Homeकोपरगावसुधीर डागा यांची महाराष्ट्र रिटेलर्स फोरमच्या अध्यक्षपदी निवड

सुधीर डागा यांची महाराष्ट्र रिटेलर्स फोरमच्या अध्यक्षपदी निवड

कोपरगाव : महाराष्ट्रातील व्यापारी, उद्योजक व शेतकऱ्यांची राज्यव्यापी शिखर संघटना असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या महाराष्ट्र रिटेलर्स फोरमच्या अध्यक्षपदी कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष तथा बालाजी सुपर मार्केटचे संचालक सुधीर डागा यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी मुंबई येथे झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड जाहीर केली.

सुधीर डागा यांच्या माध्यमातून कोपरगावला किरकोळ व्यापाऱ्यांचे राज्यव्यापी नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने किरकोळ व्यापाऱ्यांच्या प्रश्नांसाठी ‘महाराष्ट्र रिटेलर्स फोरम’ची स्थापना केली असून, अध्यक्ष रवींद्र माणगावे व आशिष पेडणेकर यांच्या या पुढाकाराबद्दल आभार व्यक्त करीत, या संधीचा उपयोग करून डागा महाराष्ट्रातील किरकोळ व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रभावीपणे प्रयत्न करतील, असा विश्वास कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काका कोयटे यांनी व्यक्त केला.

सुधीर डागा हे गेल्या ३५ वर्षांपासून किराणा व्यवसायात कार्यरत असून, बदलत्या काळाची गरज ओळखून निवडक व पॅकिंग किराणा मालाची संकल्पना कोपरगाव शहरात त्यांनी प्रारंभीच्या काळातच प्रत्यक्षात आणली. व्यवसायासोबतच स्थानिक व्यापाऱ्यांच्या प्रश्नांसाठीही त्यांनी सातत्याने काम केले आहे. कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे संस्थापक काका कोयटे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी व्यापाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी पाठपुरावा केला आहे.

ऑनलाइन व्यापारातील वाढती स्पर्धा, ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, वजन व किमतीतील तफावत तसेच किरकोळ व्यापाऱ्यांसमोरील अन्य समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी ‘वन नेशन–वन वेट–वन रेट’ ही संकल्पना त्यांनी शासन दरबारी मांडली. या मागणीसाठी केलेल्या पाठपुराव्याला काही प्रमाणात यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

डागा म्हणाले, “माझी दोन्ही मुले आता व्यवसायाची जबाबदारी सांभाळत असल्यामुळे व्यापाऱ्यांची एकजूट मजबूत करणे, त्यांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा करणे आणि बदलत्या काळानुसार व्यापार क्षेत्रातील आवश्यक बदलांबाबत व्यापाऱ्यांमध्ये प्रबोधन करणे यासाठी आता अधिक वेळ देता येणार आहे.”

दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माणगावे, ट्रस्ट बोर्डचे चेअरमन आशिष पेडणेकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी कोपरगाव येथे भेट देऊन सुधीर डागा यांच्या माध्यमातून कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या सुरू असलेल्या कामाचे कौतुक केले होते. तसेच काका कोयटे यांच्या संकल्पनेतून आणि महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांच्या ‘गाव तेथे उद्योजक’ या संकल्पनेअंतर्गत जानेवारी महिन्यात शिर्डी येथे राज्यव्यापी अधिवेशन व उद्योगपतींच्या मेळाव्याचे आयोजन करण्याचा निर्णय यापूर्वी जाहीर करण्यात आला आहे. या अधिवेशनाच्या तयारीसाठी सुधीर डागा सहकाऱ्यांसह महाराष्ट्रभर दौरा करणार आहेत.

या निवडीबद्दल कोपरगाव तालुका किरणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार बंब, कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे खजिनदार तुलसीदास खुबानी व अजित लोहाडे, महासचिव प्रदीप साखरे आदींनी अभिनंदन असून व्यापारी वर्गातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!