला.

आजच्या काळात तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता उद्योजकतेकडे वळावे, नवीन व्यवसाय सुरू करावेत, विद्यमान व्यवसायाचा विस्तार करावा आणि आर्थिक स्वावलंबन साधावे, या दिशेने बीबीएनजी सारखे व्यासपीठ महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

शिर्डी–कोपरगाव–येवला परिसरातील युवक, उद्योजक, व्यावसायिक आणि विविध क्षेत्रांत कार्यरत व्यक्तींना एका व्यासपीठावर आणून परस्परांच्या व्यवसायाला ग्राहक, मार्गदर्शन व सहकार्य मिळवून देण्याचा हा उपक्रम आहे. एकमेकांना जोडणे, एकमेकांकडून शिकणे आणि एकमेकांना पुढे नेणे, या विचारातून समाजाची आर्थिक प्रगती साध्य होऊ शकते, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

कोपरगाव ब्राह्मण सभा, येवला आणि संबंधित संस्थांच्या संयुक्त सहकार्याने साकारलेल्या या उपक्रमामुळे परिसरातील विविध क्षेत्रांतील उद्योजक व व्यावसायिकांना नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

‘नोकरी शोधणारा नव्हे, तर रोजगार निर्माण करणारा समाज घडवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल’ म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात असून, नव्या बीबीएनजी स्काय चॅप्टरच्या माध्यमातून शिर्डी – कोपरगाव – येवला परिसरातील उद्योजकतेला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!