Homeकोपरगावअहिल्यानगर बेसबॉल लीग २०२६ मध्ये किर्ती कार्डिनल्स विजेते

अहिल्यानगर बेसबॉल लीग २०२६ मध्ये किर्ती कार्डिनल्स विजेते

आमदार आशुतोषदादा काळे यांच्या हस्ते विजेत्या संघांना बक्षीस वितरण संपन्न

कोपरगाव:-महाराष्ट्र राज्य बेसबॉल असोसिएशन, अहिल्यानगर बेसबॉल असोसिएशन आणि के. जे. सोमैया महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ‘अहिल्यानगर बेसबॉल लीग २०२६ या राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेचा थरार २२ ते २४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्हातील एकुण १२०खेळाडू नी सहभाग नोंदवत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. स्पर्धेत किर्ती कार्डिनल्स संघाने विजेतेपद पटकावले, तर एपी ऑल स्टार संघाने उपविजेतेपद मिळविले.

स्पर्धेतील अंतिम निकालात प्रथम क्रमांक पटकावून किर्ती कार्डिनल्स संघाने विजेतेपदावर आपले नाव कोरले. द्वितीय क्रमांक एपी ऑल स्टार, तृतीय क्रमांक औटी हिटर्स, तर चतुर्थ क्रमांक अमृत डॉजर्स संघाने मिळविला. सर्व संघांनी संपूर्ण स्पर्धेत चुरशीचा खेळ करीत प्रेक्षकांची दाद मिळविली.

स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी बोलताना आशुतोषदादा काळे म्हणाले की, या स्पर्धेच्या माध्यमातून युवा खेळाडूंना आपले क्रीडा कौशल्य, जिद्द, चिकाटी आणि सांघिक भावना प्रदर्शित करण्याची उत्तम संधी मिळाली आहे. क्रीडा क्षेत्रातील अशा उपक्रमांमुळे युवकांमध्ये खेळाची आवड निर्माण होण्याबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. अशा स्पर्धांमधून उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन मिळून त्यांना भविष्यात राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी उपलब्ध होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या स्पर्धेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील बेसबॉल खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले. स्पर्धेचे नेटके नियोजन, खेळाडूंनी पाळलेली शिस्त, पंचांचे योगदान आणि आयोजकांनी घेतलेली मेहनत यामुळे संपूर्ण स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली.

यावेळी कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त संदिप रोहमारे, राजेश ठोळे, प्रसाद नाईक, के. जे. सोमैया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे, नगरसेवक वाल्मिक लहिरे, श्री.अरुण चंद्रे, मनोज नरोडे, अनिरुद्ध काळे, के. बी. पी. विद्यालयाचे मुख्याध्यापक जाधव , प्रा. सुनिल कुटे सर, छत्रपती विजेते अक्षय आव्हाड , मकरंद कोऱ्हाळकर सर, प्रविण मुंगसे, कन्हैया गंगुले,शमित माळी विशाल गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच सहभागी संघांचे खेळाडू, प्रशिक्षक, पंच आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अहिल्यानगर बेसबाँल असोसिएशन चे अध्यक्ष श्री. अरुण चंद्रे तर सुत्रसंचालन प्रा. सुनिल कुटे यांना केले तर स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणारे सर्व संघमालक, खेळाडू, प्रशिक्षक, पंच, प्रायोजक, स्वयंसेवक, क्रीडाप्रेमी तसेच सहकार्य करणाऱ्या सर्व संस्थांचे महाराष्ट्र बेसबाँल असोसिएशन चे सहसचिव श्री. मकरंद को-हाळकर यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!