
कोपरगाव :- कोपरगाव नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा ब्राह्मण सभा, कोपरगावचे माजी अध्यक्ष कै. सुधाप्पा कुलकर्णी यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. सचिन सुधाकर (सुधाप्पा) कुलकर्णी यांच्या मातोश्री कै. मीनाताई सुधाकर कुलकर्णी (वय ८३) यांचे शुक्रवार, दि. १३ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी निधन झाले.

मीनाताई या अत्यंत प्रेमळ, मनमिळाऊ व आदरातिथ्यशील स्वभावाच्या होत्या. कै. सुधाप्पा कुलकर्णी यांच्या सामाजिक व सार्वजनिक जीवनातील कार्यात त्यांनी नेहमीच खंबीर साथ दिली. सुधाप्पांच्या घरी सामाजिक आणि सार्वजनिक कार्याच्या निमित्ताने अनेक बैठका होत असत. विविध क्षेत्रांतील कार्यकर्त्यांची सतत ये-जा आणि उठबस असायची. या सर्वांचे मीनाताई नेहमीच हसतमुखाने स्वागत करून आपुलकीने आदरातिथ्य करीत असत.
सुधाप्पांच्या सामाजिक कार्यामागे मीनाताईंचे मोलाचे सहकार्य आणि खंबीर पाठबळ होते. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे व आपुलकीच्या वागण्यामुळे त्या सर्वांच्या परिचित होत्या. त्यांच्या निधनाने कुलकर्णी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, कोपरगावच्या सामाजिक वर्तुळातून हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात मुलगी, मुलगा, सून, जावई,नातवंडे असा परिवार आहे.