
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध पहिले महायुद्ध पुकारणाऱ्या श्रीमंत महाराज यशवंतराव होळकर (प्रथम) यांनी स्वतःच्या बळावर इंग्रजांना वेगवेगळ्या युद्धात तब्बल १८ वेळा पराभूत केले होते.अशा महापराक्रमी श्रीमंतमहाराज यशवंतराव होळकर (प्रथम) यांचा इतिहास व जीवनकार्य समाजासाठी स्फूर्तिदायक असून,तो इतिहास नवीन पिढीसमोर मांडण्याची गरज आहे. तरुण पिढीने महाराज यशवंतराव होळकर यांच्या जीवनकार्याचा अभ्यास करून त्यापासून प्रेरणा घ्यावी,असे आवाहन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी केले.

.
श्रीमंत महाराज यशवंतराव होळकर (प्रथम) यांचे वंशज स्वप्नील राजे होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ते इंदौर (मध्य प्रदेश) पर्यंत श्रीमंत महाराज यशवंतराव होळकर शौर्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे येथून ७ मे रोजी श्रीमंत महाराज यशवंतराव होळकर यांचा ब्रांझ धातूपासून बनविलेला भव्य १४ फूट उंचीचा अश्वारूढ पुतळा घेऊन

वाजतगाजत निघालेली ही शौर्य यात्रा मंगळवारी (९ मे) कोपरगाव शहरात मुक्कामी होती.बुधवारी (१० मे) ही शौर्य यात्रा इंदौरकडे निघाली असताना येसगाव (ता.कोपरगाव) येथे युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील समस्त जनतेच्या वतीने या शौर्य यात्रेचे स्वागत केले व श्रीमंत महाराज यशवंतराव होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी विवेकभैय्या कोल्हे यांनी या शौर्य यात्रेत सहभागी झालेले महाराज यशवंतराव होळकर

(प्रथम) यांचे वंशज स्वप्नील राजे होळकर,महाराज यशवंतराव होळकर शौर्य यात्रा व पुतळा प्रतिष्ठापना समितीचे समन्वयक सुधीरभाऊ देडगे,शौर्य यात्रेचे मुख्य संयोजक अमरजित राजे बारगळ, सहसंयोजक रवींद्र भुसारी यांचा सत्कार केला.श्रीमंत महाराज यशवंतराव होळकर (प्रथम) यांची शौर्य यात्रा इंदौर येथे पोहोचल्यानंतर १३ मे रोजी श्रीमंत महाराज यशवंतराव होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.श्रीमंत महाराज यशवंतराव होळकर (प्रथम) यांची शौर्यगाथा जनतेसमोर मांडण्यासाठी पुणे ते इंदौरपर्यंत शौर्य यात्रा काढल्याबद्दल विवेकभैय्या कोल्हे यांनी महाराज यशवंतराव होळकर यांचे वंशज स्वप्नील राजे होळकर,पुतळा प्रतिष्ठापना समितीचे समन्वयक सुधीरभाऊ देडगे,शौर्य यात्रेचे मुख्य संयोजक अमरजित राजे बारगळ, सहसंयोजक रवींद्र भुसारी यांचे आभार मानले.

यावेळी विवेकभैय्या कोल्हे म्हणाले, इंग्रजांच्या गुलामगिरीत अडकलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक महापुरुषांनी आपले सर्वस्व अर्पण केले.प्रत्येक महापुरुषांनी देशासाठी व समाजासाठी मोठे योगदान दिले असून,त्यांच्या योगदानाची प्रेरणा घेऊनच अनेक पिढ्या घडल्या आहेत.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या घराण्याने भारतासाठी खूप मोठे योगदान दिलेले आहे.होळकर घराण्याचा इतिहास आजही समाजाला दिशादर्शक आहे. देशभर ज्या साम्राज्याचा विस्तार आणि ओळख होती अशा बलाढ्य होळकर घराण्यातील महाराज यशवंतराव होळकर (प्रथम) हे एक कर्तबगार वीरपुरुष होते.त्यांनी शून्यातून स्वत:चे साम्राज्य निर्माण केले होते.इंग्रजांना भारताबाहेर काढण्यासाठी पहिले महायुद्ध पुकारणारे महाराज यशवंतराव होळकर यांनी स्वतःच्या बळावर इंग्रजांना वेगवेगळ्या युद्धांमध्ये तब्बल १८ वेळा पराभूत करून जागतिक इतिहास रचला. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वत:चे राज्य स्वत:च्या हिमतीवर मिळवणारे,आयुष्यात शेवटपर्यंत स्वत:हून कोणाशीही एकही तह न करणारे महाराज यशवंतराव होळकर हे एकमेव महायोद्धा होते.
सम्राट यशवंतराव होळकर (प्रथम) यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील वाफगाव (ता.खेड) येथे ३ डिसेंबर १७७६ रोजी झाला होता.यशवंतराव होळकर यांची जन्मभूमी महाराष्ट्रात आहे ही आमच्या सर्वांसाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे.यशवंतराव यांचे बालपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सानिध्यात गेल्यामुळे त्यांच्यावर अहिल्यादेवी यांच्या विचारांचा मोठा प्रभाव होता.मध्य प्रदेशातील महेश्वर येथे ६ जानेवारी १८०५ रोजी राज्याभिषेक करून त्यांनी होळकर- मराठा साम्राज्याची स्थापना केली आणि ते पहिले महाराजा झाले. इंग्रजांनी जगावर राज्य केले;पण महाराज यशवंतराव होळकर यांच्याकडून इंग्रजांना तब्बल अठरा वेळा युद्धात पराभव स्वीकारावा लागला.त्यांनी इंग्रजांविरूद्ध सलग एकही युद्ध न हारणारा एकमेव महाराजा अशी ख्याती मिळवली. त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते.’प्रथम आपला देश,मग इतर सर्व’अशी व्यापक भूमिका घेणारे महाराज यशवंतराव होळकर हे प्रजाहितदक्ष लोककल्याणकारी पराक्रमी राजे होते.स्वातंत्र्यपूर्व काळात अन्य सारे राजे इंग्रजांचे मांडलिक बनलेले असतानाही महाराज यशवंतराव होळकर यांनी इंग्रजांसमोर कधीही हार पत्करली नाही.यशवंतराव होळकर हे एकमेव राजे होतेज्यांच्याशी इंग्रजांनी समान अटींवर शांतता करार केला.तह होऊनही इंग्रजांना हटवण्याचा इरादा त्यांनी सोडला नाही. इतिहासकारांनी त्यांचा ‘भारताचा नेपोलियन’ म्हणून गौरवले आहे.अशा साहसी बलाढ्य महाराज यशवंतराव होळकर यांचे जीवनचरित्र प्रेरणादायी आहे,असेही विवेकभैय्या कोल्हे म्हणाले.

यावेळी स्वप्नील राजे होळकर व सुधीरभाऊ देडगे यांनी विवेकभैय्या कोल्हे यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.याप्रसंगी भाजप,भाजयुमोचे पदाधिकारी,कार्यकर्ते,येसगाव ग्रामस्थ तसेच धनगर व इतर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.