Homeकोपरगावदुष्काळाशी दोन हात करण्यासाठी झाडे लावा, पाणी वाचवा-आ. विवेकभैय्या कोल्हे

दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी झाडे लावा, पाणी वाचवा-आ. विवेकभैय्या कोल्हे

संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या ‘महिषासुर दहन व जलसंवर्धन संकल्प’ उपक्रम

कोपरगाव – दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावून पाण्याचे संवर्धन केले पाहिजे. पुढील पिढीला निसर्ग आणि पाण्याचे महत्त्व समजावे, तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीचा जपून वापर करण्याची सवय लागावी, हा संदेश संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आ. विवेकभैय्या कोल्हे यांनी केले.

कोपरगाव शहरातील तहसील मैदान येथे (दि.२०) रोजी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘दुष्काळासुर दहन व जलसंवर्धन संकल्प’ हा उपक्रम उत्साहात पार पडला. यावेळी आ. विवेकभैय्या कोल्हे आणि संजीवनी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. रेणुकाताई कोल्हे, नगराध्यक्ष पराग संधान, सौ. मोनिकाताई संधान,यांच्या प्रमुख उपस्थितीत दुष्काळासुराचे दहन करण्यात आले. यावेळी कोपरगाव नगरपालिकेचे सर्व नगरसेवक संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सर्व युवा सेवक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ. कोल्हे म्हणाले, विजयादशमीनिमित्त संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी महिषासुराचे दहन केले जाते. यंदा या उपक्रमाचे सहावे वर्ष असून, प्रतीकात्मक महिषासुरदहनाच्या माध्यमातून समाजात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. यावर्षी महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असल्याने पाणी वाचवा, पाणी टिकवा, पावसाचे पाणी साठवा आणि वृक्षारोपण करा, असे विविध पर्यावरणपूरक संदेश देण्यात आले आहेत.

दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी जलसंवर्धनाचा महत्त्वपूर्ण सामाजिक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.यावेळी कोपरगाव शहरातील नागरिकांना आवाहन करताना आ. विवेकभैय्या कोल्हे म्हणाले की, शहरातील ज्या नागरिकांकडून रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था करण्यात येईल, त्यांना पाणीपट्टीमध्ये पाच टक्के करसवलत देण्याचा प्रोत्साहनपर निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. या निर्णयाची जास्तीत जास्त नागरिकांना माहिती व्हावी आणि त्यांनी जलसंवर्धनाच्या उपक्रमात सहभाग नोंदवावा, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. नागरिकांनी आपल्या घरांमध्ये पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था करून जलसंवर्धनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

दुष्काळाच्या तीव्र सावटामुळे पाणी बचतीचे महत्त्व विशद करताना आ. कोल्हे म्हणाले की, आपल्याला पुढील नऊ महिने पाणी बचत करून काढायचे आहेत. एप्रिल, मे आणि जून-जुलैपर्यंत पाऊस पडण्याची प्रतीक्षा करावी लागू शकते. त्यामुळे हा मोठा कालावधी लक्षात घेता उपलब्ध पाणीसाठ्याचा अत्यंत जपून आणि जबाबदारीने वापर करणे आवश्यक आहे. सध्या हिवाळा सुरू असला, तरी उन्हाचा तडाखा उन्हाळ्यासारखा जाणवत आहे. पुढील वर्षी सुपर अल निनोचा प्रभाव निर्माण झाल्यास पावसाचे आगमन आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईचा विचार करून उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

प्रत्येकाने पाण्याचा अपव्यय टाळावा, पावसाच्या पाण्याचे संकलन करावे आणि जलसंधारणाच्या उपाययोजनांमध्ये सहभाग नोंदवावा. संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमातून पाणी बचत आणि जलसंवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही आ. विवेकभैय्या कोल्हे यांनी सांगितले.

महाराष्ट्रासह कोपरगाव तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महिषासुराचे प्रतीकात्मक रूपांतर ‘दुष्काळासुरात’ करण्यात आले होते. दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी पाण्याचा अपव्यय टाळणे, जलसंधारणाच्या उपाययोजना राबविणे आणि जलसंवर्धनाची जबाबदारी सामूहिकपणे स्वीकारणे, असा संकल्प या उपक्रमातून व्यक्त करण्यात आला.

संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल तसेच एम. के. आढाव स्कूलच्या विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला.कार्यक्रमात कोपरगावमधील होतकरू कलाकारांनी साकारलेल्या प्रभू श्रीराम, सीतामाता आणि हनुमान यांच्या वेशभूषांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विशेषतः महाबली हनुमानाची भव्य वेशभूषा लहान मुलांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.दुष्काळासुर दहनाच्या माध्यमातून पाणी वाचवणे, जलसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे, हा महत्त्वपूर्ण सामाजिक संदेश देण्यात आला. हिरव्यागार शिवाराचे स्वप्न साकार करण्यासाठी वृक्षारोपण, पाणी बचत आणि जलसंधारणाच्या माध्यमातून प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!