
माझा गाव माझा अभिमान संघटनेच्या आमरण उपोषणाला यश!
कोपरगाव : – कोपरगाव शहरात अल्पवयीन मुलांकडून चालवल्या जाणाऱ्या धोकादायक ५० सीसी पेट्रोल डर्ट बाईक्स (Mini Petrol Bikes) आणि सायलेंट इलेक्ट्रिक डर्ट बाईक्सच्या वापरामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या प्रकारांविरोधात ‘माझा गाव माझा अभिमान – कोपरगाव’ संघटनेच्या वतीने श्री. विनय भगत, मयूर आव्हाड आणि विजय जाधव यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला अखेर यश आले. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, श्रीरामपूर यांच्या वतीने लेखी आश्वासन आणि कारवाईचा आराखडा देण्यात आल्यानंतर उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी, गुरुवार दि. २९ ऑक्टोबर रोजी, उपोषणाची सांगता करण्यात आली.

तीन मिनिटांत दंड करणारे आरटीओ प्रशासन तीन महिने सुस्त का?
सर्वसामान्य वाहनधारकांची वाहने अडवून काही मिनिटांत दंडात्मक कारवाई करणारे आरटीओ प्रशासन नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या डर्ट बाईक्सवर कारवाई करण्यासाठी इतका विलंब का करत होते, असा संतप्त सवाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.
जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय शिर्डी, तहसीलदार कार्यालय आणि कोपरगाव नगरपरिषद यांच्याकडून या प्रश्नासंदर्भात आदेश व पाठपुरावा झाल्याचे संघटनेने नमूद केले. तरीही ठोस कारवाईस विलंब झाल्याचा आरोप करत संघटनेने आरटीओ प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
पुढील पाच महिने विशेष वायुवेग पथकाची कारवाई
संघटनेच्या म्हणण्यानुसार, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, श्रीरामपूर यांनी लेखी पत्राद्वारे कोपरगावसाठी विशेष मोटार वाहन निरीक्षक (MVI) व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) यांच्या माध्यमातून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. पुढील पाच महिने कोपरगाव शहरात विशेष वायुवेग पथकामार्फत तपासणी व कारवाई केली जाणार असल्याचे लेखी आश्वासनात नमूद असल्याचे संघटनेने सांगितले.
तसेच बेकायदेशीररीत्या डर्ट बाईक्सची विक्री किंवा साठवणूक होत असल्याची माहिती मिळाल्यास संबंधित दुकाने व गोदामांची नियमानुसार तपासणी करणे, अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवले जात असल्यास संबंधितांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करणे, याबाबत संघटनेने मागणी केली आहे.
अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने देणाऱ्या पालकांवर कारवाईची मागणी
अल्पवयीन मुलांच्या हातात धोकादायक वाहने देणे हा केवळ वाहतुकीचा प्रश्न नसून नागरिकांच्या जीविताशी संबंधित गंभीर विषय आहे. त्यामुळे पालक आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका संघटनेने मांडली.
मोटार वाहन कायद्यातील कलम १९९(अ) अंतर्गत लागू होणाऱ्या तरतुदींनुसार संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. या कायद्यातील दंड व शिक्षेच्या तरतुदींची अंमलबजावणी कायद्यानुसार करण्यात यावी, असे संघटनेने स्पष्ट केले.
लेखी आश्वासनानंतर उपोषणाची सांगता; आश्वासन पाळले नाही तर श्रीरामपूर आरटीओ कार्यालयावर आंदोलन!
आरटीओ प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर तहसीलदार व महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उपोषणकर्त्यांना ज्यूस देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.
मात्र, लेखी आश्वासन म्हणजे आंदोलनाचा शेवट नसून प्रशासनाच्या कामगिरीची सुरुवात आहे. पुढील पाच महिन्यांत प्रत्यक्ष कारवाई झाली नाही, किंवा दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी करण्यात हलगर्जीपणा झाला, तर आरटीओ श्रीरामपूर कार्यालयावर यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला.
“सर्वसामान्य वाहनधारकांवर तत्काळ कारवाई होत असेल, तर नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या बेकायदेशीर वाहनांवरही तितक्याच तत्परतेने कारवाई झाली पाहिजे. कोपरगावकरांच्या सुरक्षिततेसाठी आमचा लढा यापुढेही सुरू राहील,” अशी भूमिका विनय भगत, मयूर आव्हाड आणि विजय जाधव यांनी व्यक्त केली.