
आ.विवेक कोल्हे यांच्या मागणीमुळे थकीत पाणीपट्टीचा अडथळा दूर, सात नंबर फॉर्म भरण्याचा मार्ग मोकळा
कोपरगाव : – दुष्काळाच्या तीव्र झळा सोसणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय दुष्काळ व टंचाई आढावा बैठकीत घेण्यात आला. सात नंबर फॉर्म भरण्यासाठी थकीत पाणीपट्टीचा अडथळा येत असल्याचा प्रश्न आ. विवेक कोल्हे यांनी पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिला. यावर सकारात्मक प्रतिसाद देत थकीत पाणीपट्टीचा अडथळा न आणता चालू पाणीपट्टी भरून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

कोपरगाव तालुका दुष्काळ व टंचाई आढावा बैठक पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोपरगाव शहरातील कृष्णाई बँकेट हॉल येथे झाली. यावेळी आ. विवेक कोल्हे यांनी दुष्काळाची तीव्रता, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि आगामी काळातील उपाययोजनांबाबत विविध महत्त्वाचे प्रश्न मांडले.

दहा-बारा वर्षांपासून थकीत असलेली पाणीपट्टी, कर्जमाफीच्या धर्तीवर पाणीपट्टी माफी, सात नंबर फॉर्म भरण्यासाठी येणाऱ्या अडचणी आणि पाणी उपलब्धतेशी संबंधित प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी आ. कोल्हे यांनी केली. थकीत पाणीपट्टीमुळे शेतकऱ्यांना सध्याच्या हंगामासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात अडथळे येत असल्याने त्यांना दिलासा मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय खरिपातील १६ व रब्बीतील ६३ गावांना निश्चित वेळापत्रकानुसार आवर्तने मिळावीत, पिकांचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत, ई-पिक पाहणीतील अडचणी दूर कराव्यात, पशुधनासाठी चारा उपलब्ध करून द्यावा, रोजगार हमीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू करावीत, एम.जे.पी.ची प्रलंबित कामे पूर्ण करावीत, जलजीवन मिशनच्या अपूर्ण योजना कार्यान्वित कराव्यात, कालव्यांच्या दुरुस्तीसाठी मंजूर निधीची कामे वेगाने पूर्ण करावीत, तसेच वीजपुरवठ्याशी संबंधित प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील गावांना सुरळीत पाणीपुरवठा, हरिसन ब्रँचची समस्या, उजवा-डावा कालवा पाणीवाटप, पोटखराबा क्षेत्रातील शेतकऱ्यांना मदत, फळबाग उत्पादकांना कर्जमाफीचा लाभ आणि गावनिहाय हवामान केंद्रांची आवश्यकता याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
या सर्व प्रश्नांवर पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे थकीत पाणीपट्टीमुळे सात नंबर फॉर्म भरण्यास निर्माण झालेला अडथळा दूर होऊन चालू पाणीपट्टी भरून शेतकऱ्यांना पाणी मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे.
यावेळी आ. आशुतोष काळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अप्पर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, नगराध्यक्ष पराग संधान, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.